प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीतील भेदाभेद अमंगळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 02:40 AM2019-03-27T02:40:24+5:302019-03-27T02:40:40+5:30

नाटक असो किंवा चित्रपट - प्रायोगिक (चित्रपटाच्या बाबतीत समांतर) आणि व्यावसायिक हा भेद गेली अनेक वर्षे आपल्याकडे जोपासला, चर्चिला जातोय. गेल्या काही वर्षांच्या काळात पाहिले, तर चित्रपट नि नाटक दोन्हींमध्ये हा भेद अगदी पुसट होत गेलेला आहे.

 Experimental and commercial playground differences | प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीतील भेदाभेद अमंगळ

प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीतील भेदाभेद अमंगळ

googlenewsNext

- श्रीनिवास नार्वेकर (रंगकर्मी)

नाटक असो किंवा चित्रपट - प्रायोगिक (चित्रपटाच्या बाबतीत समांतर) आणि व्यावसायिक हा भेद गेली अनेक वर्षे आपल्याकडे जोपासला, चर्चिला जातोय. गेल्या काही वर्षांच्या काळात पाहिले, तर चित्रपट नि नाटक दोन्हींमध्ये हा भेद अगदी पुसट होत गेलेला आहे. मुळात हा भेद निर्माण झाला कशातून? आजच्या जागतिक रंगभूमीदिनानिमित्त हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
आजही अनेकांची अशी धारणा आहे की, कमी पैशांत केलेले, नेपथ्य-प्रकाशयोजना-संगीत यांचा फार तामझाम नसलेले नाटक म्हणजे प्रायोगिक आणि भरपूर खर्च नि जाहिरात करून केलेले नाटक म्हणजे व्यावसायिक. या लेखाच्या निमित्ताने केवळ माझेच नाही, तर प्रातिनिधिकरित्या अनेकांचे मत मी मांडू इच्छितो की, प्रायोगिक-व्यावसायिकची ही व्याख्या चुकीचीच आहे, फार पूर्वी कधी काळी असेलही ही व्याख्या. प्रायोगिक-व्यावसायिकची ही व्याख्या बळकट करण्यासाठी दोन्ही घटक जबाबदार राहिलेले आहेत- नाटक निर्मिती करणारी मंडळी आणि प्रेक्षक. निर्मिती करणारी मंडळी म्हणजे केवळ निर्माता नव्हे, तर लेखकापासून सर्व तंत्रज्ञ आणि कलाकारांपर्यंत. व्यवसाय करू शकणारे नाटक ते व्यावसायिक नाटक, असे सरळसरळ सूत्र असताना एखादे प्रायोगिक नाटक व्यवसाय करू शकत नाही का? माकडाच्या हाती शॅम्पेन, फायनल ड्राफ्ट ही मूळ प्रायोगिक समजल्या जाणाऱ्या रंगभूमीवरचीच नाटके होती, पण त्यांनी उत्तम व्यवसाय केला. तसेच उत्तम व्यावसायिक नाटक म्हणून करायला घेतलेली अनेक नाटके पडलीही.
प्रेक्षक हा घटक आजच्या घडीला फार महत्त्वाचा आहे, असे मला वाटते. तो फार संमिश्र आहे. त्याला नेमके काय आवडते, याचा नेमका अंदाज बांधता येत नाही, पण म्हणून त्याला आवडणारे ते व्यावसायिक आणि न आवडणारे ते प्रायोगिक असे सूत्र नाही ना मांडता येत किंवा व्यावसायिक म्हणजे हलकंफुलकं किंवा प्रायोगिक म्हणजे जडजंबाळ, काहीही न कळणारे, अशा ढोबळ व्याख्यांमुळे आणि त्या व्याख्या बळकट करू पाहणाऱ्या अनेकांमुळे हा भेद अधिक गडद होत गेला, पण आज पार बदललेय सगळे. आज नाटक बदललेय, नाटकामागचा विचार बदललाय, नाटकाचा प्रेक्षक बदललाय, एकूणच रंगावकाशही बदललाय. हा बदल चांगला-वाईट हा त्यापुढला आणि वेगळ्या चर्चेचा (किंवा कदाचित वादाचा) मुद्दा! पण या बदलामध्ये ही रेषा पार पुसट झालेली आहे.
प्रायोगिकता ही मुळात आशयात, विचारात असावी लागते. नेपथ्य असेल, प्रकाशयोजना असेल, पार्श्वसंगीत असेल, त्यामध्ये प्रायोगिकता असावी लागते. कोणत्याही गोष्टीमध्ये ‘प्रयोग’ करू पाहणारे नाटक म्हणजे प्रायोगिक. (व्यावसायिक) रंगभूमीवर आलेली कितीतरी नाटके रूढ, चाकोरीबद्ध व्यावसायिक नाटकांची व्याख्या बदलू पाहणारी आहेत. अगदी खानोलकरांच्या ‘अवध्य’पासून टूरटूर, ध्यानिमनी, चारचौघी, चाहूल, जाऊबाई जोरात, देहभान, कोडमंत्र किती नावे घ्यावीत! सध्या जोरात सुरू असलेले आणि चांगला व्यवसाय करत असलेले ‘देवबाभळी’ हे खरे तर आशय-विषय-मांडणी सर्वार्थाने उत्तम प्रायोगिक नाटक आहे. कारण त्यामध्ये लेखनापासून सादरीकरणामध्ये कितीतरी ‘प्रयोग’ केले गेले आहेत आणि ते प्रेक्षकांना आवडत आहेत. याचा नेमका विचार करून आता ही रंगभूमी नव्याने उभी राहायला हवी. त्यासाठी मर्यादित चौकटीपल्याड विचार करायला हवा.
प्रायोगिक-व्यावसायिक ही दरी मिटविण्यासाठी लेखक, निर्माते आणि प्रेक्षक हे तिन्ही घटक वेगळ्या अर्थाने समृद्ध व्हायला हवेत आणि हे समृद्ध होण्याचे प्रमाण वाढणे गरजेचे आहे. रंजन, करमणूक, मनोरंजन या शब्दांची व्याख्याच आज बदललेली आहे. केवळ हसणे-हसविणे म्हणजे मनोरंजन ही घातक व्याख्या रूढ होत चालली आहे. एखादी शोककथासुद्धा आपले मन रिझवू शकते, याचा विचार फार कमी वेळा होतो. क्युबन लेखक-दिग्दर्शक-प्रशिक्षक प्राध्यापक कार्लोद सेल्ड्रान आजच्या जागतिक रंगभूमी दिनानिमित्ताने दिलेल्या संदेशात म्हणतात की, रंगभूमी हे एक वेगळेच स्वतंत्र विश्व आहे. तुम्ही जिथे जाल, तिथे तुम्हाला तुमचा प्रेक्षक सापडेल, तुम्हाला तुमचे सहकलाकार सापडतील. बसल्या जागेवरून तुम्ही काहीही निर्माण करू शकता. फक्त तुमच्या त्या परीघापलीकडे पाहण्याची नजर हवी.
मला वाटते, ही अशी नजर आपल्यामध्ये निर्माण झाली, तर भविष्यात आपल्याकडला प्रायोगिक-व्यवसायिक हा भेदाभेद पूर्णपणे मिटून जाईल आणि चांगले किंवा वाईट अशी दोनच नाटके उरतील. त्यातही चांगल्याची आशा अधिक. आणखी काय बोलू?

Web Title:  Experimental and commercial playground differences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Natakनाटक