गोव्यात सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 09:05 AM2019-03-17T09:05:51+5:302019-03-17T11:26:10+5:30

सत्ता ही किती क्रूर असते, याचा अनुभव पर्रीकरांचे कुटुंबीय घेत आहेत आणि दुसऱ्या बाजूला सारे पक्ष आणि त्यांचे नेते संगीत खुर्चीच्या खेळात बेशरमपणे गुंतले आहेत.

Goa CM Manohar Parrikar ‘very unwell’, BJP plans ahead | गोव्यात सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच

गोव्यात सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच

राजू नायक 

राजकारण किती क्रूर असू शकते, याचा अनुभव मनोहर पर्रीकर यांच्या कुटुंबीयांना शनिवारी आला असेल. पर्रीकरांची प्रकृती गेले काही दिवस नरम होती. परंतु ती शनिवारी आणखी गंभीर बनली. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. त्यामुळे संपूर्ण कुटुंब काळजीत होते.
परंतु पर्रीकर गंभीर असले तरी त्यांची काळजी करायची सोडून संपूर्ण राजकीय जमात वेगळ्याच उचापती करण्यात गुंतली होती.

काँग्रेस पक्षाने राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. २०१७ मध्ये राज्यपालांना भेटून त्या पक्षाने सरकार स्थापन करण्याचा दावा केला नाही, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तो दोष येऊ नये म्हणून हा पक्ष सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नालाच लागला. त्यांनी राज्यपालांना तसे रितसर पत्रही लिहिले.

सध्या काँग्रेस पक्ष हा सर्वांत मोठा पक्ष असून त्यांचे १४ सदस्य आहेत. भाजपकडे १३, मगोप तीन, गोवा फोरवर्ड तीन व तीन अपक्ष असे विधानसभेचे बलाबल आहे. अलीकडेच भाजपचे एक ज्येष्ठ आमदार फ्रान्सिस डिसोझा यांचे निधन झाले आहे. त्यानंतर भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून सरकारातील घटक पक्षांनी त्यांची ओढाताण चालविली आहे. कॉँग्रेस पक्षानेही मगोप व गोवा फॉरवर्डला सत्तेचे गाजर दाखविले आहे.

पर्रीकरांचा आजार बळावल्यानंतर गोवा फॉरवर्डने शनिवारी तीन अपक्षांची साथ घेऊन मुख्यमंत्र्यांचे घर गाठले. पर्रीकरांची प्रकृती गंभीर असल्याचे मत गोवा फॉरवर्डचे नेते तथा मंत्री विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले. लागलीच भाजपने आपल्या १३ आमदारांची बैठक घेऊन परिस्थितीचा अंदाज घेतला. दुसऱ्या बाजूला पक्षाचे सचिव सतीश धोंड यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. भाजपला घटक पक्षांचा पाठिंबा कायम असून सरकार भक्कम असल्याचा दावा त्यांनी केला.

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सध्या विधानसभा पोटनिवडणूक लढविण्याच्या प्रस्तावावरून भाजपबरोबरचे संबंध ताणले आहेत. मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांना मुख्यमंत्री बनण्याची स्वप्ने पडत आहेत. त्यांना तसे आमिष काँग्रेसने दाखविले आहे. परंतु गोवा फॉरवर्डने ढवळीकरांना पाठिंबा दिलेला नाही. भाजपने आपली नवीन योजना त्यांच्यापुढे न मांडल्यास दोन्ही घटक पक्ष काही नवे निर्णय घेऊ शकतात. मगोपमध्ये व काँग्रेसमध्येही फूट पाडण्याची एक योजना गेल्या महिन्याभरात तयार झाली असल्याची चर्चा सध्या गोव्यात सुरू आहे.

दुर्दैवाने ज्या मनोहर पर्रीकर यांनी गेल्या २० वर्षांत गोव्यात अत्यंत धडाडीचे आणि प्रामाणिक राजकारण केले, त्यांच्याबद्दल मात्र एकही राजकीय नेता भावनाशील दिसत नाही. त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्याऐवजी सत्तेसाठी घोडे दामटण्याची सर्वांनाच घाई झालेली आहे. घोडाबाजारही तेजीत आहे. त्यामुळे राजकारण किती क्रूर असू शकते, याची प्रचीती पर्रीकर कुटुंबीयांना आली असेल. पर्रीकरांनी गेले आठ महिने स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी निकराने झुंज दिली आहे. आजारी असतानाही ते २७ खाती सांभाळत असत व घटक पक्षांशी सुसंवाद साधत.

Web Title: Goa CM Manohar Parrikar ‘very unwell’, BJP plans ahead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.