परोपकार कसा घडावा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 08:55 PM2019-02-15T20:55:33+5:302019-02-15T20:57:50+5:30

‘अच्छे दिन’साठी आता थोडा त्रास जळगावकर सहन करतायत, हे खरे आहे. परंतु, काही महाभाग मात्र छिद्रान्वेषी कसे असतात ते पाहून हसावे की रडावे, अशी स्थिती होते.

How to be charitable? | परोपकार कसा घडावा?

परोपकार कसा घडावा?

Next



मिलिंद कुलकर्णी
मराठी माणूस तसा अध्यात्माची गोडी असणारा म्हणून ओळखला जातो. विठ्ठल, संत हे त्याचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. कीर्तन, प्रवचन, अभंगांमध्ये तो रमतो. पापभिरु, परोपकारी अशी स्वभाववृत्ती आहे. रांगडेपण जसे भूषणावह असते, तशीच ही परोपकारी वृत्ती अभिमानास्पद आहेच.
ही स्वभाववृत्ती, मराठी बाणा मात्र काही वेळेस कुठे जातो, असा प्रश्न उपस्थित होतो. प्रसंग साधे असतात पण आम्ही एवढा प्रतिष्ठेचा विषय करतो की कळायला मार्ग नाही.
आता जळगाव शहरातील उदाहरण देतो, म्हणजे तुम्हाला माझे म्हणणे पटेल. सध्या महापालिकेकडून अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु आहे. नवीन पाईप लाईन टाकणे आणि त्यावरुन प्रत्येक घराला नळसंयोजन देण्याचे कार्य वेगात सुरु आहे. नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी पूर्वी ज्या दिशेला पाईप लाईन होती, त्याच्या जवळपास खड्डे केले जात आहे. म्हणजे डांबरी रस्ता सरळ रेषेत खोदला जात आहे. नळसंयोजनासाठी आडवे खोदले जात आहे. गल्ली बोळातील रस्त्याची अशी उभी-आडवी चाळण झाली आहे. भविष्यातील ‘अच्छे दिन’साठी आता थोडा त्रास जळगावकर सहन करतायत, हे खरे आहे. परंतु, काही महाभाग मात्र छिद्रान्वेषी कसे असतात ते पाहून हसावे की रडावे, अशी स्थिती होते. रस्ता हा रहदारीसाठी आहे. पण आपल्या घरासमोरील रस्ता हा आपला खाजगी मालकीचा आहे, असा बहुसंख्याकाचा समज असतो. चाळण झालेल्या रस्त्यामुळे अवघ्या १२ फुटी रुंदीच्या रस्त्यांवर वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. त्यातच चारचाकी वाहन नागरिक घरासमोरच लावतात. खड्डे चुकविण्याच्या नादात कुणाचा कारला धक्का लागला तर समरप्रसंग ओढवलाच म्हणून समजा. गंमत म्हणजे, सार्वजनिक रस्ता खाजगी समजणारी ही मंडळी अंगणातील रस्त्यावरील खड्डा आजूबाजूची माती टाकून बुजविण्याचे सौजन्य मात्र दाखवत नाही. हे माझे काम नाही, महापालिका आणि कंत्राटदाराने ते केले पाहिजे. आमच्या करातून ही कामे होत असताना त्यांनी ती व्यवस्थित केली पाहिजे. पण अशी हक्काची भाषा बोलत असताना संघर्षाचा पवित्रा घ्यायची वेळ आली तर आम्ही मागे सरतो. पण परोपकार करुन आपल्या अंगणातील खड्डा बुजविला तर स्वत: ची आणि इतरांची अडचण दूर होईल. वाहनांचे नुकसान टळेल. धक्का बसणार नाही. हे मात्र समजून घेतले जात नाही.
अशीच स्थिती अंगणातील स्वच्छता अभियानाची असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘स्वच्छ भारत’चे स्वप्न साकारताना आम्ही घरातील कचरा शेजारच्या अंगणात ढकलण्याचे काम मात्र इमाने इतबारे करीत असतो. माझे अंगण स्वच्छ दिसले पाहिजे. शेजाऱ्याचे घाण दिसले तर तो त्याचा प्रश्न. अगदी भारत-पाकिस्तान सीमारेषेसारखा हा संवेदनशील मुद्दा बनतो. जेव्हा शेजारी भडकतो, तेव्हा मात्र रस्ता हा सार्वजनिक आहे. तुमच्या मालकीचा नाही, असे दरडवायला कमी करीत नाही.
परोपकाराची भावना कुठे जाते, हे कोडे पडल्याशिवाय राहत नाही.

 

 

 

Web Title: How to be charitable?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव