अंतराळ वैज्ञानिकांच्या जिद्दी नैपुण्याला सलाम!

By विजय दर्डा | Published: July 22, 2019 02:01 AM2019-07-22T02:01:36+5:302019-07-22T06:17:29+5:30

माझा हा विश्वास स्वानुभवातून होता. संयुक्त संसदीय समितीचा सदस्य या नात्याने श्रीहरिकोटा येथे गेलो तेव्हा ‘इस्रो’मधील वैज्ञानिकांची चिकाटी आणि समर्पण मी जवळून पाहिले होते.

Editorial on Salute to the stubborn proficiency of space scientists for Chandrayan 2 Mission | अंतराळ वैज्ञानिकांच्या जिद्दी नैपुण्याला सलाम!

अंतराळ वैज्ञानिकांच्या जिद्दी नैपुण्याला सलाम!

googlenewsNext

विजय दर्डा

15 जुलै रोजी ‘चांद्रयान-२’चे प्रक्षेपण पाहण्यासाठी भारतात अनेक लोक मुद्दाम पहाटेपर्यंत जागत होते तेव्हा मी ऑस्ट्रियात होतो व तेथे तेव्हा मध्यरात्रही झालेली नव्हती. मी टीव्ही पाहण्याची तयारी करेपर्यंत ते प्रक्षेपण पुढे ढकलल्याची बातमी आली. खरं तर हे प्रक्षेपण आधी ऑक्टोबर २०१८ मध्ये व्हायचे ठरले होते. पण ते झाले नाही. त्यानंतर ३ जानेवारी, नंतर ३१ जानेवारी व शेवटी १५ जुलैची तारीख ठरली होती. त्या दिवशीही प्रक्षेपण झाले नाही तेव्हा बहुतांश उत्साही लोकांची तात्कालिक निराशा झाली. पण मी अजिबात निराश झालो नाही, कारण प्रक्षेपणात आलेल्या अडचणीवर आपले वैज्ञानिक लवकरच मात करतील, याचा मला विश्वास होता.

Image result for Chandrayaan 2

माझा हा विश्वास स्वानुभवातून होता. संयुक्त संसदीय समितीचा सदस्य या नात्याने श्रीहरिकोटा येथे गेलो तेव्हा ‘इस्रो’मधील वैज्ञानिकांची चिकाटी आणि समर्पण मी जवळून पाहिले होते. सुमारे पाच वर्षांपूर्वी ही संधी मला मिळाली होती. तेथे एअर कंडिशन्ड खोल्यांमध्ये बसूनही वैज्ञानिकांच्या कपाळावर आलेला घाम मी त्या वेळी पाहिला होता. प्रत्येक अवकाश मोहिमेचे प्रक्षेपण किती महत्त्वाचे असते व त्या वेळी ते किती तणावाखाली असतात यावर माझी वैज्ञानिकांशी सविस्तर चर्चा झाली होती. प्रक्षेपक यानातील बिघाड लगेच दुरुस्त करून आज २२ जुलै रोजी ‘चांद्रयान-२’ पुन्हा अवकाशात झेपावण्याच्या तयारीत आहे, हे त्यांच्या या मेहनतीचेच फलित आहे.

Related image

३,८७७ किलो वजनाच्या ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण भारतास नक्कीच अभिमानास्पद असेल. ‘चांद्रयान-१’ केवळ चंद्राच्या कक्षेत घिरट्या घालून आले होते. ‘चांद्रयान-२’च्या माध्यमातून ‘इस्रो’ ‘विक्रम’ हे लॅण्डर व ‘प्रज्ञान’ हे रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरविणार आहे. हे शक्य झाले तर अशी अवघड कामगिरी फत्ते करणारा भारत जगातील चौथा देश ठरेल. सप्टेंबरमध्ये चंद्रावर उतरल्यानंतर, लँडर चंद्रावर भूकंप होतात का, याचा शोध घेईल तर ‘रोव्हर’ तेथील खनिजांचा मागोवा घेईल. चंद्राभोवती घिरट्या घालणारे ‘ऑर्बिटर’ पृथ्वीच्या या उपग्रहाचे नकाशे तयार करेल.

Related image

‘चांद्रयान-२’चे प्रक्षेपण यासाठीही महत्त्वपूर्ण असेल कारण मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवल्याला दोनच दिवसांपूर्वी ५० वर्षे पूर्ण झाली. आता ‘चांद्रयान-२’ त्यात आणखी एक मानाचा तुरा खोवणार आहे. ‘चांद्रयान-२’मधील लॅण्डर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या परिसरात उतरविले जाणार आहेत. जगातील विकसित देशांनाही हे जमलेले नाही. भारताने आपला पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ रशियन रॉकेटने सोडला होता, हे लक्षात घेतले तर भारताची ही प्रगती नक्कीच नेत्रदीपक आहे. दळणवळणासाठी पहिला ‘अ‍ॅप्पल’ हा उपग्रह सोडण्यासाठीही परदेशाची मदत घ्यावी लागली होती. त्या वेळी ‘अ‍ॅप्पल’ उपग्रह बैलगाडीतून नेला जात असतानाचे छायाचित्र जगभर गाजले होते. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की, बैलगाडीपासून सुरुवात करून आज आपण एकाच यानाने एकावेळी १०४ उपग्रह अंतराळात सोडण्याचे कसबही आत्मसात केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे पहिला भारतीय जेव्हा चंद्रावर उतरेल ती आपल्यासाठी खूप मोठी घटना असेल. ही मोहीमही आपले वैज्ञानिक फत्ते करतील, यात मला तिळमात्र शंका नाही. याची त्यांनी जोरदार तयारीही सुरू केली आहे.

Image result for Chandrayan2

या सर्वांचे श्रेय आपल्या वैज्ञानिकांकडे जाते यात संशय नाही. पण देशाचे राजकीय नेतृत्वही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, हेही विसरून चालणार नाही. देश स्वतंत्र झाल्यावर पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापुढे नानाविध आव्हाने व अडचणींचे डोंगर होते. परंतु त्या परिस्थितीतही नेहरूजींनी अंतराळाकडे दुर्लक्ष केले नाही. सुदैवाने त्या वेळी अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रात काही तरी करून दाखविण्याचे दुर्दम्य स्वप्न उराशी बाळगणारे थोर वैज्ञानिक डॉ. विक्रम साराभाई हयात होते. नेहरू व साराभाई यांच्या एकत्रित दूरदृष्टीतून १९६२ मध्ये राष्ट्रीय अंतराळ संशोधन समितीची स्थापना झाली.

Image result for Chandrayan2

‘चांद्रयान-२’च्या प्रक्षेपणाच्या या शुभदिनी हे सर्व शक्य करणाऱ्या वैज्ञानिकांचे मी अभिनंदन करतो. तसेच नव्या पिढीने विज्ञानाच्या क्षेत्रात आणखी पुढचे पल्ले गाठावेत, असाही मी आग्रह करेन. विज्ञान हेच प्रगतीचे सशक्त माध्यम आहे हे निर्विवाद सत्य आहे. जगात ज्या देशांनी विज्ञानाची कास धरली ते आज आघाडीवर आहेत. आपल्यालाही ते शिखर गाठायचे आहे आणि खूप लवकर गाठायचे आहे!

मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी ५0 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. गेल्या पाच वर्षांत त्यांनी स्वत:मधील नेतृत्वगुण सिद्ध केले आहेत. महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मुख्यमंत्री म्हणून परतण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नांची उत्तम जाण असलेला आणि त्यावर उपाय शोधून प्रभावी अंमलबजावणी करू शकणारा नेता अशी प्रतिमा उभी करण्यात फडणवीस यशस्वी झाले आहेत. फडणवीस यांना पाच वर्षे कारभार करताना अनेक अडथळे आले, पण त्याकडे त्यांनी संधी म्हणून बघितले. कुठल्याही प्रश्नाबाबत पूर्वग्रह न ठेवता तो सोडविणे हा त्यांचा स्वभाव आहे आणि तो त्यांच्यावरील आई-वडिलांच्या संस्कारांतून आलेला आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

(लेखक लोकमत समुहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे  चेअरमन आहेत) (vijaydarda@lokmat.com)

Web Title: Editorial on Salute to the stubborn proficiency of space scientists for Chandrayan 2 Mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.