समतेसाठी संवाद !

By किरण अग्रवाल | Published: August 2, 2018 07:27 AM2018-08-02T07:27:42+5:302018-08-02T07:28:57+5:30

राजकारणात तर संधीची कवाडे उघडून घेण्यासाठीच समतेचा विचार मांडला जाताना दिसून येतो. त्यामुळे ओबीसी, बहुजन व वंचितांची मोट बांधून समता प्रस्थापित करण्यासाठी राज्यभर दौरे करणा-या प्रकाश आंबेडकर यांच्याकडूनही तोच कित्ता गिरवला जात असेल तर त्यात आश्चर्य वाटून घेता येऊ नये.

Editors view on Dialogue for equality! | समतेसाठी संवाद !

समतेसाठी संवाद !

googlenewsNext

भाषणातून अगर उक्तीतून समतेचा विचार मांडणाऱ्यांकडून कृतीत तो उतरवला जात नाही, हे तसे अनेकांच्या बाबतीत अनुभवास येते. कारण हा विचार संधीच्या पातळीवरच अडखळत असतो. राजकारणात तर संधीची कवाडे उघडून घेण्यासाठीच समतेचा विचार मांडला जाताना दिसून येतो. त्यामुळे ओबीसी, बहुजन व वंचितांची मोट बांधून समता प्रस्थापित करण्यासाठी राज्यभर दौरे करणा-या प्रकाश आंबेडकर यांच्याकडूनही तोच कित्ता गिरवला जात असेल तर त्यात आश्चर्य वाटून घेता येऊ नये. पण तसे असले तरी, काँग्रेस व भाजपा या दोन्ही प्रमुख पक्षांबाबतचा त्यांचा असमाधानाचा सूर पाहता त्यांना अभिप्रेत असलेली समता नेमकी कुणाकडून साकारता यावी, हा प्रश्न मात्र नक्कीच उपस्थित होणारा आहे.


भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर सध्या राज्यात संवाद यात्रेवर आहेत. समाजाकडून नाकारल्या गेलेल्या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न तर यामागे आहेतच; पण प्रामुख्याने ओबीसी, बहुजन व आजवर विविध विकासाच्या योजनांत व संधीच्याही बाबतीत वंचित राहिलेल्यांना एकत्र आणून समतेची क्रांती घडवून आणण्याचा इरादाही त्यामागे आहे. म्हणजे समतेसाठीच ही संवाद यात्रा आहे, त्यामुळे स्वाभाविकच ठिकठिकाणी या यात्रेला प्रतिसादही चांगला लाभतो आहे. नाशकातही अपवादानेच भरले जाणारे दादासाहेब गायकवाड सभागृह या संवाद यात्रेच्या निमित्ताने उपस्थितांच्या गर्दीने ओसंडून वाहिलेले दिसून आले. बारा बलुतेदारांचे प्रतिनिधित्व व त्यांना दिली गेलेली व्यासपीठावरील भागीदारी हे यातील वैशिष्ट्य ठरले. १८५७ हे जसे बंडाचे वर्ष म्हणून ओळखले जाते, तसे २०१९ हे वर्ष मनुवादाशी संघर्षाचे वर्ष मानून समता प्रस्थापित करण्यासाठी व मनामनातील जाती बाहेर काढण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन यात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी करून उपस्थिताना जिंकूनही घेतले. पण एकीकडे ही जातिअंताची व समतेची भूमिका मांडताना दुसरीकडे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काँग्रेसकडे आपण धनगर, माळी, ओबीसी, मुस्लीम या घटकांना लोकसभेच्या प्रत्येकी दोन जागा देण्याचा प्रस्ताव दिल्याचे त्यांनी सांगितले. जाती आधारित संधीचीच भूमिका म्हणून त्याकडे पाहता यावे. अशाने जाती लयास जाऊन समता कशी प्रस्थापित होणार? याऐवजी, वंचित विकास आघाडीला अमुक इतक्या जागा सोडाव्यात, अशी मागणी केली गेली असती तर ती ‘समते’च्या भूमिकेला न्याय देणारी ठरली असती. पण तसे दिसून येऊ शकले नाही.


महत्त्वाचे म्हणजे, काँग्रेसकडे जागांचा प्रस्ताव देतानाच काँग्रेसवर घराणेशाहीचा, तर भाजपावर मनुवादाचे समर्थक असल्याचा आरोप अ‍ॅड. आंबेडकर यांनी केला. तेव्हा, विषमता गाडण्याचा एल्गार पुकारताना एकाचवेळी या दोघा प्रमुख राजकीय पक्षांबाबत जर त्यांची अविश्वासाची भावना असेल तर समतेची प्रस्थापना ही केवळ वंचित विकास आघाडीच्या स्वबळावर घडून येईल का, असा प्रश्न उपस्थित झाल्याखेरीज राहू नये. जागांची व त्या जागांवर उमेदवारीची संधी पदरात पाडून घेऊ पाहतानाही याचकाची अशी उक्ती व कृतीत गल्लत घडून आलेली दिसणार असेल तर मतदारांकडून अगर समर्थकांकडून समतेच्या जाणिवेची अपेक्षा कशी धरली जावी, हा यातील खरा प्रश्न ठरावा.


दुसरे म्हणजे, समतेसारख्या मूलभूत विषयाची कास धरून ज्या व्यासपीठावरून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासारखा विद्वानांच्या मालिकेत मोडणारा वक्ता आपली भूमिका मांडणार असतो, त्याच पीठावरून तथागत बुद्धांना भगवान विष्णूचा अवतार संबोधणाºयांंनाही संधी दिली जाते, तेव्हाच वैचारिकतेतील भिन्नता व संधीच्या शोधातील नाइलाज उघडा पडून जातो. नाशकात तेच पाहवयास मिळाले. गर्दीच्या नादात विचारांशी फारकत घडून आली की यापेक्षा दुसरे काही होतही नसते. भरगच्च व्यासपीठावर या वैचारिकतेशी नाळ जोडलेले अपवादात्मक नेते-कार्यकर्ते होते, तर समोर श्रोत्यांमध्ये मात्र तशी मंडळी हात बांधून बसलेली मोठ्या प्रमाणात दिसून आली. त्यामुळे ‘समते’चे सिंचन अगोदर नेतृत्वाच्याच पातळीवर होण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित झाली. याखेरीज गर्दीचे कौतुक करायचे तर, पुन्हा वैचारिकतेशी फारकतीचाच मुद्दा उपस्थित झाल्याखेरीज राहू नये. कारण, पोलीस दप्तरी विविध गुन्ह्यात आरोपी असलेल्याचे बोट पकडूनच अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर समतेची क्रांती घडवू पाहणार असतील तर रामदास आठवले व त्यांच्यात फरक कोणता उरावा? समतेसाठीचा संवाद आवश्यक असताना व त्यासाठी चालविलेले त्यांचे प्रयत्न दखलपात्रही ठरताना त्या संवादात ओरखडे ठरणाºया अशा विसंवादी बाबी यापुढे तरी टाळल्या जाव्यात, हीच अपेक्षा.

Web Title: Editors view on Dialogue for equality!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.