डिअर हनीप्रीत ...
कुठे ‘डेरा’ टाकून बसलीस? देख तेरे चाहनेवाले दर दर भटक रहे.
बाई, ताई, बेटी, सखी, प्राणप्रिये आणि अजून काय काय असलेली तू हनी एकदाची येच! इकडे अर्थात पंचकुलाच्या पंचक्रोशीतील समस्त भगतगण पंचप्राण कंठाशी आणून तुझी वाट बघत आहेत. डे-याची सच्ची वारिस म्हणून ते तुझ्याकडे आस लावून बसले. वाटले होते राम रहीमच्या औषधपाण्याचे करण्यासाठी तरी तू येथे थांबशील. तो बिचारा हनी, हनी करत कोठडीच्या गजावर डोके आपटत आहे आणि तू मात्र हनीमूनला गेल्यासारखी नेपाळ ट्रीप एन्जॉय करीत होती. काल म्हणे तू राजधानी दिल्लीत चमकली. अटक होऊ नये म्हणून अर्जही केला पण तो खारीज झाला. आता दर्शन दिल्याशिवाय तुला पर्याय नाही. म्हणून म्हणतो, निघून ये! घाबरू नकोस. येथे तुला कसलाही त्रास होणार नाही. येताना तेवढी राम रहीमची डायरी, लॅपटॉप, हार्ड डिस्क की काय म्हणतात ती घेऊन ये. या हार्ड डिस्कमध्ये म्हणे अनेक राजकीय नेत्यांचे आणि हरियाणातील पोलीस अधिकाºयांचे हार्ट अडकले आहे. ती आणून हरियाणा पोलीसच्या माथी मारली की झाले! मग सरळ मुंबई गाठ. एकदा बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली की शिक्षा-बिक्षा काही होत नाही. वाटल्यास सल्लू भाईजानकडून कन्फर्म करून घे! बोले तो, संजूबाबाही तुला गाईड करू शकतो. येताच कॅटरिनाला आधी भेट. तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली बिचारी! तू तिचा डान्स क्लास लावणार म्हटल्यापासून किती नाचू असे तिला झाले आहे.
राम गोपाल वर्मांनी तर एव्हाना तुझ्यावर स्क्रीप्टही तयार करून ठेवले म्हणे. नावही ठरले ‘मै कॅटरिना बनना चाहती हूं!’ मसाला २००३ चाच ‘फक्त माधुरी दीक्षित’च्या जागी कॅटरिना तेवढे केले की झाले. तेव्हा रामलाही भेटून घे. आता राहिला रहीम, कोर्टातून तोही (रहम) मिळेल की!
मग येतेस नां! की हेलिकॉप्टर पाठवू! आणि हो एक सांगून ठेवतो सध्या तुझ्या नावाचे फोटोसह पोस्टर्स लागलेत. (सिनेमाचे नव्हे ‘लापता’चे) लाखावर बक्षीसही घोषितही झाले. आता पोस्टर्सवर खाली ‘जिंदा या मुर्दा’ लिहायलाही पोलीस कमी करणार नाहीत. तेव्हा त्या आधीच निघून ये!


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.