‘द ग्रेट डिव्हायडर ऑफ इंडिया’ म्हणजेच ‘देशाचा सर्वात मोठा दुभंगकर्ता’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 01:56 AM2019-05-14T01:56:26+5:302019-05-14T06:19:53+5:30

‘टाइम’ या जागतिक कीर्तीच्या नियतकालिकाने मुखपृष्ठावर नरेंद्र मोदींचे छायाचित्र छापून, त्यासोबत ‘द ग्रेट डिव्हायडर आॅफ इंडिया’ (भारताचा दुभंग करणारा नेता) असा मजकूर प्रकाशित केला आहे.

'The Great Divider of India' | ‘द ग्रेट डिव्हायडर ऑफ इंडिया’ म्हणजेच ‘देशाचा सर्वात मोठा दुभंगकर्ता’

‘द ग्रेट डिव्हायडर ऑफ इंडिया’ म्हणजेच ‘देशाचा सर्वात मोठा दुभंगकर्ता’

Next

‘टाइम’ या जागतिक कीर्तीच्या नियतकालिकाने मुखपृष्ठावर नरेंद्र मोदींचे छायाचित्र छापून, त्यासोबत ‘द ग्रेट डिव्हायडर आॅफ इंडिया’ (भारताचा दुभंग करणारा नेता) असा मजकूर प्रकाशित केला आहे. त्यामुळे स्वाभाविकच मोदींचा पक्ष आणि त्यांचा संघ परिवार त्यावर भडकला आहे. आम्ही तथाकथित ‘हिंदुराष्ट्र’ निर्माण करण्याच्या प्रयत्नात असताना, ‘टाइम’वाले आम्हालाच ‘दुभंगकर्ते’ म्हणतात ही त्यांची व्यथा. भारत हे बहुधर्मी, बहुभाषी व संस्कृतीबहुल राष्ट्र आहे. त्यात ८० टक्के लोक हिंदू, तर २० टक्के अन्य धर्मीय आहेत. त्यातील मुसलमानांची संख्या १७ कोटी तर ख्रिश्चनांची दोन कोटी आहे. मोदींच्या पक्षाचा या दोन्ही धर्मांवर राग आहे.

फार पूर्वी ओडिशा या राज्यात त्याने १,२०० चर्चेस जाळून खाक केली. गोध्राकांडानंतर त्याने गुजरातमध्ये दोन हजार मुसलमानांची कत्तल केली. आता नॅशनल रजिस्टर आॅफ सिटीझन्सच्या नावावर आसामातील मुस्लिमांना देशाबाहेर घालविण्याची त्यांनी तयारी केली आहे, तर ३५ अ हे कलम बदलून काश्मीरचा प्रदेश बड्या भांडवलदारांना हॉटेल्ससाठी देण्याची त्यांची तयारी आहे. सगळ्या ‘सुधारणा’ मुसलमानांवर लादण्याची त्यांची त-हाही डिवचणारी आहे. गोवधबंदी (हिंदू शेतकऱ्यांना कितीही त्रासाची असली तरी) मुसलमानांचे खाद्य तोडण्यासाठी त्यांनी आणली.

तलाकबंदी, बहुपत्नीत्वाला आळा घालणारा कायदा हे सारे उपाय त्यांच्यासाठी केले जात आहेत. गोमांसाच्या संशयावरून त्यांनी मुसलमानांची घरे उत्तर प्रदेशात जाळली, तर दलित तरुणांना गुजरातमध्ये मरेस्तोवर मारहाण केली. अल्पसंख्याकही भारतीय आहेत, पण त्यांची बाजू घेणा-या पत्रकारांवर बेकारी लादून त्यांना भाजपने अडचणीत आणले. मुसलमानांची भारतातील संख्या, पाकिस्तानातील मुसलमानाहून अधिक आहे. इराण, इराक, इजिप्त, सौदी अरेबिया, अफगाणिस्तान या देशातील मुस्लीम लोकसंख्येहूनही ती मोठी आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला दुखावत राहण्याचा व त्यांच्याविरुद्ध जाणारे पक्षपाती निर्णय घेण्याचा प्रकार त्या समाजाला दूर लोटण्याचाच नव्हे, तर देशात दुभंग घडवून आणण्याचा आहे.

दलित पायदळी तुडवायचे, मुसलमान हाकलायचे, ख्रिश्चनांना परके ठरवण्याचा उद्योग मोदींच्या नेतृत्वात सुरू असताना, त्यांचे सहकारी व परिवार टाळ्या वाजविणारा आहे. हे एके काळी श्रीलंका सरकारने तामिळांविरोधात केले. म्यानमार सरकार रोहिंग्याबद्दल करीत आहे. अमेरिकेचे सरकार मेक्सिकनांविरुद्ध करीत आहे. पाकिस्तानात अहमदीया पंथाविरुद्ध सुरू आहेत. अनेक पाश्चात्त्य कृष्णवर्णीयांविरुद्ध करीत आहेत. हा प्रकार समाजात दुही निर्माण करण्याएवढाच देशात दुभंग माजविण्याचा आहे. तो करणाऱ्यांना प्रशंसक लाभणे ही दुर्दैवाची बाब आहे. देश अखंड राहावा, म्हणून बलिदान करणा-या महात्मांच्या देशात देश तोडणा-यांचे हे उपद्व्याप सुरू असलेले पाहणे हा दुर्दैवी प्रकार आहे. येथे कुणी कुणाचे जास्तीचे लाड करीत नाही. कुणी कुणाचा अनुनय करीत नाही. तरीही तशा प्रचाराला प्रोत्साहन देणे आणि देश एकाच धर्माचा असल्याची हाळी देणे हा देश तोडण्याचाच प्रकार आहे.

समाजात सामंजस्य-एकोपा असेल तर देश टिकतो नाही, तर त्याचे रशियासारखे १५ तुकडे होतात, हे जगाने पाहिले आहे. धर्म, भाषा, संस्कृती, जीवनपद्धती यांचे वेगळेपण कायम राखूनही एकात्मता टिकविणे हा राष्ट्रधर्म आहे. त्यात जे दुभंगवादी असतात, त्यांना देशप्रेमी म्हणायचे की देशविरोधी? नरेंद्र मोदींना ‘देशाचा सर्वात मोठा दुभंगकर्ता’ असे ‘टाइम’ने म्हटले असेल, तर ते या सा-या पार्श्वभूमीवर खरेच आहे. त्यांच्या या प्रयत्नांना विरोध करणे व समाजात समतोल कायम राखणे हीच खरी देशभक्ती. ज्या समाजात माणसे जाती-धर्माच्या नावाने वेगळी केली जातात व त्यांच्याकडे तसे पाहिले जाते, त्या समाजात ऐक्य कसे राहील? त्यामुळे ‘टाइम’ या नियतकालिकाने दिलेला इशारा साºयांनी नीट समजून घेतला पाहिजे व देशात दुभंग करणा-यांपासून सावधच नव्हे, तर दूर राहिले पाहिजे.

Web Title: 'The Great Divider of India'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.