श्रीलंकेतील स्फोट ही भारतासाठी भयघंटा!

By विजय दर्डा | Published: April 29, 2019 04:09 AM2019-04-29T04:09:21+5:302019-04-29T04:10:20+5:30

श्रीलंकेत ‘इस्लामिक स्टेट’ पोहोचलेलीच नाही, मग ती हे स्फोट कसे करणार? असे वाटले होते, परंतु आता वास्तविकता समोर आली आहे. ‘इस्लामिक स्टेट’ (इसिस) या महाभयंकर, निष्ठूर दहशतवादी संघटनेने याची जबाबदारी घेतल्याने ही दृष्टी ठेवणे आणखीनच गरजेचे ठरते.

Editorial on Sri Lankan blast is horror for India | श्रीलंकेतील स्फोट ही भारतासाठी भयघंटा!

श्रीलंकेतील स्फोट ही भारतासाठी भयघंटा!

Next

विजय दर्डा

श्रीलंकेत गेल्या आठवड्यात झालेल्या भीषण बॉम्बस्फोट मालिकेकडे केवळ एक दहशतवादी घटना म्हणून पाहून चालणार नाही, तर जगाच्या या भागातही दहशतवाद पसरल्याचे ते एक लक्षण आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. खास करून ‘इस्लामिक स्टेट’ (इसिस) या महाभयंकर, निष्ठूर दहशतवादी संघटनेने याची जबाबदारी घेतल्याने ही दृष्टी ठेवणे आणखीनच गरजेचे ठरते. श्रीलंकेत ‘इस्लामिक स्टेट’ पोहोचलेलीच नाही, मग ती हे स्फोट कसे करणार? असे वाटले होते, परंतु आता वास्तविकता समोर आली आहे. शनिवारी श्रीलंकेच्या सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत या संघटनेचे १५ दहशतवादी मारले गेले व त्यांच्या कित्येक डझन सदस्यांना अटक केली गेली. ‘इस्लामिक स्टेट’चे १४० हून जास्त दहशतवादी श्रीलंकेत लपलेले असावेत, असा अधिकाऱ्यांना संशय आहे. हे खरे असेल, तर तो घोर चिंतेचा विषय आहे.

भारतही ‘इस्लामिक स्टेट’च्या रडारवर आहे, यात कोणतीही शंका बाळगण्याचे कारण नाही. जुलै, २०१४ ते जुलै, २०१६ या कालावधीत ‘इस्लामिक स्टेट’ने रक्का येथून ‘दबिक’ नावाचे एक नियतकालिक प्रसिद्ध केले होते. त्याच्या सुरुवातीच्या अंकातच ‘इस्लामिक स्टेट’ने आपल्या बंगाल प्रांताची घोषणा केली होती व त्यासाठी एका खलिफाच्या नियुक्तीचीही घोषणा केली होती. त्यांच्या या बंगाल प्रांतात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, भूतान, नेपाळ, म्यानमार, थायलँडसह अनेक देशांचा समावेश होता. त्यानंतर, त्यांनी आपला एक जाहीरनामाही प्रसिद्ध केला. त्यात भारतात जिहाद छेडण्याचा स्पष्ट उल्लेख होता. त्या जाहीरनाम्यास ‘ब्लॅक फ्लॅग ऑफ आयएस’ असे म्हटले गेले होते. त्यावरून या राक्षसी संघटनेची नजर भारतावरही आहे, हे अगदी स्पष्ट होते.

काश्मीरच्या काही भागांत ‘इस्लामिक स्टेट’चे झेंडे फडकवले गेले व समाजमाध्यमांचा वापर करून ही संघटना युवकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न करीत आहे. गुप्तहेर संघटना यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ‘इस्लामिक स्टेट’ला यात फारसे यश आले नाही. युरोपमध्ये हजारो लोकांची त्यांनी भरती केली, पण भारतात मात्र जेमतेम दोन डझन युवक त्यांच्या गळास लागले. खरं तर भारतातील मुस्लीम समाज याबाबतीत खूपच सतर्क आहे. ‘इस्लामिक स्टेट’चा इस्लामशी सुतरामही संबंध नाही, हे भारतीय मुस्लीम जाणून आहेत. जगात सर्वाधिक मुस्लिमांना याच संघटनेने ठार केले आहे. भारतातील एक हजाराहून अधिक इमाम व मौलवींनी ‘इस्लामिक स्टेट’च्या विरोधात फतवा जारी केलेला आहे, तरीही खूप सावध राहण्याची गरज आहे.

‘इस्लामिक स्टेट’चा धोका लक्षात घेत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांनी पाकव्याप्त काश्मीरसंबंधीची रणनीती बदलण्याची गरज प्रतिपादित केली होती. ‘इस्लामिक स्टेट’चे दहशतवादी भारतात घुसू शकतील, असा संभाव्य मार्ग हाच आहे. अजून तरी पाकिस्तान ‘इस्लामिक स्टेट’ला मदत करत नाही, पण ही संघटना पाकिस्तानात आधीच पोहोचलेली आहे. अफगाणिस्तानात तर घट्ट पाय रोवले आहेत. श्रीलंकेतही त्यांचे बस्तान पोहोचले, तर समुद्रामार्गे त्यांची दक्षिण भारतात पोहोचण्याची एक नवी डोकेदुखी निर्माण होईल.
सन २०१६मध्ये ‘इस्लामिक स्टेट’शी संबंध असल्याच्या संशयावरून केरळमध्ये सहा जणांना अटक झाली होती. त्यावेळी केरळमधून २१ युवक गायब झाले होते व राष्ट्रीय तपासी यंत्रणा (एनआयए) त्या प्रकरणी तपास करत होती. त्या तपासातून असे समोर आले की, साजीर मंगलाचारी अब्दुल्ला नावाचा इसम तरुणांचे ब्रेन वॉशिंग करून त्यांना ‘इस्लामिक स्टेट’साठी काम करण्यासाठी चिथावत होता. अब्दुल्ला मूळचा केरळचा आहे, पण सध्या त्याचे वास्तव्य अफगाणिस्तानच्या नंगरहार प्रांतात आहे. या प्रांतात ‘इस्लामिक स्टेट’चे प्राबल्य आहे.

केरळमधून गायब झालेल्या २१ तरुणांना तेथे नेऊन प्रशिक्षण दिले गेले. त्यानंतर, हे तरुण नेमके कुठे गेले, हे स्पष्ट नाही. ‘इस्लामिक स्टेट’चे हातपाय भारतात पसरू नयेत, यासाठी केरळखेरीज तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, प. बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश आणि खास करून काश्मीरवर गुप्तचर संस्थांची करडी नजर आहे. अगदी उच्चशिक्षित कुटुंबातील तरुणांचीही डोकी त्यांच्या ब्रेन वॉशिंगने भडकतात. केरळमध्ये त्यांच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणांपैकी कोणी संशोधक होता, कोणी ग्राफिक डिझायनर तर कोणी चार्टर्ड अकाउंटंट! ‘इस्लामिक स्टेट’ची वेबसाइट नियमित पाहणाऱ्यांमध्ये काश्मीरचा पहिला, उत्तर प्रदेशचा दुसरा व महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो, अशीही माहिती समोर आली आहे.

ही परिस्थिती कशी हाताळायची व ‘इस्लामिक स्टेट’च्या धोक्यापासून कसे दूर राहायचे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यासाठी मुस्लीम युवकांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार करणे व ‘इस्लामिक स्टेट’सारखी संघटना मुसलमानांची कैवारी नाही तर त्यांची वैरी आहे, हे त्यांच्या मनावर पक्के बिंबविणे हाच त्यासाठी एकमेव मार्ग आहे. इस्लामिक स्टेटने इराक उद्धध्वस्त केला, सीरिया उजाड केला. त्यांनी जेथे कुठे पाय रोवले, तेथे लोकांचे जीवन नरकयातनांचे झाले. ‘इस्लामिक स्टेट’पासून सर्वांनीच सावध राहण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्या गुप्तचर संस्थांनी आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल.

(चेअरमन, एडिटोरिअल बोर्ड, लोकमत समूह)

Web Title: Editorial on Sri Lankan blast is horror for India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.