‘इकडे आड, तिकडे विहीर’ या मराठी म्हणीचा अर्थ बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यापेक्षा जास्त चांगला इतर कुणालाही ठाऊक असू शकत नाही; कारण त्यांनी बरेचदा त्या स्थितीचा सामना केला आहे. बिहारचे उप मुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण संस्था म्हणजेच सीबीआयने प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केल्याने, नितीश कुमार यांच्यासाठी पुन्हा एकदा ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी स्थिती उभी ठाकली आहे. नितीश कुमार यांनी आयुष्यात सर्वाधिक कोणती गोष्ट जपली असेल, तर ती म्हणजे स्वच्छ प्रतिमा! भ्रष्टाचार प्रकरणात नाव आल्यावर स्वपक्षाच्या नेत्यांचे राजीनामे घेण्यासाठी क्षणाचाही विलंब न लावणाऱ्या नितीश कुमार यांना, बुधवारी तेजस्वी यादव यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसावे लागले, तेव्हा त्यांची स्थिती किती अवघडल्यासारखी झाली असेल. तेजस्वी यादव राजीनामा देणार नाहीत, ही भूमिका राजदने कायम ठेवल्यास, नितीश कुमार यांच्यासमोर दोनच पर्याय शिल्लक उरतात. एक तर भाजपाशी हातमिळवणी करणे, किंवा मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाणे! हे दोन्ही पर्याय नितीश कुमार यांच्यासाठी हानीकारक आहेत. भाजपाच्या पाठिंब्याची भारी किंमत नितीश कुमार यांना चुकवावी लागेल. या पर्यायाची सर्वात मोठी किंमत म्हणजे पंतप्रधान पदावर आरूढ होण्याच्या स्वप्नास किमान सात वर्षांसाठी तरी तिलांजली देणे! आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पुन्हा कौल मिळाला तर नरेंद्र मोदीच पंतप्रधान असतील आणि विरोधी पक्षांना कौल मिळाला तरी नितीश कुमार यांना संधी मिळणे नाही! दुसरीकडे भाजपाशी हातमिळवणी न करता मध्यावधी निवडणुकीचा पर्याय निवडल्यास, नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदही गमवावे लागण्याचीच शक्यता जास्त आहे; कारण २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये तिरंगी लढत झाली, तेव्हा अवघ्या दोन जागा पदरात पडून, नितीश कुमार यांच्या पक्षाची अवस्था अतिशय दारुण झाली होती. विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीतही भाजपाविरोधी मतांची फाटाफूट होऊन, कमीअधिक फरकाने त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या चाणक्यांनी बिहारमध्ये अत्यंत चाणाक्ष खेळी केली आहे. लालूप्रसाद यादव यांच्यावर निशाणा धरून, त्यांनी कोंडीत मात्र नितीश कुमार यांना पकडले आहे. नितीश कुमार त्या कोंडीतून बाहेर पडण्यात यशस्वी होतात, की भाजपाला शरण जातात, हे बघणे मनोरंजक ठरणार आहे.