आपुले-परके मी कसे पारखू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 01:14 PM2019-04-23T13:14:17+5:302019-04-23T13:15:15+5:30

मिलिंद कुलकर्णी लोकसभा निवडणुकीच्या नाट्यात राजकीय पक्ष, उमेदवार, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांना एका भक्तिगीतातील ‘आपुले-परके मी कसे पारखू?’ या ...

How do I know how much I care about? | आपुले-परके मी कसे पारखू?

आपुले-परके मी कसे पारखू?

Next

मिलिंद कुलकर्णी
लोकसभा निवडणुकीच्या नाट्यात राजकीय पक्ष, उमेदवार, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांना एका भक्तिगीतातील ‘आपुले-परके मी कसे पारखू?’ या ओळीची प्रचिती आली असेल. संकटसमयी खऱ्या मित्राची पारख होते, असे आपण म्हणतो, त्याचा अनुभव या साऱ्यांना आला असेल. अपेक्षाभंग, प्रतारणेचे हे दु:ख मोठे असते. मनावर, हृदयावर त्याचा व्रण उमटतो, तो कायम राहतो. पुसता म्हटला तरी पुसला जात नाही.
राजकीय मंडळींच्या जाहीर वक्तव्यातून व्यथा मांडल्या गेल्या. त्यातूनही वाद उद्भवले. जळगाव मतदारसंघाचे खासदार ए.टी.पाटील यांनी तर षडयंत्र असेच या सगळ्या घटनेचे वर्णन केले आहे. दहा वर्षे तुम्ही खासदार होतात, आता पक्ष दुसºया उमेदवाराला संधी देऊ इच्छितो, अशी भूमिका पक्षश्रेष्ठींनी मांडली असती तर ती पाटील यांनी स्विकारली असती काय, हा देखील प्रश्न आहे. अलिकडे वयाची नव्वदी गाठल्यानंतरही उमेदवारीची अपेक्षा ज्येष्ठ नेत्यांना असते, त्यामुळे राजकारणात ज्येष्ठत्व, वय, अनुभव या शब्दांचे प्रसंगानुरुप अर्थ बदलत जातात. लोकनियुक्त नगराध्यक्ष ते खासदार असा राजकीय पल्ला गाठलेल्या पाटील यांना वैयक्तीक जीवनातील प्रसंगावरुन लक्ष्य करीत राजकीय जीवनातून बाद करण्याचा हा प्रकार राजकारणाची पातळी किती खालावली आहे,हे अधोरेखित करुन जातो. स्वकीयांनीच रचलेल्या षडयंत्राचे बळी ठरल्याची त्यांची भावना पाहता ‘आपुले-परके’ कोण हे ओळखणे त्यांना अवघड झाले होते, याची अनुभूती प्रकट होते.
पाटील यांचे तिकीट कापून विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली. एबी फॉर्मसह त्यांनी अर्ज दाखल केला. प्रचार सुरु केला. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांचीही उमेदवारी कापण्यात आली. ही उमेदवारी कापण्याच्या घटनेचे वर्णन वाघ दाम्पत्याने ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’ अशा शब्दात केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष, आमदार अशी जबाबदारीची पदे भूषविणाºया महिला नेत्यावर तिकीट देऊन आठवडाभरात ‘कमकुवत’ उमेदवाराचा शिक्का बसविला जातो, हे कोणते सर्वेक्षण होते. मग तिकीट देताना सर्वेक्षण कोणते होते, हा त्यांचा सवाल रास्त आहे. हे सगळे करणारेदेखील ‘आपुले’च होते,ही त्यांची व्यथा आहे.
ही प्रतारणा असह्य झाल्याने अमळनेरचे नाट्य घडले. त्याला कारणीभूत ठरले ते माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांचे पारोळ्यातील ए.टी.पाटील यांच्या मेळाव्यातील वादग्रस्त वक्तव्य. दोन मंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षमेळाव्यात शेजारी बसलेल्या जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी तीनदा आमदार म्हणून निवडून आलेल्या डॉ.पाटील यांना मारहाण करावी, हे कुणासाठीही अनपेक्षित होते. ‘आपुल्या’च लोकांनी परके होत असे कृत्य करावे, हे पाहून व्यथीत झालेले डॉ.बी.एस.पाटील नंतर प्रचारात उतरलेच नाहीत. आमदार स्मिता वाघ आणि जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत डॉ.बी.एस.पाटील यांच्यासोबत व्यासपीठावर पुन्हा एकत्र आले. पक्षशिस्त म्हणून हे सगळे एकत्र आले असले तरी मनाने मात्र ते दुरावलेलेच राहिले असावे. कार्यकर्त्यांनादेखील हे चित्र तात्कालीक आणि अपरिहार्य वाटले असेल. त्यात जिवंतपणा, अनौपचारिकता, नैसर्गिकता जाणवली नसणारच.
मुुंबईत शस्त्रक्रियेमुळे रुग्णालयात थांबलेल्या एकनाथराव खडसे यांना १८ दिवस प्रचारापासून लांब रहावे लागले. या काळातील त्यांची व्यथा बोदवडच्या सभेत जाहीरपणे मांडली गेली. ‘आता मी गेलो, परत येत नाही’ अशीच विरोधकांची भावना झाली होती, पण त्यांना पुढे घातल्याशिवाय मी जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावले. रावेरची जागा भाजपच्यादृष्टीने अवघड असल्याची कुजबूज सुरु झाली होतीच, ती मुंबईत नाथाभाऊंच्या कानी गेली नसेल, असे नाहीच. आणि हे कोण करतेय हेदेखील त्यांना ठाऊक असल्याने त्यांनी जाहीर समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या निमित्ताने खडसे आणि गिरीष महाजन बºयाच दिवसांनंतर एकत्र व्यासपीठावर आले. रक्षा खडसे यांच्या प्रचार फलकांवर महाजन यांचे छायाचित्र दिसले. जामनेर आणि मुक्तार्इंनगरने एकमेकांची छायाचित्रे पूर्वीच बाद केली असताना निवडणुकीच्या निमित्ताने ‘आपुले-परके’मधील अंतर दूर करण्याचा सकारात्मक पाऊल उचलले गेले. फक्त हे तात्कालीक नसावे, अशी सामान्य कार्यकर्त्याची अपेक्षा असेल.

Web Title: How do I know how much I care about?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.