- कौमुदी गोडबोले

दीपोत्सवाच्या आनंदपर्वाचा काळ म्हणजे दीपावली! दिव्यांच्या प्रकाशानं दु:खाचा अंध:कार दूर होतो. तमोगुण मागे सरतो. काम, क्रोध, लोभाला दृूर करण्याचा प्रकाशोत्सव असलेली दीपावली! मना-मनातला अंधार मिटवून मनाला उजळवून टाकणारी! दिव्यांचा नित्यनूतन उत्सव ईश्वराच्या प्रांगणात चालू असतो. त्याचा आनंद आपण घेत असतो. दीपावलीत भूतलावावरील छोट्या-छोट्या पणत्यांपासून मोठमोठ्या समया संध्यासमयी तेवतात तेव्हा सर्वत्र स्वर्ग अवतरल्यासारखं वाटतं.
लहानपणी प्रचंड थंडीत गरम गरम पाण्यानं स्नानं करण्यात मजा यायची. सुगंधी तेलाचा, उटण्याचा आणि मायेच्या हाताचा स्पर्श दीपावलीच्या स्नानाला येत राहायचा. वर्षातून एकदा, दोनदाच नवे कपडे मिळायचे. आता ढीगभर कोरे कपडे असतात पण बालपणीच्या दीपावलीला समस्त भावंडांना मिळणाºया मोजक्या कपड्यांचं अप्रूप, कौतुक त्यामध्ये नाही. मनमुराद हास्य, मनमोकळं फराळावर ताव मारणं याची मजा आताच्या दीपावलीमध्ये हरवून गेली. अंत:करणामध्ये निखळ आनंद, एकमेकांविषयीची ओढ आता सापडत नाही. नात्यामध्ये, समाजामध्ये स्नेहाचा अभाव आणि उपचारांचा दिखाऊपणा आल्यामुळे फराळाचे पदार्थ, कोरे कपडे, फटाके याची रेलचेल असली तरी दिवाळीचा सात्विक आनंद मात्र दूर गेला.
शेणानं सारवून त्यावर रेखलेली रंगावली स्मरते. आता अंगणही नाही आणि शेणाचे सडेदेखील नाहीत. सगळीकडे टाईल्सचा चकचकाट झाल्यामुळे अंगणाच्या मातीचा स्पर्शही पायांना होत नाही.
आता दीपावली वेगवेगळ्या ठिकाणी किंवा हॉटेलमधून साजरी करण्याची फॅशन आहे. प्रेम, माया, आपुलकी यामधून प्रत्येक दीपावलीला प्राप्त होणारा निखळ आनंद पार हरवला आहे.
दीपावली मनातल्या, कुटुंबातल्या, समाजातल्या निखळ आनंदाचा संदेश प्रकाशोत्सवातून देते. दीपोत्सव, प्रकाशोत्सव, आनंदोत्सव अशा तीन उत्सवांचा सुरेख संगम दीपावली सणामध्ये होतो. आशयसंपन्न असणाºया या सणामधून आपलं आयुष्य आशयघन करण्याचा मन:पूर्वक प्रयास केला तर खºया अर्थानं दीपावलीच्या प्रकाशानं जीवन उजळून जाईल.