फेकाड्या पत्रकाराच्या नावानं

By संदीप प्रधान | Published: April 6, 2018 12:10 AM2018-04-06T00:10:19+5:302018-04-06T00:11:09+5:30

बबन बोचकारे गावातील ‘दैनिक गडगडाट’चा पत्रकार. जाड चष्मा, अघळपघळ कपडे, पायात अर्धवट चढवलेल्या चपला घालून दुडक्या चालीनं चालणारा आणि बोलताना तोंडातल्या किडक्या दातात जीभ घोळवत बोलणारा. बबनच्या बातम्यांनी गावाची करमणूक व्हायची.

 Faka journalist | फेकाड्या पत्रकाराच्या नावानं

फेकाड्या पत्रकाराच्या नावानं

Next

बबन बोचकारे गावातील ‘दैनिक गडगडाट’चा पत्रकार. जाड चष्मा, अघळपघळ कपडे, पायात अर्धवट चढवलेल्या चपला घालून दुडक्या चालीनं चालणारा आणि बोलताना तोंडातल्या किडक्या दातात जीभ घोळवत बोलणारा. बबनच्या बातम्यांनी गावाची करमणूक व्हायची. मात्र, गावातील नगराध्यक्ष मारोतराव उंदीरमारे यांचा बबनवर दात होता. मारोतराव उंचपुरे, आडवेतिडवे व्यक्तिमत्त्व. सतत घामाघूम होत असल्याने त्यांचा वर्ण उन्हात चमकणाऱ्या डांबरी रस्त्यासारखा दिसायचा. ही भेसूरता कमी म्हणून की काय, त्यांच्या विशाल कपाळावर कुºहाडीच्या घावाची खोलवर खूण होती. मारोतराव रस्त्याने जायला लागले की, लहान मुलांच्या विजारी ओल्या व्हायच्या. बबनला त्यांनी नेहमीच बबन्या, बोचक्या किंवा बोरूनळ्या अशा शेलक्या हाकांनी पुकारत. बबन हा फेकाड्या पत्रकार आहे, असे मारोतराव उच्चरवात गावभर सांगायचे. बबन सहसा त्यांच्या वाºयाला उभा राहायचा नाही. पण, कधी दोघे आमनेसामने झालेच तर बबन तोंडातल्या किडक्या दातात जीभ खुपसून मारोतराव, मग टाकाना मला जेलात. म्हणजे मीही महात्मा होईन, असं तोंडातल्या तोंडात बोलायचा. सायकलवर टांग टाकताना उद्याचा गडगडाट वाचायला विसरू नका, असा धमकीवजा इशारा द्यायला विसरायचा नाही. नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असल्यानं बबनच्या पायाला भिंगरी लागली होती. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, पत्रकार परिषदा याची जबाबदारी बबनवर होती. दैनिक गडगडाटचे मालक, संपादक दिवाकर सुकडकर सतत बबन, हे कर अन् ते कर, अरे बबन लवकर पळ, तो ३६ नंबरचा संभाव्य उमेदवार जाहिरात देतोय, धावत जा... अशा सूचना देऊन बबनला धावडवत होते. दमलाभागला बबन एका उद्यानात जाऊन बसला आणि त्याचा डोळा लागला. त्याला जाग आली तेव्हा अंधार दाटून आला होता. सायकल मारत तो कार्यालयात आला, तर सुकडकर गडगडाट करू लागले. बबन, अरे त्या मारोतरावाच्या सभेची बातमी दे. बबनने बातमी लिहून सुकडकरांच्या समोर ठेवली, तसे ते विजेचा शॉक लागल्यागत ओरडले... बबन, परवा हेच भाषण केलं ना त्या नंदीबैलानं. तेच पुन्हा छापू? नवीन मुद्दा इंट्रोत घे. आता आली का पंचाईत. बबन सभेलाच गेला नसल्यानं त्याला मारोतरावाच्या भाषणातील शब्दही ठाऊक नव्हता. तेवढ्यात, त्याला एक शक्कल सुचली. त्याने नवा इंट्रो करून बातमी दिली. सुकडकरांचे डोळे विस्फारले. दुसºया दिवशी दैनिकाचा मुख्य मथळा होता... ‘पुन्हा संधी दिली तर प्रत्येकाच्या खात्यात १५ हजार जमा करणार - मारोतराव’. दुसºया दिवशी बबनला गाडीत कोंबून मारोतरावांच्या समोर उभा केला, तेव्हा गडगडाटचे संपादक सुकडकर त्यांच्या पायावर गडबडा लोळत होते. ‘या फेकाड्या पत्रकाराला अगोदर घरी पाठवा’, असे फर्मान मारोतरावांनी सोडले आणि बबनच्या पत्रकारितेला पूर्णविराम मिळाला. चार दिवस बबन गावात दिसला नाही. नंतर, अगोदर बबनची पोस्टर लागली आणि तोच प्रचारफेरीत दिसला. विरोधी पक्षाचा उमेदवार या नात्याने. मारोतराव लोकांना मूर्ख बनवतोय, या प्रचारानं त्यांचं डिपॉझिट जप्त झालं. आता बबन बोचकारेचा ‘बबनराव’ झाला. त्यात तो नगराध्यक्ष झाला. आता मारोतराव रस्त्यात दिसले की, बबन गाडी थांबवून हाका घालतो, अरे उंदºया, पडेलपैलवाना कुठं पळतोयस...
 
 

Web Title:  Faka journalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.