खडसेंची सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 04:21 PM2018-07-21T16:21:09+5:302018-07-21T16:21:44+5:30

गैरव्यवहाराच्या आरोपावरुन मंत्रिपदाचा त्याग करावा लागलेले, पक्षीय पातळीवर काहीसे दूर लोटले गेलेल्या एकनाथराव खडसे यांच्यादृष्टीने मतदारसंघाच्या मुख्यालयातील नगरपंचायत निवडणुकीतील घवघवीत यशाचे मोल मोठे आहे.

Eknathrao Khadse sarshi | खडसेंची सरशी

खडसेंची सरशी

Next

राजकीय मंडळींच्या कार्यकर्तुत्व आणि लोकप्रियतेचे मूल्यमापन हे निवडणुकांद्वारे होत असते. त्यामुळे भारतीय लोकशाहीत निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. एखाद्या पोटनिवडणुकीवरुन सरकारचे मूल्यमापन जेव्हा केले जाते, तेव्हा गैरव्यवहाराच्या आरोपावरुन मंत्रिपदाचा त्याग करावा लागलेले, पक्षीय पातळीवर काहीसे दूर लोटले गेलेल्या एकनाथराव खडसे यांच्यादृष्टीने मतदारसंघाच्या मुख्यालयातील नगरपंचायत निवडणुकीतील घवघवीत यशाचे मोल मोठे आहे. १९९० पासून सलगपणे मुक्ताईनगर मतदारसंघाचे भाजपाकडून प्रतिनिधीत्व करणाऱ्या खडसे यांची मतदारसंघातील बहुसंख्य संस्थांवर मजबूत पकड आहे. शिक्षण संस्था, सहकारी सूतगिरणी, साखर कारखाना अशा संस्थांचे जाळे त्यांनी मतदारसंघात उभारले आहे. कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मुक्तार्इंनगर आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्यात भाजपाची पाळेमुळे रुजविण्यात चंद्रकांत मेंडकी, डॉ.राजेंद्र फडके, शुभदा करमरकर, वाडीलाल राठोड, डॉ.गुणवंतराव सरोदे यांच्यासह खडसे यांचेही योगदान आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका, जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ या सर्वच निवडणुकांमध्ये भाजपाचा झेंडा रोवला गेला. त्यात खडसे यांचा पुढाकार आणि गिरीश महाजन, हरिभाऊ जावळे, डॉ.बी.एस.पाटील, प्रा.साहेबराव घोडे, एम.के.अण्णा पाटील, वाय.जी.महाजन यांच्यासारख्या नेत्यांचा सक्रीय सहभाग आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीची खान्देशची सूत्रे खडसे यांच्याकडेच होती. त्यांच्या रणनितीला मोठे यश लाभले. परंतु मुख्यमंत्रिपदापासून त्यांना वंचित ठेवणे, महसूल, कृषीसह १२ महत्त्वपूर्ण खाती असूनही असंतुष्ट राहणे, गैरव्यवहाराचे मोठे आरोप होणे, या लागोपाठ घडलेल्या घटनांनी खडसेंसारख्या लोकनेतृत्वास ग्रहण लागले. भाजपा नेतृत्वाकडून खडसे यांची उपेक्षा होत असल्याची स्वत: खडसे आणि त्यांच्या समर्थकांची भावना झालेली आहे. कॉंग्रेस, राष्टÑवादीच्या नेत्यांशी असलेली घसट, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याविषयी असलेली उघड नाराजी यामुळे जळगाव जिल्ह्याच्या भाजपामध्ये दोन गट पडलेले आहेत. तीन महिन्यांपूर्वी गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील जामनेर पालिकेची निवडणूक भाजपाने शतप्रतिशत जिंकली. विरोधकांना एकही जागा मिळाली नाही. स्वाभाविकपणे मुक्ताईनगरकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत खडसे यांना जोरदार टक्कर देणारे शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस, राष्टÑवादीची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. परंतु तो यशस्वी झाला नाही. खडसेंचा विजय तेथेच निश्चित झालेला होता. विरोधकांना मर्यादेत ठेवण्याचा खडसे यांचा प्रयत्न या निवडणुकीत यशस्वी झाला आहे.

Web Title: Eknathrao Khadse sarshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.