कुस्तीला बळ देणारा भीष्माचार्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 06:15 AM2018-09-18T06:15:46+5:302018-09-18T06:16:05+5:30

वस्तादांच्या निधनामुळे माझ्यासह महाराष्ट्राचे कुस्तीक्षेत्र पोरके झाले आहे.

Ganpatrao Andalkars Demise Has Left A Void In Wrestling | कुस्तीला बळ देणारा भीष्माचार्य

कुस्तीला बळ देणारा भीष्माचार्य

Next

- दादू चौगुले

लालमातीसह मॅटवरील कुस्तीमध्ये कौशल्ये मिळविणारे हिंदकेसरी गणपतराव आंदळकर हे आयुष्यभर कुस्तीसाठी कार्यरत राहिले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या कुस्तीतील भीष्माचार्य हरपला आहे. पुनवत (जि. सांगली) या गावातून ते सन १९५० मध्ये कुस्तीसाठी कोल्हापुरातील मोतीबाग तालमीमध्ये दाखल झाले. उंचपुरा, देखणा आणि चपळ पैलवान अशी त्यांची महाराष्ट्राच्या कुस्तीमध्ये ओळख होती. घुटना डावासह स्वारी घालण्यात त्यांचे कौशल्य होते. लालमातीमध्ये त्यांनी कुस्तीचा सराव केला. त्याच्या जोरावर त्यांनी ‘मॅट’वरील कुस्तीमध्ये आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला. ‘मॅट’वरील कुस्तीत वर्चस्व असणाऱ्या उत्तर भारतातील मल्लांना त्यांनी आपल्या कुस्तीतील कौशल्य आणि ताकदीच्या बळावर अस्मान दाखविले. पाकिस्तानमधील मल्लांना त्यांनी चितपट केले. वस्ताद आंदळकर यांनी सन १९६० मध्ये ‘हिंदकेसरी’ची गदा पटकाविली. वयाच्या १५ व्या वर्षी मी कुस्तीसाठी सन १९६७ मध्ये मोतीबाग तालमीत दाखल झालो. याठिकाणी माझे वस्ताद पैलवान आंदळकर होते. कुस्तीसाठी आम्हा सर्व मल्लांकडून ते चांगली मेहनत करून घ्यायचे. त्यांनी माझ्यासह चंबा मुत्नाळ, विष्णू जोशीलकर, राम सारंग, संभाजी वरुटे असे अनेक पैलवान घडविले. पैलवान, मार्गदर्शक, संघटक अशा विविध भूमिकांतून त्यांनी कुस्तीला बळ दिले. कोल्हापूर शहर व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे ते पाच वर्षे अध्यक्ष होते. या पदावर कार्यरत असताना त्यांनी अनेक स्पर्धा घेऊन जिल्ह्यातील मल्लांना प्रोत्साहन दिले. मल्ल कुठल्याही तालमीतील, जिल्ह्यातील असूदेत, त्याला ते कुस्तीबाबत मार्गदर्शन करायचे. त्यामध्ये त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. देशभरात गाजलेला, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेला पैलवान, अत्यंत चारित्र्यवान, शालीन आणि संयमी माणूस अशी त्यांची ओळख होती. पैलवान पेशाला आणि लालमातीला बट्टा लागेल, असा व्यवहार त्यांनी कधी केला नाही. आयुष्यभर त्यांच्या अंगाला लालमातीचाच गंध राहिला. ते वस्ताद असूनदेखील अत्यंत संयमी होते. त्यांनी कधीच कुणावर टीका केली नाही. राजकारणात ते अडकले नाहीत. आयुष्यभर त्यांनी लालमातीशी इमान कायम राखलं. त्यांच्यासारखा पैलवान आणि वस्ताद देशात पुन्हा होणार नाही.
कुस्तीचा सराव करताना अंग दुखू लागले की, तालमीचा मी खाडा करीत होतो. त्यावेळी ते म्हणायचे कुस्तीचा सराव थोडा कर; पण तालमीचा खाडा करू नको. जुन्या किंवा नव्या पैलवानांकडून चुका झाल्यानंतर अधिकतर वेळा ते प्रेमाने समजावून सांगायचे. फारसे रागवयाचे नाहीत. कधीतरी तालमीतील आतील खोलीमध्ये नेऊन मारायचे ते, पण प्रेमाने. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी कुस्तीचा श्रीगणेशा केला. त्यांनी करून घेतलेली तगडी मेहनत, डावांच्या दिलेल्या माहितीच्या जोरावर मी कुस्तीतील यशाचे टप्पे पार करत गेलो. महान भारत केसरी, रुस्तुम-ए-हिंद किताबाचा मानकरी ठरलो. वस्तादांच्या निधनामुळे माझ्यासह महाराष्ट्राचे कुस्तीक्षेत्र पोरके झाले आहे.
‘हिंदकेसरी’ अथवा ‘महाराष्ट्र केसरी’चा किताब मिळाल्यानंतर अनेक मल्ल कुस्ती क्षेत्रापासून दूर जातात. आपली शेती, उद्योग अथवा घरामध्ये गुंतून उर्वरित आयुष्य व्यतित करतात; मात्र, त्याला वस्ताद आंदळकर हे अपवाद ठरले. हिंदकेसरीची गदा मिळाल्यानंतर ते थांबले नाहीत. कुस्तीला बळ देण्यासाठी ते कार्यरत राहिले.

(लेखक भारत केसरी, रूस्तुम-ए-हिंंद पैलवान खिताबाचे मानकरी आहेत.)

Web Title: Ganpatrao Andalkars Demise Has Left A Void In Wrestling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.