शेतमालाला हमी भाव मिळावा!

By admin | Published: October 20, 2016 06:12 AM2016-10-20T06:12:39+5:302016-10-20T06:12:39+5:30

विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे लोण आता पश्चिम महाराष्ट्रात पोहोचले आहे.

Get a guaranteed price for the farmland! | शेतमालाला हमी भाव मिळावा!

शेतमालाला हमी भाव मिळावा!

Next


विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे लोण आता पश्चिम महाराष्ट्रात पोहोचले आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात उजेड पेरायचा असेल, तर काही मूलभूत उपाययोजना केल्या पाहिजेत, असे डॉ. बाबा आढाव यांनी उपोषणाच्या माध्यमातून सरकारला सुचविले आहे.
कष्टकरी, शेतकरी, घरेलू कामगार महिला, हमाल, रिक्षाचालक, टपरी, पथारी, हातगाडी चालकांच्या आयुष्यात उजेड पेरणारे डॉ. बाबा आढाव यांचे अजोड योगदान आहे. माणसाचे जगणे प्रकाशमान करण्यासाठी बाबांनी नेहमीच कष्टकरी समाजाच्या मूलभूत प्रश्नांना आपले मानून रस्त्यावरची लढाई निकराने लढली आहे. ‘एक गाव-एक पाणवठा’सारख्या चळवळीने महाराष्ट्रात सलोखा निर्माण करण्याचा आणि लोकांची कलुषित मने साफ करण्याचे काम केले आहे. आजदेखील ही कळकळ कायम आहे. म्हणूनच ‘क्रांती झिंदाबाद रहेगी, क्रांती झिंदाबाद... मरणाच्या दारात घातली तुम्ही आम्हाला साद...’ अशा गीतांनी नव्या दमाच्या तरुणाईला प्रेरणा देणारा त्यांचा सहभाग चळवळीत ‘जान’ आणणारा आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्यातही ती तळमळ प्रकर्षाने जाणवते. बाबा आढाव यांनी सुरू केलेली ‘कष्टाची भाकर’ अनेकांच्या जगण्याच्या लढाईतील पोटाचा आधार ठरला आहे. खरे तर या ‘कष्टाची भाकर’मुळेच बाबांना शेतकरी, कष्टकऱ्यांच्या दु:खाची जाणीव झाली आणि त्यांच्या संवेदनशील कार्यकर्त्याने त्यासाठी कृतिशील सहभाग देण्याची भूमिका तेव्हापासून आजही कायम आहे.
डॉ. बाबा आढाव यांनी महात्मा गांधी जयंतीदिनी पुण्यात बेमुदत उपोषण पुकारले. त्यांनी केलेल्या मागण्या लक्षवेधी आहेत. शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे आणि शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. त्या दृष्टीने हे उपोषण महत्त्वाचे आहे. शेतकरी जगला, तरच देशाचं-राज्याचं अर्थकारण आणि समाजकारण टिकेल, असं विचारवंत सांगत आले. मात्र, शेतकऱ्याला जगविणारी, त्याच्या उत्पादनाला प्रोत्साहन देणारी व्यवस्था कुणीच निर्माण केली नाही. केवळ प्रश्न मांडून त्याची सोडवणूक करता येत नाही. त्यासाठी पर्याय दिला पाहिजे, हे माहीत असूनही अनेकांनी केवळ प्रश्नांची मांडणी केली. त्याची उकल कशी करता येईल? उत्पादन संबंधातील तूट, फारकत, तफावत कशी कमी करता येईल? याचा फारसा विचार झालेला दिसत नाही. त्यामुळेच विदर्भ, मराठवाड्यात होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांचे लोण पश्चिम महाराष्ट्रापर्यंत पोहोचले, ही अत्यंत गंभीर बाब कोणत्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारीच आहे. त्यामुळेच बाबांनी हे आंदोलन पुकारल्याचे दिसते. शेतकरी स्वाभिमानाने आणि समाधानाने जगला पाहिजे, यासाठीच डॉ. बाबा आढाव यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नेहमीच आपले मानून लढा पुकारला. ज्या महात्मा गांधीजींनी सत्याग्रहाचा मार्ग सांगितला, त्याच सत्याग्रहाच्या मार्गाने बाबा आढाव यांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले. सुरुवातीला सरकारी पातळीवर या आंदोलनाची पुरेशी दखल घेतली गेली नाही. मात्र, चार-पाच दिवसांनंतर सरकारी प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाची दखल घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले. वाढता पाठिंबा आणि बाबांची लढण्याची हातोटी यामुळेच सरकारी पातळीवर तत्काळ दखल घेण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: या प्रकरणी लक्ष घालून बाबा आढाव यांनी केलेल्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून, लवकरच त्याबाबत तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे उपोषण आता मागे घेण्यात आले आहे. बाबा आढाव यांच्यासारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्याने या मागण्या करून राज्यकर्त्यांच्या डोळ्यांत अंजनच घातले आहे. शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, या मागण्यांचा सरकारने साकल्याने आणि गांभिर्याने विचार करावा. सरकारने तत्त्वत: मान्यता दिली असली, तरी आश्वासनापासून काढता पाय घेऊन अवसानघात करू नये, अशीच कष्टकऱ्यांची अपेक्षा आहे.
- विजय बाविस्कर

Web Title: Get a guaranteed price for the farmland!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.