अविरत सेवा देणाऱ्या भाषा अनुवादाचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 05:35 AM2019-05-22T05:35:09+5:302019-05-22T05:35:25+5:30

जगातील विविध भाषांतून थेट मराठीत भाषांतरित केलेल्या साहित्याला वाहिलेलं ‘केल्याने भाषांतर’ हे त्रैमासिक गेल्या वीस वर्षांपासून नियमितपणे प्रकाशित होत ...

Gratitude of non-continuing language translation | अविरत सेवा देणाऱ्या भाषा अनुवादाचा गौरव

अविरत सेवा देणाऱ्या भाषा अनुवादाचा गौरव

Next

जगातील विविध भाषांतून थेट मराठीत भाषांतरित केलेल्या साहित्याला वाहिलेलं ‘केल्याने भाषांतर’ हे त्रैमासिक गेल्या वीस वर्षांपासून नियमितपणे प्रकाशित होत आहे. पुण्यातील ‘कलासक्त’ या संस्थेतर्फे याची सुरुवात संस्थापक संपादक कै. विद्यासागर महाजन यांनी चार सहकाऱ्यांबरोबर केली. दुर्दैवाने २००९ मध्ये त्यांचे आणि विवेकानंद फडके यांचे २०१४ मध्ये निधन झाले. सुरुवातीपासून संपादनाचे काम करणाºया सुनंदा महाजन आणि अनघा भट या आज तितक्याच निष्ठेने व भाषांतरविषयीच्या तळमळीने हे त्रैमासिक नेटाने चालवीत आहेत.

‘केल्याने भाषांतर’मध्ये जर्मन, फ्रेंच, रशियन, जपानी, स्पॅनिश, पोलीश, इटालियन इ. विविध परकीय भाषांमधून थेट मराठी भाषेत साहित्य भाषांतरित स्वरूपात सादर होत असते. यात मुख्यत्त्वे कथा, कविता या छोट्या आकारातील साहित्याला स्थान असते. भाषांतरित पुस्तकांचे परीक्षण, भाषांतरित साहित्य वाचताना त्याला पूरक ठरतील, असे त्या-त्या समाजाची, सांस्कृतिक, ऐतिहासिक वैशिष्ट्ये उलगडून दाखविणारे लेख, सदरे, तसेच मराठी शैली संपादनासाठी परकीय भाषेची पार्श्वभूमी नसणाºया एका संपादकाचे मार्गदर्शन या बाबी इथे महत्त्वाच्या ठरतात. ‘केल्याने भाषांतर’ने आणखी एक कटाक्षाने पाळलेली गोष्ट म्हणजे परदेशी लेखकांचे, स्थळांचे, विशेष नामांचे इंग्रजीत रूढ झालेले उच्चार न वापरता, त्याऐवजी मूळ भाषेतील उच्चारांचा उपयोग करायचा. म्हणजे जर्मन लेखक गटे नव्हे, तर ग्योथे, टॉल्स्टॉय नव्हे, तर तलस्तोय. रुळलेले नसतील, तर मूळचे- फ्रांकफुर्ट, पेटर हे उच्चार रुळवायचे.


‘‘‘केल्याने भाषांतर’ सुरू करण्यामागे आमची अंत:प्रेरणा हीच होती की, आपण आत्मसात केलेल्या एका परकीय भाषेतील उत्तमोत्तम साहित्य ज्या मराठी वाचकांना ते मूळ भाषेत वाचता येत नसेल, त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे. तसे करताना परकीय भाषेतील साहित्यातून व्यक्त होणार एखादा विचार, एखादा नवा साहित्यप्रकार, एखादी नवी कल्पना मराठीत यावी, त्यातून मराठी भाषेच्या अर्थाच्या, शब्दसंपत्तीच्या, विचारांच्या मांडणीच्या कक्षा रुंदावाव्या आणि त्याद्वारे जिच्या मूळच्या आधारामुळे आपण एक नवीन भाषा शिकलो, त्या मातृभाषेच्या तिजोरीत जमेल तशी, जमेल तेवढी भर घालावी. खरे तर हे सारे करण्याची ताकदही मातृभाषाच देते आणि लागणारी रसदही तीच पुरवते,’’ असे संपादक म्हणतात. कलासक्त या संस्थेच्या माध्यमातून ‘केल्याने भाषांतर’ने भाषांतरविषयक मोठी कामगिरी केली आहे. समकालीन जागतिक कथा हा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेला त्यांचा कथासंग्रह असो, मराठी- रशियन-जर्मन हा त्रैभाषिक शब्दकोश असो, विद्यासागर महाजन, सुनंदा महाजननघा भट यांनी भाषांतरित केलेली अनेक पुस्तके असोत, आगामी ग्रंथ भाषांतरांच्या योजना असोत, हे सारे पाहिल्यानंतर विदेशी भाषेतले कसदार साहित्य यापुढेही मराठीत आणण्याचे काम मोठ्या ताकदीने होत राहील, यात शंका वाटत नाही.


वी नीड यू सोसायटी ही ठाण्यातील एक अग्रमान्य सामाजिक संस्था असून, तिचे घणसोली, इंदिरानगर, तुर्भे येथे निम्नस्तरातील बालकांसाठी, १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण-प्रशिक्षणाचं काम निष्ठेने सुरू आहे. आज वी नीड यू सोसायटीतर्फे प्रतिवर्षी वैचारिक, सामाजिक, तसेच वाङ्मयीन क्षेत्रात एक वसा घेऊन तळमळीने चालविण्यात येणाºया नियतकालिकास एक लक्ष रुपये आणि स्मृतिचिन्हासह प्रबोधन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या मनाच्या मानल्या गेलेल्या प्रबोधन पुरस्कारासाठी या वर्षी ‘केल्याने भाषांतर’ या त्रैमासिकाची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराने संपादकांना आपल्या आगामी योजना पूर्ण करण्यास नक्कीच बळ मिळेल. या निमित्ताने आज अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या अनुवाद क्षेत्राचाच हा गौरव म्हणता येईल.

- डॉ अजित मगदूम । अभ्यासक

Web Title: Gratitude of non-continuing language translation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.