खरंय...पीयूष गोयल म्हणजे बंधू भरत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:11 AM2018-05-25T00:11:44+5:302018-05-25T00:11:44+5:30

अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाचा पूर्ण पदभार सोपविण्यात आला असतानाही त्यांनी नॉर्थ ब्लॉकला वारंवार भेटी देणे टाळले आहे.

In fact ... Piyush Goyal is brother Bharat ... | खरंय...पीयूष गोयल म्हणजे बंधू भरत...

खरंय...पीयूष गोयल म्हणजे बंधू भरत...

Next

हरीश गुप्ता

नॉर्थ ब्लॉक म्हणजे सुरस कथांचा अड्डाच. सरकारमध्ये यापूर्वी कधीही न ऐकलेल्या गोष्टी तेथे ऐकायला मिळतात. नवनियुक्त अर्थमंत्री पीयूष गोयल पदभार स्वीकारताच मंत्रालयात गेले तेव्हा सचिवांसह झाडून सारे वरिष्ठ अधिकारी त्यांचे अभिनंदन करायला त्यांच्या चेंबरमध्ये गेले होते. औपचारिक बैठकीसाठी बनविलेल्या खास खुर्चीवर न बसता मंत्रिमहोदय सोफ्यावर बसलेले बघून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. जेटली यांचा स्वीय कर्मचारी वर्ग बदलण्यात आला नाही. त्यांना पूर्वीप्रमाणेच काम करण्याचा पहिला आदेश गोयल यांनी जारी केला. गोयल यांनी आपल्या पसंतीच्या एकाही व्यक्तीला या मंत्रालयात आणले नाही. अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाचा पूर्ण पदभार सोपविण्यात आला असतानाही त्यांनी नॉर्थ ब्लॉकला वारंवार भेटी देणे टाळले आहे. रेल्वे मंत्रालयात ते अधिक काळ बसून असतात. अर्थमंत्रालयाच्या वेबसाईटवर नवे अर्थमंत्री म्हणून गोयल यांचे नाव झळकल्यानंतर काही तासातच पुन्हा अरुण जेटली हेच अर्थमंत्री असल्याचे दर्शविण्यात आले. अर्थमंत्रालयाचे अधिकारी आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत बैठकी घेतानाही त्यांनी जेटलींच्या खुर्चीचा ताबा घेतलेला नाही. रामायण काळात राम १४ वर्षे वनवासाला गेले तेव्हा बंधू भरत याने राजसिंहासनाचा ताबा घेतला नव्हता. प्रभू रामाच्या पादुका (खडावा) आसनावर ठेवूनच त्याने राज्य केले. गोयल यांनी नेमके तेच केले आहे. जेटलींवर एम्समध्ये किडनी प्रत्यारोपण झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गोयल हे रुग्णालयात जाऊन नियमितपणे त्यांची भेटही घेतात. गोयल हे नवे अर्थमंत्री असतील असे वृत्त रॉयटर या वृत्तसंस्थेने दिले होते. दोन वर्षानंतर ते वृत्त खरे ठरले आहे. सध्या त्यांच्याकडे रेल्वे, कोळसा, अर्थ आणि कंपनी व्यवहार ही चार महत्त्वाची खाती आहेत. चीअर्स भरत भाई...
कर्नाटकमधील आघाडीमागे
सोनिया नव्हे तर राहुल गांधी
कर्नाटकमध्ये निवडणुकीनंतर जद(एस) सोबत आघाडी स्थापन करण्यामागे महत्त्वाची भूमिका बजावण्यात सोनिया गांधी नव्हे तर पक्षाध्यक्ष राहुल गांधी अग्रेसर होते. मतदानाचे निकाल बाहेर येऊ लागताच काही तासातच काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर राहुल गांधी यांनी सूत्रे हाती घेत प्रदेश नेत्यांना निर्देश दिले. त्यांनी प्लान ए, प्लान बी आणि प्लान सी वर चर्चा केली. निवडणूक जिंकली नाही तर काय करायचे ही योजना त्यांच्याकडे तयार होती. या राज्यातील सत्तेच्या खेळात डी.के.शिवकुमार यांचे नाव अचानक प्रकाशझोतात आले.
दक्षिण कर्नाटकमध्ये जद (एस) हाच मुख्य स्पर्धक असून तेथे काँग्रेसची स्थिती वाईट राहील, असे शिवकुमार यांनी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना कळविले होते. पक्षाला कमी जागा मिळाल्यास सत्तेसाठी कोणत्याही वाटाघाटी करायच्या नाहीत, असे राहुल गांधी यांनी आधी स्पष्ट केले होते. मात्र संख्याबळ पाहता त्यांनी वेणुगोपाल यांच्याकडे जद (एस) सोबत हातमिळवणी करण्याची तर अशोक गहलोत आणि गुलाम नबी आझाद यांच्याकडे एच. डी. कुमारस्वामी यांचे खास निकटस्थ दानिश अली यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी सोपविली. निकालाच्या दोन दिवस आधीच म्हणजे १३ मे रोजी रविवारी राहुल गांधी कुमारस्वामी यांच्याशी बोलले. त्यानंतर सोनिया गांधी यांनी माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांना फोन केला. सिद्धरामय्या यांना विरोधात बसायचे होते, मात्र २०१९ मधील मोठे आव्हान पाहता राहुल गांधी यांनी त्यांचे मन वळविले. गुलाम नबी आझाद यांनी त्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. १९९७ मध्ये काँग्रेसने पाठिंबा मागे घेतल्यामुळे एच. डी. देवेगौडा यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यात आपली कोणतीही भूमिका नव्हती असे सांगत सोनियांनी देवेगौडा यांचा रोष शांत केला, असे कळते.
अमित शाह यांनी
कसे गमावले कर्नाटक
भाजपचे अध्यक्ष अमित शाह कर्नाटकमध्ये सहा महिन्यांपूर्वी पक्षाच्या विजयासाठी काम करत होते. खरं तर त्यांच्या जवळचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल हे एच. डी. देवगौडा आणि त्यांचा मोठा मुलगा रेवेन्ना यांच्या नियमित संपर्कात होते.
देवगौडा यांचे कट्टर प्रतिस्पर्धी सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री केल्यापासून ते काँग्रेसवर नाराज होते. पीयूष गोयल यांनी मार्चमध्ये गौडा यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याचे वृत्त लोकमतने प्रथम प्रकाशित केले होते. गौडा यांच्या मतदारसंघातील रेल्वे प्रकल्पांविषयी चर्चा करण्यासाठी त्यांच्या घरी गेल्याची सारवासारव नंतर त्यांनी केली होती. शाह आणि गोयल यांनी त्यांना एका मुलाला उपमुख्यमंत्रिपद आणि दुसºया मुलाला केंद्रात कॅबिनेटपद देण्याची आॅफर दिली होती. गठबंधन निवडणुकीनंतर होणार होते. त्यामुळेच सर्व भाजप नेत्यांनी संपूर्ण मोहिमेदरम्यान जनता दल (एस) यांच्यावर टीका केली नाही. पंतप्रधानांनी देवगौडाची स्तुती केली. भाजपने केवळ राहुल आणि त्यांच्या पक्षाला लक्ष्य केले. शाह यांनी मुंबईत कुमारस्वामी यांचीही भेट घेतली होती. पीयूष गोयल यांनी या बैठकीचे आयोजन केल्याचे वृत्त होते. हा फॉर्म्युला असा होता की, जर भाजप बहुमतापेक्षा कमी असेल तर तो जेडी (एस) यांच्याशी निवडणुकीनंतर युती करून सत्तेत येईल. पण कुमारस्वामी यांनी राहुल गांधी यांची मुख्यमंत्रिपद देऊ करण्याची आॅफर स्वीकारली.

लालूप्रसाद गांधी यांच्यावर नाराज
लालूप्रसाद यादव सोनिया आणि राहुल गांधी यांच्यावर नाराज आहेत. याचे कारण राजकीय नसून व्यक्तिगत आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी लालूप्रसाद यादव यांना त्यांचा मुलगा तेजप्रताप सिंग याच्या १२ मे रोजी झालेल्या लग्नसमारंभात उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले होते. कर्नाटक निवडणुकीनंतरच हा दिवस निश्चित केला होता. लालूप्रसाद यांना लग्नसमारंभात विरोधकांची एकजूट दाखविण्याची इच्छा होती. लालूप्रसाद यांनी त्यांच्यासाठी चार्टर्ड विमान आणि राहण्याची विशेष व्यवस्था केली होती. पण ते लग्नसमारंभात आले नाहीत. कारण काय? कुणाला माहीत नाही, पण दोन आठवड्यापूर्वीच राहुल गांधी यांनी एम्समध्ये लालूप्रसाद यांची भेट घेतली होती. पण आश्चर्य म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार लग्नाच्या वेळी उपस्थित होते. कदाचित आपले पर्याय खुले असल्याचा संदेश त्यांना भाजपा नेत्यांना द्यायचा असेल. भाजपा नेत्यांनी जनता दलासोबत (यू) लोकसभा जागेच्या वाटपासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली नाही.
नितीश यांची अमित शाह यांची भेट घेण्याची इच्छा होती. पण अमित शाह यांनी त्यांना भूपेंद्र यादव यांचेशी चर्चा करावी असे सुचविले, यावर नितीश नाराज झाले आणि त्यांनी उपरोक्त संकेत दिला. आता येत्या महिन्यात बिहारमध्ये अनेक घडामोडी होण्याची शक्यता आहे.

Web Title: In fact ... Piyush Goyal is brother Bharat ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.