भोग, योग आणि त्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:52 AM2018-05-24T00:52:03+5:302018-05-24T00:52:03+5:30

गीतेची संपूर्ण शिकवण पाहिली तर जागोजागी कर्माचा त्याग करू नका

Enjoyment, yoga and sacrifice | भोग, योग आणि त्याग

भोग, योग आणि त्याग

googlenewsNext

डॉ. रामचंद्र देखणे
जगासाठी एखादी गोष्ट निरपेक्षपणे करणे हाही मोठा त्यागच आहे. निसर्गातील सर्वच घटक त्यागाच्या भूमिकेतून उभे आहेत. ज्ञानेश्वर माऊलींनी वृक्षाला त्यागाचे मूर्तिमंत प्रतीक म्हणून गौरविले आहे.
हां तो त्याग तरुवरू।
जो गा मोक्षफळे ये थोरू।
सात्विक ऐसा डगरु।
यासीची जगी।।
वृक्ष स्वत: उन्हात उभे राहतो. सावली मात्र इतरांना देतो. फळांच्या भाराने वाकतो ती फळेही इतरांना देऊन टाकतो. एवढेच काय, पण पाने, फुले, लाकूड हेही सारे दुसऱ्यांसाठीच. कर्तेपणाचा अहंकार आणि कर्मफलाची लालसा नसलेला हा वृक्ष त्यागी पुरुषाचेच महान प्रतीक आहे. त्याग ही परेश्वराने मानवाला दिलेली एक अद्वितीय देणगी आहे. त्यागात समर्पणाची भूमिका आहे आणि कृतार्थतेचा आनंदही. भोग सोडला की त्याग घडतो आणि या त्यागातच ‘योग’ हात जोडून उभा राहतो. भोग आणि योग यांच्यामागे त्याग आहे. भोगी तो रोगी. त्यागी तो निरोगी. याच्याही पुढची अवस्था म्हणजे योगी. कर्मफलाच्या आसक्तीचा त्याग ही योगाची पहिली पायरी होय.
गीतेची संपूर्ण शिकवण पाहिली तर जागोजागी कर्माचा त्याग करू नका, पण कर्मफलाचा त्याग करा असे गीता सांगते. गीतेच्या फलत्यागाला प्रत्यक्ष कर्मत्यागाची आवश्यकता नाही. कर्माच्या कर्तृत्वाचा अहंकार घालविणे हा मोठा त्यागच आहे. म्हणूनच गीतेने कर्ता, कर्मयोगी आणि कर्मसंन्यासी अशा तीन अवस्था सांगितल्या आहेत. त्या अवस्था त्याग आणि भोग यांच्या सीमारेषा स्पष्टपणे दाखविणाºया आहेत. जी काम्य कर्मे आहेत त्यांच्या मुळाशी कामना आहे. काम्यकर्माचा त्याग हा संन्यास आहे. परंतु फलत्यागासमोर काम्य आणि निषिद्ध कर्मे उभीच राहू शकत नाहीत. हिंसात्मक कर्मे, असत्यमय कर्मे, चोरीची कर्मे ही फलत्यागपूर्वक करता येत नाहीत. फलत्यागाची कसोटी लावताच ही कर्मे गळून पडतात. सूर्याची प्रभा विकसित झाली की सर्व वस्तू उजळून निघतात, परंतु अंधार उजळतो का? तर अंधार हा समग्र नाहीसा होतो. अंधार गळून पडतो. तशीच निषिद्ध आणि काम्य कर्माची स्थिती आहे. माऊली म्हणतात,
म्हणौनि त्याज्य जे नोहे। तेथ त्यागाते न सुवावे।त्याज्यालागी नोहावे। लोभापार।।
जे त्याग करण्यास योग्य नाही त्याचा त्याग करू नये, पण ज्या गोष्टींचा त्याग करणे योग्य आहे त्याचे आचरण करण्याचा लोभ न धरणे हाच खरा विवेक होय.

Web Title: Enjoyment, yoga and sacrifice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Meditationसाधना