हिंदुस्तानला द्वेषाचा आखाडा बनवू नका

By विजय दर्डा | Published: December 4, 2017 01:32 AM2017-12-04T01:32:36+5:302017-12-04T01:32:36+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वतंत्र भारतात आज आपण बघतोय अशाच राजकारणाची कल्पना केली होती काय? कालपरत्वे भारतीय राजकारण जाती आणि धर्मात गुरफटेल आणि संपूर्ण समाजाला त्यात गुंतवेल

Do not make Hindusthan a hatchery country | हिंदुस्तानला द्वेषाचा आखाडा बनवू नका

हिंदुस्तानला द्वेषाचा आखाडा बनवू नका

Next

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वतंत्र भारतात आज आपण बघतोय अशाच राजकारणाची कल्पना केली होती काय? कालपरत्वे भारतीय राजकारण जाती आणि धर्मात गुरफटेल आणि संपूर्ण समाजाला त्यात गुंतवेल असा विचारही पं. जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि इतर वरिष्ठ नेतृत्वाने कधी केला असेल का? निश्चितच त्यांनी कधीच याची कल्पना केली नसेल. त्यांनी तर एका अशा हिंदुस्तानचे स्वप्न बघितले असणार जेथे माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म असेल. जाती आणि धर्म ही प्रत्येकाच्या जीवनातील खासगी बाब असावी, त्याने समाज प्रभावित होऊ नये. परंतु दुर्दैवाने आज नेमके हेच घडतेय. आता तर एकमेकांविरुद्ध द्वेषाचे अशाप्रकारे बीजारोपण होत आहे की येणारा काळ किती भयावह असेल याचे चित्र स्पष्ट दृष्टीस पडते.
मी स्वत: एका राजकीय कुटुंबातून आलो आहे. १८ वर्षे संसदीय राजकारणाचा हिस्सा राहिलो आहे. परंतु आज जी परिस्थिती आहे त्यासाठी मी थेट राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनाच दोष देतो. मी वृत्तपत्राशीही जुळलेला असून फार सूक्ष्मपणे परिस्थितीचे आकलन करतो. मी जे अनुभवतो ते आपणासही जाणवत असेल; निवडणुका असल्या की वातावरण तापायला लागते. प्रारंभ विकासापासून होतो पण मग केव्हा तरी त्याला जाती आणि धर्माचे वळण लागते. एखाद्या उमेदवाराची पार्श्वभूमी काय आहे अथवा विकासासाठी कुणाच्या काय योजना आहेत, यावर तर चर्चासुद्धा होत नाही. उलट ती व्यक्ती कुठल्या पक्षाची, धर्माची आणि जातीची आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. एवढेच नाही तर राजकीय पक्षांकडूनही बहुतांश अशाच लोकांना तिकीट दिले जाते ज्यांच्यात जाती आणि धर्माच्या नावावर मते मिळविण्याची ताकद असते वा पैशाच्या बळावर मते आपल्या पारड्यात टाकून घेण्याची शक्ती असते. सर्व जाती आणि धर्म समान मानणाºया कुणा समाजसेवकाला तिकीट मिळाल्याचे आपण कधी बघितले आहे का? आणि अशा व्यक्तीला तिकीट मिळालेही तरी तो जिंकू शकत नाही, कारण राजकारणात ध्रुवीकरण हे सर्वात मोठे आयुध बनले आहे.
दुर्दैव हे की या ध्रुवीकरणाचा आमच्या समाजावर काय परिणाम होत आहे याचा विचारही आमचे राजकीय पुढारी करीत नाहीत. उघडपणे भलेही लोक हे स्वीकारणार नाहीत, परंतु वस्तुस्थिती ही आहे की आमचा समाज जाती आणि धर्माच्या नावावर पूर्वीपेक्षा जास्त विघटित होत चाललाय. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाºया नेत्यांना अशी आशा वाटली असेल की काळासोबत जातीप्रथा कमकुवत होईल आणि धर्मांधता संपेल. परंतु राजकारणानेच अपेक्षांचे फासे उलटे फेकले. आज राजकारणात जातीचा बोलबाला आहे अन् धार्मिक कट्टरवाद तर शिगेला पोहचला आहे.
मी कुणा एकाला दोष देत नाही. माझ्या दृष्टीने राजकारणातील प्रत्येक पक्ष यास जबाबदार आहे. गुजरात निवडणुकीतच बघा! तेथे या आठवड्यात पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. लोकमत समूहाच्या आमच्या प्रतिनिधींनी गुजरातचा दौरा करून तेथील वास्तव उघड केले आहे. विकासाचा मुद्दा भरकटून धर्मांधतेच्या बाजूने झुकला आहे. गुजरातमध्ये सोशल मीडियावर जे संदेश सध्या फिरत आहेत त्यांचा उल्लेखही येथे करता येणार नाही, कारण ते संदेश विद्वेष पसरविणारे आहेत. राजकीय नेत्यांना या संदेशांबाबत माहिती नसेल काय? सर्वांना माहीत आहे परंतु ते थांबविण्याचा कुठलाही प्रयत्न झालेला नाही. उलट राजकीय पुढारी तर एकमेकांवर अशाप्रकारे चिखलफेक करीत आहेत की समोरच्याच्या अब्रूचे धिंडवडे निघावेत.
भारतीय राजकारणाचे अशाप्रकारे कलुषित होणे देशासाठी चिंताजनक आहे. पुढारी तर येत-जात राहतील. पक्षही बदलत राहतील. परंतु लोकशाही खिळखिळी होईल. नेत्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, निवडणूक काळात ते जो द्वेष पसरवितात त्यामुळे भविष्यात देशाची प्रतिमा पार बिघडेल. राजकारण्यांनी हे लक्षात घ्यावे की हा देश कुठल्या एका वर्गाचा, धर्माचा अथवा जातीचा कधीही नव्हता आणि राहणारही नाही. सर्वांनी आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवत हे समजून घ्यावे की, हा देश हिंदू असो वा मुस्लीम, शीख असो अथवा जैन, बौद्ध किंवा ईसाई सर्वांचा आहे. संख्या कमी-अधिक असू शकते, पण सर्वांचे अधिकार समान आहेत. कुणालाही कमी लेखता येणार नाही. खरे तर या विविधतेतच आपले सामर्थ्य आहे. एकमेकांप्रति सद्भाव आणि स्नेह बाळगून तसेच मिळूनमिसळून राहण्यानेच आमचा समाज समृद्ध होईल. समाज कमकुवत असला तर देशही कमजोर होईल. राजकीय नेत्यांना माझे एकच सांगणे आहे, हिंदुस्तानला द्वेषाचा आखाडा बनवू नका...! धर्मनिरपेक्षता हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे. ती कदापि निष्प्रभ होऊ नये. विशेषत: नव्या पिढीपुढे आमची सर्वात मोठी संपदा असलेली धर्मनिरपेक्षता कशी सुरक्षित ठेवायची, हे मोठे आव्हान आहे.
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
नॅशनल क्राईम ब्युरोचा ताजा अहवाल अत्यंत चिंताजनक आहे. देशात बलात्काराच्या घटनांमध्ये १२.४ टक्के अशी लज्जास्पद वाढ झाली आहे. तीन मोठे राज्य मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्टÑ अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. आमच्या समाजाला झालेय तरी काय? हेच मला कळत नाही. बलात्काराच्या घटना एवढ्या का वाढताहेत? आमचे संस्कार संपत चाललेत काय? हा गंभीर मुद्दा आहे. कायदा तर अधिक कठोर व्हायलाच हवा. पण समाजालाही सकारात्मक पुढाकार घ्यावा लागेल.

Web Title: Do not make Hindusthan a hatchery country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.