पोलीस निरीक्षकावर गोळीबार आणि पुन्हा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.... 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 06:42 PM2018-11-22T18:42:56+5:302018-11-22T18:52:48+5:30

गुन्हेगारांवर पूर्वी पोलिसांचा जो धाक होता तो कमी झाला आहे़. त्याचा परिणाम गुन्हेगार असे बिनधास्त पोलिसांवरही गोळीबार करु लागले आहेत़.

Firing of police inspector and issue of safety once again front .... | पोलीस निरीक्षकावर गोळीबार आणि पुन्हा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.... 

पोलीस निरीक्षकावर गोळीबार आणि पुन्हा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.... 

Next
ठळक मुद्देपुणे रेल्वे स्टेशनवर बुधवारी गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार हत्यार बाळगणाऱ्या गुन्हेगारांना पकडताना पोलिसांनी स्वत:च्या सुरक्षेची अगोदर काळजीभारतीय दंडविधान कायद्यानुसार प्रत्येकाला स्व: संरक्षणाचा अधिकार

- विवेक भुसे- 

एका बाजूला गुन्हे उघडकीस आणण्याचे टेन्शन तर दुसरीकडे हत्यार बाळगणाऱ्या गुन्हेगारांशी सामना करण्याचे आव्हान या कात्रीत अडकलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अनेकदा जीवावर उदार होऊन गुन्हेगारांना पकडायला जातात़. अनेकदा त्यात त्यांना यशही येते़ त्यावेळी त्यांनी किती धोका पत्करला होता, याची चर्चा होत नाही़. पण, एखाद्या प्रकरणात गुन्हेगारही जीवावर उदार झालेला असतो़. एक खुन केला तरी इतकीच शिक्षा आणि दोन खुन केले तरी तितकीच शिक्षा. ते मग पोलिसांच्या हाताला लागण्यापेक्षा त्यांच्यावर गोळीबार करुन सुटण्याचा प्रयत्न करतात़. अशातून एखादा पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी जेव्हा जखमी होतो, तेव्हा पोलिसांनी स्वत:च्या सुरक्षेची जबाबदारी अगोदर घेण्याची गरज नव्हती का असा प्रश्न उपस्थित होतो़ 
पुणे रेल्वे स्टेशनवर बुधवारी गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेले पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर झालेल्या गोळीबाराने संपूर्ण पुणे पोलीस दल हादरुन गेले आहे़. सुदैवाने या हल्ल्यातून ते बचावले असून आता त्यांची प्रकृती सुधारत आहे़. मात्र, त्याचवेळी अशा हत्यार बाळगणाऱ्या गुन्हेगारांना पकडताना पोलिसांनी स्वत:च्या सुरक्षेची अगोदर काळजी घेतली पाहिजे की नाही़. 
अनेकदा गुन्हेगार शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळते़ ते वरिष्ठांना सांगून त्या ठिकाणी जातात़. पण, गुन्हेगाराजवळ पिस्तुल आहे, तो उलट हल्ला करु शकतो, याची शक्यता खूप असते़. अनेकदा अतिशय जोखीम पत्करुन पोलीस त्याला पकडतात़. त्यात त्यांना यशही येते़. त्यामुळे त्यांनी स्वत:चा जीव किती धोक्यात घातला आहे, याची कोठेही चर्चा होत नाही़. पण कधी तरी गुन्हेगारही स्वत:च्या जीवावर उदार झालेला असतो़ त्यातून तो पोलिसांवर फायरिंग करतो़ त्यात एखादा पोलीस जखमी झाला तर, त्याचा संपूर्ण पोलीस दलावर परिणाम होतो़ पोलिसांनी खबरदारी का घेतली नाही, असे विचारले जाऊ लागते़. 
याबाबत निवृत्त पोलीस अधिकारी वसंतराव कोरेगावकर यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, कोणतीही नोकरी म्हटले की त्यात रिस्क असते़. जवान जेव्हा सीमेवर जातो तेव्हा कोठूनही गोळीबार होईल व आपल्या प्राण घेतले जाऊ शकते याची त्याला जाणीव असते़. तसेच एखादा गुन्हेगार आपल्यावर हल्ला करु शकतो, हेही पोलिसांनी नोकरी प्रवेश केला तेव्हापासूनच त्याला माहिती असते़. हत्यार बाळगणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी जेव्हा पोलीस जातात, तेव्हा ते आपल्यापरीने काळजी घेत असतात़. परंतु, अनेकदा प्रत्यक्ष स्पॉटवरील परिस्थिती वेगळी असते़. त्यावेळी संबंधित अधिकारी त्या क्षणाला सुचेल तसा निर्णय घेतो़. त्यातून अशा अनपेक्षित घटना घडू शकते़. त्यामुळे अशा घटनांना सामोरे जाण्याची तयारी ठेवून जास्तीत जास्त खबरदारी पोलिसांनी घेतली पाहिजे़. 
निवृत्त पोलीस अधिकारी शरद अवस्थी म्हणाले, पोलिसांना ना कायद्याचे सरंक्षण, ना समाजाचे त्यामुळे आता ते अनाथ झाले आहेत़. मानवाधिकार आयोगाचा उद्देश जरी चांगला असला तरी त्याचा फायदा फक्त गुन्हेगारांना झाला आहे़. एखाद्या चकमकीत गुन्हेगाराचा मृत्यु झाला तर त्याची लगेच चौकशी होते़. त्याच्या कारवाईवर संशय निर्माण केला जातो़. मानवाधिकार कार्यकर्ते म्हणवून घेणारे त्या गुन्हेगारासाठी सरसावतात़. पण एखादा पोलीस अधिकारी, कर्मचारी गुन्हेगारांच्या गोळीबाराने मृत्यु पावला अथवा गंभीर जखमी झाला तर हेच मानवाधिकार कार्यकर्ते म्हणविणारे पुढे येत नाही़. 
भारतीय दंडविधान कायद्यानुसार प्रत्येकाला स्व: संरक्षणाचा अधिकार आहे़. मात्र, हा अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना कायमच नाकारला जातो़. त्यामुळे तो दुसरीकडे गुन्हेगारांना पकडून त्यांना शिक्षा व्हावी, याचे दडपण असते़ आणि त्यात पुन्हा इन्काऊंटर झाला तर पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात केले जाते. ते वेगळेच़ त्यामुळे आता पोलीस इन्काऊंटर करायला धजावत नाही़. त्यामुळे गुन्हेगारांवर पूर्वी पोलिसांचा जो धाक होता तो कमी झाला आहे़. त्याचा परिणाम गुन्हेगार असे बिनधास्त पोलिसांवरही गोळीबार करु लागले आहेत़. जर गुन्हेगारांचा वाढता धुडगूस रोखायचा असेल तर पोलिसांना खुलेपणाने कारवाई करायला पाठिंबा दिला पाहिजे़ नाहीतर आता पोलीस प्रोटेक्शन फोर्स काढायची वेळ आली आहे़. 


 

Web Title: Firing of police inspector and issue of safety once again front ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.