बातमीतला जॉर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 07:07 AM2019-02-03T07:07:17+5:302019-02-03T07:08:12+5:30

जॉर्ज फर्नांडिस यांचे नुकतेच निधन झाले. जॉर्जशी आधी कार्यकर्ता व नंतर पत्रकार म्हणून आलेले हे अनुभव...

George Fernandes in  News | बातमीतला जॉर्ज

बातमीतला जॉर्ज

Next

- संजीव साबडे

केंद्रातील व्ही. पी. सिंग सरकार १९९0 मध्ये पडले आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर चंद्रशेखर पंतप्रधान झाले होते. चंद्रशेखर सरकारचा पाठिंबा काढणार, हे नक्की झाले होते. केवळ तारीखच व कारणेच ठरायची होती. त्या काळात महाराष्ट्र टाइम्सचा मी दिल्ली प्रतिनिधी होतो. मुख्यमंत्री शरद पवारांविरुद्ध राज्यात काँग्रेसजनांनी बंड केले होते. त्यामुळे ते राहणार की जाणार, अशी चर्चा सुरू असायची. काँग्रेसच्या पत्रकार परिषदेनंतर २७ फेब्रुवारी, १९९१ रोजी जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडे जाणे झाले. त्यांनी गप्पांच्या नादात ६ मार्चला सरकार पडणार, असे सांगितले. त्याच दिवशी जॉर्जना राष्ट्रपती वेंकटरामन यांनी बे्रकफास्टसाठी बोलावले होते आणि राष्ट्रपतींनीच ही माहिती दिल्याचे जॉर्ज दिली होती. ही खूपच मोठीच बातमी होती, पण संभाषण दोघांतले होते आणि राष्ट्रपतींचा उल्लेख बातमीत करणे शक्य नव्हते. जॉर्जच्या नावाने द्यायची, तर बातमीचे वजन कमी झाले असते, शिवाय आठवड्यात तसे घडले नाही, तर बातमी खोटी ठरण्याची भीती होतीच. तरीही बातमी दिली आणि ती २८ फेब्रुवारीला प्रसिद्ध झाली. संपूर्ण भारतात केवळ महाराष्ट्र टाइम्समध्येच ती प्रसिद्ध झाली होती.
त्यानंतर घरगुती समस्येमुळे काही दिवसांसाठी कर्नाटकात जावे लागले, पण बरोबर ६ मार्च रोजी संपादक गोविंद तळवलकर यांचा फोन आला. ते म्हणाले की, तुमच्या समस्येच्या वेळी अभिनंदन करणे योग्य नाही, पण तुमची बातमी खरी ठरली आहे. ताबडतोब दिल्लीला जा.
जॉर्जनी दिल्लीत असताना दिलेली ही एकमेव बातमी, पण त्यांच्याविषयीच्या आणखी दोन बातम्याही खूप महत्त्वाच्या ठरल्या. १९८९ साली निवडणुका झाल्या आणि व्ही. पी. सिंग पंतप्रधान झाले. जॉर्जकडे रेल्वे खाते आले. काश्मीरमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. त्यामुळे मुफ्ती महमद सईद यांना गृहमंत्री केले, पण जॉर्जचे काश्मीरमधील विविध गटांशी असलेले संबंध पाहून पंतप्रधानांनी केंद्रात काश्मीर विभाग तयार करून त्याची जबाबदारी जॉर्जकडे सोपविली. ती बातमी सर्वात आधी मिळणारा मीच एकटा होतो. ती बातमी अर्थातच हेडलाइन म्हणून प्रसिद्ध झाली. ती जॉर्जकडून मिळाली नव्हती. त्यामुळे ती मला कुठून मिळाली, याचे वाटलेले आश्चर्य जॉर्जने बोलून दाखविले होते.
पण काश्मीरमधील वातावरण चिघळत होते. परिस्थिती सुधारत नव्हती. त्यातच मुफ्ती महमद सईद
व अतिरेकी यांचे थेट संबंध असल्याच्या ध्वनिफिती जॉर्जच्या हाती लागल्या. त्यांनी त्या पंतप्रधानांकडे दिल्या. त्यावर कारवाई होईल, अशी त्यांची अपेक्षा होती, पण व्ही. पी.
सिंग यांनी काहीच केले नाही.
त्यामुळे जॉर्जनी १९९0 मध्ये काश्मीरमधून अंग काढून घ्यायचा निर्णय घेतला. ती बातमीही पहिल्यांदा मलाच मिळाली, पण बातमी कन्फर्म होत नव्हती आणि जॉर्ज बिहारमध्ये होते. त्यांचे सहकारी, मित्र, मधू लिमये, निखिल चक्रवर्ती कोणीच बातमी कन्फर्म करत नव्हते, तरीही गोविंद तळवळलकर यांनी बातमी छापण्याचा निर्णय घेतला.
जॉर्ज व तळवलकर यांचे सकाळी बोलणे झाले. तळवलकरांनी काश्मीर अफेअर्सची जबाबदारी सोडले का, असे विचारताच, जॉर्जने नाही, असे काहीच नाही, असे उत्तर दिले. तोपर्यंत पेपरमध्ये छापून झाली होती. त्यामुळे तळवलकरांनी मला फोन करून ‘जॉर्जला भेटा’ असे सांगितले. घाईतच कृष्ण मेनन मार्गावरील जॉर्जच्या घरी गेलो. मला पाहताच, त्यांनी ‘काय रे, खोटी बातमी दिलीस?’ असा सवाल केला. त्यावर प्रतिवाद तरी काय करणार? पण माझी बातमी खरीच होती. तरीही ठीक आहे, तुमच्या नावाने खुलासा छापतो, असे त्यांना सांगितले. त्यावर ‘माझा खुलासा म्हणून छापू नकोस, स्वत:चा खुलासा म्हणून छाप,’ असे ते म्हणाले.
तोपर्यंत बातमी दिल्लीत पसरली होती. व्ही. पी. सिंग सकाळीच राष्ट्रपती. आर. वेंकटरामन यांना भेटायला गेले होते. ते बाहेर येताच पत्रकारांनी त्यांना घेरले आणि या बातमीविषयी विचारले, पण त्यांनीही बातमीचा इन्कार केला, पण मी बातमीवर ठाम होतो आणि घडलेही तसेच. एका आठवड्यात तर व्ही. पी. सिंग यांनी काश्मीर विभागच गुंडाळून टाकला.
जॉर्जच्या अशा असंख्य आठवणी आहेत, पण तो जॉर्ज मात्र नाही. जॉर्जशी संबंध येण्याचे कारण घरातले समाजवादी वातावरण. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष स. का. पाटील यांच्याविरुद्ध जॉर्जनी दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवायची ठरविली, तेव्हा मुंबईत समाजवाद्यांची फार काही ताकद नव्हती. त्या काळात माझ्यासह सारेच जण व्होटर्स स्लिपवर गिरगावातील मतदारांची नावे लिहीत बसायचो. वयाच्या नवव्या वर्षी जॉर्जचा असा पहिल्यांदा अप्रत्यक्ष संबंध आला.
जोगेश्वरीत समाजवाद्यांनी झोपडपट्टी परिषद घेतली होती. जॉर्ज, मृणाल गोरे, प. बा. सामंत, वडील व्यासपीठावर होते. ती उधळायला काही शिवसैनिक आले होते. ते कळताच, वडील व्यासपीठावरून खाली उतरले आणि थेट शिवसैनिकांपर्यंत गेले. त्यापैकी एकाने थेट चाकू काढला आणि वडिलांवर वार केले. वार चुकविण्यासाठी वडील वाकले. त्यामुळे दोन्ही वार डोक्यावर झाले. एक पुढे आणि एक मागे. मागचा वार खूपच खोल होता. मेंदूच्या जेमतेम पाव इंच मागे. वडील त्या हल्ल्यातून कसेबसेच वाचले.
पुढे जॉर्जच्या म्युनिसिपल मजदूर युनियनमध्ये पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी आली. त्या वेळी जॉर्ज केंद्रात उद्योगमंत्री झाले होते, पण युनियनमध्ये त्यांचे बारीक लक्ष असायचे. त्या वेळी तरुण कामगारांचे अभ्यासवर्ग घ्यावेत आणि त्यांचे वेगळे दल स्थापन करावे, अशी त्यांची इच्छा होती, त्याप्रमाणे ते केले. जॉर्ज हिंद मजदूर पंचायत व हिंद मजदूर सभा यांच्या विलीनीकरणाला आले, तेव्हा या तरुण कामगारांच्या दलाने त्यांना जी सलामी दिली, ती पाहून ते भलतेच खूश झाले आणि मला पाठीवर थाप दिली. जॉर्जच्या अशा असंख्य आठवणी आहेत... कधीही पुसल्या न जाणाऱ्या.
(लेखक लोकमतचे समूह वृत्तसमन्वयक आहेत.)
 

Web Title: George Fernandes in  News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.