तारतम्य हवेच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 09:07 AM2018-09-26T09:07:04+5:302018-09-26T09:10:15+5:30

गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत साजरा झाला. पोलीस प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला असेल. उत्सवानंतर थोडे सिंहावलोकन, आत्मपरीक्षण करायला हवे, असे जरुर वाटते

Ganesh Festival Concludes, 20 Drown During Immersion Across Maharashtra | तारतम्य हवेच

तारतम्य हवेच

googlenewsNext

- मिलिंद कुलकर्णी

गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत साजरा झाला. पोलीस प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला असेल. उत्सवानंतर थोडे सिंहावलोकन, आत्मपरीक्षण करायला हवे, असे जरुर वाटते. विसर्जन काळात दोन घटना घडल्या. राज्यभरात २० गणेशभक्तांचा बुडून मृत्यू झाला. आणि न्यायालयाने बंदी घातल्यानंतरदेखील डीजेचा दणदणाट काही ठिकाणी कायम होता. या दोन्ही घटनांविषयी शांततेने, विवेकाने विचारविनिमय व्हायला हवा. आक्रस्ताळेपणा, आकांडतांडव करुन प्रश्न सुटणारे नाही. तारतम्य ठेवायला हवे. बाप्पांचे विसर्जन याविषयी अकरा दिवसांत खूप चर्वितचर्वण झाले. पर्यावरणपूरकतेकडे मोठा कल दिसून आला. शाडू मातीची मूर्ती, अंगणात बादली, हौदात विसर्जन ही संकल्पना हळूहळू रुजतेय. भाविकांचा प्रतिसाद लाभत आहे. समाजमाध्यमांवर छायाचित्रे टाकून जनजागृती केली जात आहे. पर्यावरणवादी संस्थांनी तलाव, नदीत विसर्जन करु नये, यासाठी प्रामाणिकपणे जनजागृती केली. त्याला अल्पसा प्रतिसाद मिळाला असला तरी किमान निर्माल्य तलाव, नदी पात्रात टाकू नये, हा प्रयत्न झाला. यंदा पाऊस कमी झाला आहे. तलाव, धरणे, नदीपात्रात जलसाठा कमी आहे. त्याठिकाणी विसर्जन केलेल्या मूर्ती तशाच पडून असल्याची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारीत झाली. काही स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन मूर्तीचे रितसर विसर्जन केले. वास्तवाचे भान राखले तर असे प्रकार टाळता येणे शक्य आहे, याचा विचार समाजाने करण्याची आवश्यकता आहे.

प्लॅस्टर आॅफ पॅरिस, रंगकाम केलेल्या मूर्तींमुळे तलाव, धरणे व नदींमधील पाणी दूषित होते. म्हणून शाडू मातीचा पुरस्कार केला जातोय. यासोबतच विसर्जन स्थळे ही धोकेदायक आहेत. पुरेशी सुरक्षा व्यवस्था असलेल्याठिकाणी विसर्जन करायला हवे. परंतु नदीपात्रात, तलावाच्याठिकाणी विसर्जन करताना दलदल, गाळात फसून निष्पाप मंडळींचे प्राण गेले. अशीच स्थिती ही डीजे संदर्भात आहे. डीजेचे फॅड अलिकडे आले. दणदणाट चुकीचा आहे. त्याचे दुष्परिणाम मोठे आहेत. त्यामुळे राज्य शासन व उच्च न्यायालयाने बंदीचा आदेश कायम राखला. बंदी आदेश डावलून काही ठिकाणी डीजेच्या दणदणाटात मिरवणुका निघाल्या तर या निर्णयाच्या निषेघार्थ काही मंडळांनी सार्वजनिक मिरवणुकीवर बहिष्कार घातला. काही उत्साही मंडळींनी याविषयात धार्मिकतेचा मुद्दा आणला. प्रार्थनास्थळावरील भोंग्यांना बंदी का नाही, असा सवाल विचारला. डीजे बाप्पाला नको असतो, आपल्याला हवा असतो, ही मुख्यमंत्र्यांनी केलेली टिप्पणी बोलकी आहे. कुणाला त्रास होईल, असे वागण्याचा अट्टाहास अनाकलनीय आहे. देखाव्यांसाठी महिनाभर रस्ते अडवून ठेवणे सामान्य नागरिकांच्या हालअपेष्टांमध्ये वाढ करण्यासारखेच आहे. ११ दिवसांच्या उत्सवाची किमान दहा दिवस आधी तयारी केली जाते. विसर्जनानंतर सगळे पूर्ववत व्हायला आणखी दहा दिवस जातात. वाहतूक कोंडी, मनस्ताप किती होतो, हे भक्त कधी समजतील कुणास ठावूक?
श्रध्देचा विषय, बहुसंख्याकांच्या सणाला विरोध, इतर धर्मीयांना सवलती का, असे विषय काढून समाजात समर्थक आणि विरोधक अशी दुफळी माजविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातून अकारण मतभेद, वादविवाद सुरु होतात आणि समाजातील वातावरण दूषित होते.

ज्याठिकाणी समंजस, सुबुद्ध नागरिकांनी गणेशोत्सवात सहभाग घेऊन चांगल्या परंपरा सुरु केल्या, त्याठिकाणी असे प्रकार घडत नाही. डीजे, गुलाल हद्दपार करीत पारंपरिक वाद्ये, फुलांच्या पाकळ्या, गोफ असे उपक्रम आवर्जून राबविले गेले. विसर्जनानंतर रस्ते आणि विसर्जन स्थळी स्वच्छता अभियान राबविण्यात स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार होता. लोकमान्य टिळकांनी देवघरातील गणपती मैदानात आणला आणि या उत्सवाला सार्वजनिक स्वरुप दिले. हे स्वरुप देत असताना त्याला विधायक वळण देण्याचे कार्य वेळोवेळी होत गेले. ज्या काही अनिष्ट बाबी होत असतील त्या कधी कायद्याने तर कधी सामंजस्याने दूर करायला हव्यात. तरच हा उत्सव सामान्यांना आनंददायक, मंगलमय वाटेल.

Web Title: Ganesh Festival Concludes, 20 Drown During Immersion Across Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.