Ganpati Festival 2018 : प्रिय बाप्पा...!

By किरण अग्रवाल | Published: September 13, 2018 07:34 AM2018-09-13T07:34:40+5:302018-09-13T07:40:27+5:30

Ganpati Festival : प्रतिवर्षीचे आपले आगमन तसे नेहमी आम्हा पामरांमध्ये चैतन्य जागवून जात असतेच; पण यंदा ते अधिकचे चैतन्यदायी ठरले आहे कारण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण येत आहात.

Ganpati Festival : letter to Ganpati From devotee on various social issues | Ganpati Festival 2018 : प्रिय बाप्पा...!

Ganpati Festival 2018 : प्रिय बाप्पा...!

Next

प्रतिवर्षीचे आपले आगमन तसे नेहमी आम्हा पामरांमध्ये चैतन्य जागवून जात असतेच; पण यंदा ते अधिकचे चैतन्यदायी ठरले आहे कारण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण येत आहात. निवडणुकांचे नगारे वाजत असतानाच आपल्यासाठी ढोल वाजविण्याची वेळ यावी हा आपणच घडवून आणलेला योग असावा. आमच्या चैतन्यचक्षूंना हल्ली निवडणुकांमुळेच प्रोत्साहित होण्याची सवय जडू पाहत असल्याने त्याचे वेगळे महत्त्व आहे. आपण केवळ विघ्नहर्ता म्हणूनच नव्हे तर बुद्धिदाता म्हणूनही ख्यातकीर्त आहात. मनोकामना पूर्ती करणारे म्हणून आम्ही तुमच्याकडे मोठ्या आशा-अपेक्षेने पाहतो. त्या अपेक्षांच्या पूर्तीबाबत एरव्ही तुम्हालाही काही मर्यादा पडत असतील असे घटकाभर गृहीत समजू या; पण निवडणुका तोंडावर असल्याने तुम्हालाही काही मर्यादा येणार नाहीत. अर्थात त्यासाठी तुम्हाला वेगळे काही करायचे नाहीये. आमचे जे दाते आहेत त्यांचे तुम्ही सुबुद्धिदाते व्हा एवढेच. हा ‘सुबुद्धी’ शब्द एवढ्यासाठी की, गेल्यावेळी निवडणुका लढताना तुम्हीच दिलेल्या बुद्धीप्रमाणे त्यांनी काही स्वप्ने पेरली होती आमच्या मनात. आता येऊ घातलेल्या निवडणुकीनिमित्ताने ती पूर्ण करण्याची सुबुद्धी त्यांना व्हावी म्हणून हे मागणे.


बाप्पा, आमचे विद्यमान सरकार सत्तेवर येण्यापूर्वी खूप भ्रष्टाचार माजला होता म्हणे. तो दूर करण्याचे आश्वासन आम्हाला देण्यात आले होते. ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’, अशी घोषणा आम्ही आजही आठवतो. पण आमच्या स्थानिक यंत्रणातले अनुभव जाऊ द्या, कुठल्या त्या फ्रान्सकडून घेतलेल्या राफेल विमान खरेदीतली गडबडच मोठी दिसतेय. आश्चर्य म्हणजे, खरेदी केलेली विमाने ३६ आणि घोटाळ्याचा आकडा ४० हजार कोटींचा, आमचे तर डोळे गरगरायची वेळ आलीय. बाप्पा, तुमचे स्वत:चे वाहन मूषकराव, तुमचे बंधू कार्तिकेयजींचे वाहन मयूरेशराव, यावरच तुमची स्वारी असते. आम्हीही आतापर्यंत आपली एसटी व आगीनगाडीत आणि फार फार तर विमानात सफर करण्यात खूश होतो. पण आमच्या सरकारने काय म्हणतात ते ‘बुलेट ट्रेन’ आणलीये म्हणे. काळाप्रमाणे ती गरजेची आहे हेही खरे; पण त्यावर मोठा खर्च करण्यापेक्षा अगोदर आपली आहे तीच व्यवस्था सुधारावयाची बुद्धी द्या ना बाप्पा! या संदर्भात दोन दिवसांपूर्वीच तेलंगणामध्ये एका बस अपघातात ५२ जणांना जीव गमवावा लागल्याची घटना आपल्यासमोर आहेच की बाप्पा.


काळा पैसा बाहेर काढून आमच्या बँक खात्यात १५/१५ लाख रुपये भरण्याची घोषणाही गेल्यावेळच्या निवडणुकीत केली गेली होती बाप्पा. आता पुन्हा निवडणूक आली तरी त्यातले १०/५ टक्केही पैसे जमा झालेले नाही. तेव्हा आलाच आहात भूतलावरी तर तेवढी थोडेफार तरी पैसे जमा करायची सुबुद्धी द्या ना बाप्पा. नोकरी-धंद्याला लावायचेही सांगितले गेले होते; पण, कुठे काय? काहीच होत नाहीये. ना भुकेल्या तोंडाला घास आहे, ना रिकाम्या हाताला काम. त्यात महागाई कमी व्हायचं नाव घेत नाहीये. घरातली खाणारी तोंडे वाढली; पण तुमच्या प्रसादाचे मोदकच सव्वा किलोवरून पावशेर करायची वेळ आलीये. डॉलर व पेट्रोल - डिझेलमध्ये शंभरी पार करायची जणू स्पर्धा लागली आहे. आता तुम्हीच बोला कसा करायचा संसार? शेती आहे; पण त्याचही गणित काही जमेना. आमच्या सरकारनं शाश्वत शेतीचं स्वप्न दाखवलं; पण, ते होईना अन् घामाला दाम काही मिळेना. त्यामुळे बळीराजाचा श्वास गुदमरायची वेळ आलीय. बँकांकडे जावं तर भरोसा नाय आणि व्यापारी उधारीवर द्यायला तयार नाय. कारण नोटबंदीने साऱ्यांचंच कंबरडं मोडून ठेवलंय. कुणीबी खूश नाय आणि हसºया चेहºयाचा नाय. ‘स्टार्टअप’ व ‘मेक इन इंडिया’ व्हायचा तेव्हा होईल; पण आज विविधतेत एकता जपणारा आमचा भारत टिकून राहील का याचीच चिंता वाटायला लागली आहे. आता तुम्हीच सांगा बाप्पा, याला अच्छे दिन म्हणायचे काय? यांच्या घोषणाच लई भारी, पण दूर होईना कुठलीच बिमारी; अशी ही अवस्था आहे. तेव्हा ‘मन की बात’ खूप ऐकूनन झाली. आता आमच्या मन की बात आपल्याशिवाय कोण ऐकून घेणार? म्हणूनच विनवतो की, निवडणुकीत ‘अजेय’ व्हायचे असेल तर आश्वासनांवर ‘अटल’ राहण्याची संबंधिताना सुबुद्धी द्या बाप्पा!


जाता जाता आणखी एक सांगणं, तुम्ही आले की आपले भक्त खूपच चेकाळतात कुठे कुठे. तेव्हा आपल्या आनंदासाठी ‘डीजे’चा दणदणाट करून इतरांना उपद्रव होणार नाही, अशी बुद्धी द्या त्यांना. हल्ली रस्त्यावर अपघात वाढले आहेत. तेव्हा डोक्यावर ‘हेल्मेट’ घालायची व अनावश्यकरीत्या हॉर्न न वाजविण्याचीही अक्कल द्या. आत्महत्याही वाढल्या आहेत. जगात दरवर्षी सुमारे दहा लाख लोक आत्महत्या करतात, इतके नैराश्य वाढले आहे. त्यातही १५ ते २९ वयोगटातल्यांचे म्हणजे तरुणांचे प्रमाण मोठे आहे. बाप्पा, हे सर्वात अगोदर करा व अशांच्या मनातील आत्महत्येचा विचारच तुमच्या मूषकरावांना पाठवून ‘डिलीट’ करा. मनामनांचे असे ‘फॉरमॅट’ मारा की, संवेदनाहीन बनत चाललेल्या बोथट समाजमनात आश्वासकता, उभारी, चैतन्य, मांगल्य व प्रसन्नतेची नवी प्रकाशवाट अवतरेल. त्याच वाटेवर उभे राहून, गुलाल उधळून आम्ही आपल्या स्वागतास आतूर आहोत बाप्पा...

आपलाच,
एक भक्त बापुडा

Web Title: Ganpati Festival : letter to Ganpati From devotee on various social issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.