Ganesh Chaturthi 2018 : आरती पश्चात्तापाची 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 11:52 AM2018-09-17T11:52:22+5:302018-09-17T11:55:03+5:30

गणराया दोन दिवसांसाठी आमच्याकडे येतो आणि आमच्या भक्तीला प्रसन्न होऊन हरित सृष्टीचे वरदान देतो, असे जर आम्हाला वाटत असेल तर तो आमचा भ्रम आहे, स्वत:चाच शेवट घडवून आणण्यास आतुर झालेल्या प्रदेशात तो कशाला वास्तव्य करेल?

editorial view on Ganesh Chaturthi in Goa | Ganesh Chaturthi 2018 : आरती पश्चात्तापाची 

Ganesh Chaturthi 2018 : आरती पश्चात्तापाची 

Next

- राजू नायक 

गणराया दोन दिवसांसाठी आमच्याकडे येतो आणि आमच्या भक्तीला प्रसन्न होऊन हरित सृष्टीचे वरदान देतो, असे जर आम्हाला वाटत असेल तर तो आमचा भ्रम आहे, स्वत:चाच शेवट घडवून आणण्यास आतुर झालेल्या प्रदेशात तो कशाला वास्तव्य करेल?

गणराया,

नमस्कार. घरचा गणपती विसजर्न करून झालाय; परंतु तुझ्या आगमनाने उत्साहाचे, जल्लोशाचे, आनंदाचे भरते आलेला गोवा अजून त्याच मूडमध्ये आहे. माणसाला अनंत विवंचना असतात. आपल्याच दु:खाचे, प्रश्नांचे, जगण्याचे ओझे खांद्यावर टाकून पाय ओढीत तरीही धीरोदात्तपणे तो चालत राहातो. महागाईचा भडका उडाल्यापासून त्याचा खांदा आणखीनच वाकलाय आणि पायांचाही तोल जायला लागलाय. तो कासावीस आहे आणि जीवनाची दोन ठिगळे जुळविताना त्याला नाकीनऊ आलेय.

परंतु, तुला हे कशाला सांगायला हवेय?

तुला माहीत नाही असे थोडेच आहे. तू कुशाग्र बुद्धीचा देवता आहेस आणि अग्रनायक असल्याने प्रत्येक सणानिमित्त तुझ्याशिवाय आमचे पान हलत नाही, त्यामुळे तू जे काय चाललेय ते उघड्या डोळ्यांनी पाहातोच की!

परंतु, आमच्यासारखी तुझ्याही जीवाची घुसमट होते का रे?

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, प्लास्टिकची व थर्माकोलची आरास, फटाक्यांचा धूर, प्रदूषण, भेसळयुक्त मोदक यामुळे तुझ्या जीवाचे हाल हाल होत असतीलच की! तरीही तू गप्प राहून सहन करतोस की या सर्व कटकटींपासून तू धूम मारून पळून गेलायस?

या वर्षी केवढा गहजब झाला होता पीओपी मूर्तीबद्दल; परंतु त्या आल्याच आणि सरकारच्या नावावर टिच्चून त्यांनी घरांमध्येही प्रवेश घेतला. गोव्याचे एकेकाळचे मूर्तीकार किती कसबी; परंतु शेजारील राज्यांमधून स्वस्तात मूर्ती येताहेत म्हटल्यावर येथे कोणाला काम करायला हवेय? शिवाय स्थानिकांना मूर्तीकर सबसिडी आहेच! या वर्षी आणखी एक संकट निर्माण झाले आहे ते प्लास्टिकच्या सजावटीच्या वस्तूंचे. प्लास्टिक हटाव, जीवनातून प्लास्टिक कचरा नेस्तनाबूत करा वगैरे घोषणा हवेत विरायला अवकाश, संपूर्ण बाजारावर चतुर्थीच्या सजावटीच्या साहित्याने कब्जाच केला. गणपतीला लागणारे हार, फुले, पताकांपासून ते माटोळीच्या साहित्याचेही प्लास्टिकीकरण होणे म्हणजे अतीच झाले! दुर्दैवाने कोणाचे लक्ष नाही. पालिकेचे कर्मचारी आणि पोलीस त्यांच्याकडून चिरीमिरी मिळविण्याच्या प्रयत्नात दिसतात; परंतु एकालाही प्लास्टिकविरोधी मोहिमेची कार्यवाही करावीशी वाटली नाही. आता हा कचरा रस्त्यावर, बागांमध्ये, किनाऱ्यांवर आणि नद्या, समुद्रात जाऊन पसरणार आहे. रस्त्यांवर, मैदानांवर आणि घरांमध्ये साचलेले प्लास्टिक त्यानंतर जाळण्यात येणार आहे. तो धूर शरीरात गेल्यानंतर काय होणार हे सर्वाना माहीत आहे; परंतु आम्हा लोकांना जाळलेल्या टायरांचा धूर पोटात घेण्याची सवय आहेच की!

काही वर्षापूर्वी  तुझ्या मूर्तीचे विकृतीकरण केले म्हणून तणतणणाऱ्या सनातनी प्रवृत्तींनी या वर्षी कच खाल्लेली दिसते; परंतु या लोकांना पीओपी, प्लास्टिक, थर्माकोल याचे सोयरसुतक नसावे. गणपती प्लास्टिकचाही त्यांना चालेल; परंतु आकार, रूपकार तोच पारंपरिक हवा. समाजाचे आरोग्य बिघडवणा-या अशा घातक द्रव्यांविरोधात जागृती करणे या प्रवृत्तींना शक्य होते; परंतु ज्या ‘धर्मा’चे नियंत्रण करण्यास ते निघाले आहेत, त्यात माणसाचे तन-मन सुदृढ बनविणो बसत नाही. सनातनी धर्मात मंत्र-तंत्र होते. त्यांचाच प्रयोग केला की धर्मावर आधारित जीवनाची स्थापना होते. गेल्या महिनाभरात या सनातनी प्रवृत्तींनी काय विचार मांडला त्याची खुली चर्चा समाज माध्यमांमध्ये चालू होती. विचारवंतांच्या हत्या प्रकरणात ज्यांना अटक झालीय ते बहुजन समाजातील, समाजाच्या अत्यंत खालच्या वर्गातून आलेले. उलट त्यांची डोकी भडकावणारे सारे उच्चवर्णीय. त्यांच्यापर्यंत कोणाचे हात पोचू शकत नाही. धर्माचे तालिबानीकरण झाले तर भविष्यात काय वाढून ठेवलेय त्याची ही झलक, असा समाज माध्यमांचा सूर होता. कलाकार, चित्रकार, मूर्तीकार यांनी तुम्हाला ज्या ज्या कल्पनाविलासातून रंगविले, आकार दिला, सजविले, त्या भन्नाट अंत:प्रेरणा, संवेदना होत्या. नमुनेदार होत्या; परंतु तुमच्या नावाने सनातनी प्रवृत्ती ज्या कल्पना मांडू लागल्या आहेत, त्या कोणत्या हिंदू धर्माच्या व्याख्येत बसतात? हिंदू धर्म सर्वाना सामावून घेत अंत:करण विशाल बनवून जगाशी धागे, नाते निर्माण करत होता. म्हणून ती एक उन्नत संस्कृती होती. त्यामुळे ती जगात श्रेष्ठ संस्कृती म्हणून नांदत होती. तिच्यावर बंधने घालणारी, तिला तालिबानी स्वरूप देणारी धर्मभावना स्वीकारून या प्रवृत्तींना भारत एक तुरुंग बनवायचा तर नाही?

त्यादृष्टीने जगायला प्रोत्साहित करणारा, प्रेमाचा-आनंदाचा संदेश देणारा, शांतीची प्रेरणा प्रज्वलित करणारा आमचा खरा धर्म ते आम्हाला टाकून द्या म्हणून सांगणारे कोण? त्यादृष्टीने पाहिले तर सनातनी धर्म हा कॅन्सरच आहे! गणपतीराया तू असल्या ढोंगी, मतलबी आणि स्वार्थी प्रवृत्तींची कधी साथ करणार नाहीस; परंतु आमचीही तुला परीक्षाच पाहायची असेल तर कॅन्सरविरोधात लढण्याची आम्हाला ताकद दे!

कॅन्सरवरून आठवले, गोव्यात वर्षाला एक हजार लोक या रोगाचे बळी पडतात! मद्य आणि तंबाखूमुळे बळी पडलेल्यांची संख्या त्यात ३० टक्के आहे; परंतु इतर प्रकार प्रदूषणामुळे ओढवलेले आहेत. काही दिवसांपासून फॉर्मेलिनयुक्त मासळीचा प्रश्न गोव्यात गाजतो आहे. फॉर्मेलिनवर बंदी आहे; कारण ते मानवी शरीराला कॅन्सर बनूनच दंश करते. केवळ मासळी नव्हे तर आपल्याकडे फळांवरही फॉर्मेलिन आणि इतर विषारी औषधांची फवारणी केलेली असते! अन्न आणि आरोग्य प्रशासनाने लोकांचे आरोग्य सांभाळायचे. ही संस्था घाऊक विक्रेत्यांचे हितरक्षण करण्यासाठी बसली आहे. खाद्यपदार्थामधील घातक रसायनांच्या प्रमाणासंदर्भात जे अहवाल वेळोवेळी प्रसिद्ध होत आहेत, ते एकूणच थरकाप उडविणारे आहेत; परंतु कोणाला काय पडलेय? आपण जी ताजी मासळी खातो त्यात तर मर्क्युरी असतेच, शिवाय प्लास्टिकचे अंशही असतात. त्यामुळे मासळी खाणे म्हणजे प्लास्टिक पोटात ढकलणे असेच समीकरण बनलेय. गोव्यात आम्ही दिवसातून इतकी मासळी खातो; परंतु एकाही एनजीओला हे सुचलेले नाहीए की या तथाकथित ‘ताज्या’ मासळीची खासगी प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावी! अन्न प्रशासनावरचा विश्वास उडालेला असेल तर खासगी प्रयोगशाळेची मदत घेतली पाहिजे. दुर्दैवाने आमच्या गोव्यात अंशाच्या दर्जावर कोणाचेच नियंत्रण नाही. भाज्या, फळे व मांस ज्या पद्धतीने येथे प्राप्त होते, त्याचा दर्जा खात्रीने योग्य आणि खाण्यालायक नाही. या क्षेत्रात तरी राज्यात सरकारच अस्तित्वात नाही. त्यादृष्टीने आम्ही खरेखुरे गणराया तुझ्या  कृपेवरच अवलंबून आहोत. घराघरांत आम्ही कॅन्सर रुग्ण तयार करतोय; परंतु या रोगाने मांडलेले थैमान कसे रोखायचे, जीवनाचा दर्जा कसा वाढवायचा त्यावरचा उतारा आमच्याकडे नाही. जीएमसीमध्ये कॅन्सर विभाग आता लवकरच तयार होईल, या समाधानात आम्ही जगायचे आहे!

तुम्ही निसर्गदेवताही आहात. त्यामुळे वर्षातून एकदा करुणा भाकून, हातापाया पडून आम्हाला तुम्हाला बोलवावे लागत नाही. तुम्ही येथेच तर होता. आमच्या सान्निध्यात; परंतु हल्ली तुम्ही तरी आहात की नाहीत असा संभ्रम, संशय घडी घडी आम्हाला येतो. खाणींनी डोंगर बोडके केले, शेताभाटांमध्ये दलदल निर्माण केली, नद्यांमध्ये गाळ केला, समुद्र प्रदूषित केला. आता तर किनारपट्टीही पार ओरबडून टाकली आहे. त्यामुळे देवाचे वाहन असलेला कासव दुर्मिळ तर झालाच, शिवाय गोव्याच्या किना:याकडे त्याने कायमची पाठ फिरविली. मी गालजीबागला जाऊन प्रत्यक्ष पाहून आलोय. या वर्षी कासवांनी पाठ फिरविली. शॅक्स आणि कर्कश संगीताच्या गलक्यात ते कशाला येतील मरायला? दोन दिवसांपूर्वी न्यायालयानेही बडगा हाणताना मच्छीमारांच्या नूतनीकरण केलेल्या घरांचे व्यावसायिकरण करण्यास मान्यता नाकारलीय. म्हणजे 1991 नंतर उभ्या झालेल्या बांधकामांची आता धडगत नाही; परंतु या निर्णयाची कार्यवाही कोण करणार? न्यायालयाने गळेकापू खाण कंपन्यांवर बंदी आणली तर आमचे सरकार दिल्लीला साकडे घालतेय कायदाच बदला! सिदाद दी गोवाही एकेकाळी असेच वाचविले नव्हते का?

देवाधिपती, आम्हाला माहितेय, किनारे ही केवळ सौंदर्यस्थळे नव्हती. त्या होत्या आमच्या संरक्षण करणाऱ्या ढाली! निसर्गानेच सागराला गवसणी घालणारे वाळूचे डोंगर, हे डोंगर धरून ठेवणारी वनस्पती, खारफुटी बहाल केली. शेकडो वर्षे आम्ही त्यांचा सांभाळ केला. जेथे जेथे त्यांच्या कत्तली झाल्या, त्यांना त्सुनामीचा दंश झाला. केरळावर आलेली आपत्ती निसर्गनिर्मित नव्हती. ते होते मानवाचे कारस्थान. माणूस अधाशासारखे घेत गेला तर निसर्ग कुरघोडी करणार, हे ठरलेलेच आहे. तापमानवाढीचे संकट हा त्याचाच परिपाक आहे. या तापमानवाढीत भर पडेल समुद्रपातळीवाढीची. तिने उद्या आक्रमण केलेच तर गोवा अर्धा तरी वाचेल?
तुमच्या आरती गाताना आम्ही नेहमी म्हणतो, आम्हाला बुद्धी दे!

वास्तविक तुम्ही एक नवीन आरती तयार करायला पाहिजे, गोव्यासाठी तरी. हरित आरती. जी आमचे कार्यकर्ते आणि एनजीओ यांना नवा हुरूप देईल. सरकारला सुबुद्धी देईल. मंत्री-आमदार, लोकप्रतिनिधींना राज्याला वाहून घेण्याचा वसा देईल. राज्यात एक हरित नैतिकता निर्माण करेल. लोकांना सजग बनवेल. ते उगाच नेत्यांना, त्यांच्या लंब्याचौडय़ा आश्वासनांना भुरळून जाणार नाहीत. लोकांच्या दबावाला एक नवी धार येईल.

असे घडले तर आम्ही मानू तू खरेच प्रसन्न झालास गणराया. अशाच गोव्यात तू वास्तव्याला येशील. ज्या राज्यात अधर्म माजलेला आहे, प्रत्येकाला या राज्याचे लचके तोडून खायलाच स्वारस्य आहे आणि राज्याबरोबर स्वत:लाही संपवायला जेथे लोक आतुर झाले आहेत, त्या राज्यात तू कशाला येशील?

मला माहीत आहे, त्यापेक्षा तू मांडवीच्या तळाशी शांतपणे निजून या पाण्याला उकळी फुटण्याची वाट पाहात बसशील. ज्या लोकांना ‘बुद्धी’ नाही आणि जे लोक वेडय़ासारखे स्वत:च्या सुवर्णभूमीचे स्मशानभूमीत रूपांतर करायला उतरलेत, त्यांच्याशी बुद्धिदेवतेचे काय काम?    

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत. )

Web Title: editorial view on Ganesh Chaturthi in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.