विकास आणि वाढते वायुप्रदूषण : एक पॅराडॉक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 05:20 AM2019-04-17T05:20:31+5:302019-04-17T05:20:40+5:30

‘विकासाची किंमत प्रदूषणाद्वारे चुकवावी लागते’ असा अनुभव विकसित राष्ट्रांबरोबरच विकसनशील राष्ट्र राहिलेल्या विकासप्रवण भारतासारख्या देशातही येतो.

Development and Increasing Air Pollution: A Paradox | विकास आणि वाढते वायुप्रदूषण : एक पॅराडॉक्स

विकास आणि वाढते वायुप्रदूषण : एक पॅराडॉक्स

Next

- शैलेश माळोदे
‘विकासाची किंमत प्रदूषणाद्वारे चुकवावी लागते’ असा अनुभव विकसित राष्ट्रांबरोबरच विकसनशील राष्ट्र राहिलेल्या विकासप्रवण भारतासारख्या देशातही येतो. एका जागतिक स्तरावरील ताज्या अहवालानुसार २०१७ मध्ये सुमारे १२ लक्ष लोक घराबाहेरील आणि घराच्या आतील प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडले. ‘स्टेट ऑफ ग्लोबल एअर २०१९’ या नावाने प्रकाशित या अहवालातील अध्ययन निष्कर्षानुसार सध्याच्या स्तरावरील वायुप्रदूषणातील वाढणारं प्रमाण पाहता दक्षिण आशियामधील प्रत्येक मुलाचं सरासरी आयुर्मान सुमारे अडीच वर्षांनी कमी होण्याची भीती आहे. जागतिक स्तरावर ती संख्या २० महिने असेल. हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट या संस्थेतर्फे हा अहवाल दरवर्षी प्रकाशित होतोय. ही संस्था स्वतंत्र, नफाविरहित संशोधन करणारी असून अमेरिकेची पर्यावरण एजन्सी, उद्योग आणि विविध प्रतिष्ठानं तसेच विकास बँकांतर्फे दिल्या जाणाऱ्या निधीद्वारे कार्य करते.


आपलं आरोग्य आपण श्वसनाद्वारे घेत असलेल्या हवेवर अवलंबून असतं. हवेच्या गुणवत्तेतील घट लोकांच्या लवकर मृत्यू होण्याबरोबरच विविध प्रकारचे हृदयविकार आणि श्वसनविकारांना आमंत्रण देते. आणि त्याचबरोबर दम्यासारखे विविध जुनाट रोग वाढून शाळा, कॉलेज आणि कार्यालयीन अनुपस्थिती वाढू लागते. वायुप्रदूषणास क्षेत्र, जात, पात, धर्म, लिंग, वर्ग कशाचंही बंधन नाही. गेल्या अनेक दशकांमध्ये आरोग्यतज्ज्ञ आणि वैज्ञानिकांच्या लक्षात आलंय की, खराब हवेमुळे आरोग्य आणि जगण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. परंतु एकीकडे वाढत्या लोकसंख्येच्या गरजा, बदलत्या आकांक्षा आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी वाढता दबाव आणि घटती साधनं यामुळे विकास प्रक्रियेवरही विपरीत परिणाम होतोय. वाढत्या नागरीकरणामुळे वाढत्या परिवहनाची गरज यामुळे वाढती लोकसंख्या याचाही बाह्य वायुप्रदूषण वाढण्यावर परिणाम होतो. तसेच घरांमध्ये कोळसा, जैवमार (बायोमास) म्हणजे लाकडं इत्यादी वापरण्यामुळेदेखील हवेची गुणवत्ता घसरते.

म्हणूनच जगामध्ये २०१७ साली वायुप्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूपैकी निम्मे मृत्यू भारत आणि चीन या दोन प्रचंड लोकसंख्या आणि वाढत्या विकास आकांक्षा असलेल्या देशात होताना दिसतात. असं अहवालातील आकडेवारीतून लक्षात येतं. मृत्यूस कारणीभूत ठरू शकणाºया विविध जोखीम घटकांमध्ये कुपोषण, अल्कोहोलचा वापर आणि कमी शारीरिक काम वा शैथिल्य यापेक्षा वायुप्रदूषण हा अधिक मृत्यूस कारणीभूत ठरणारा घटक आहे. भारतात ती मृत्यूस कारणीभूत ठरणारी तिसºया क्रमांकाची आरोग्य जोखीम आहे. धूम्रपानापेक्षाही तिचा क्रमांक वरचा आहे. प्रदूषणाशी संबंधित मृत्यू जास्त आहेत. २०१७ मध्ये स्ट्रोक, मधुमेह, हृदयविकाराचा झटका, फुप्फुस विकार यामुळे किमान कोटी भारतीय मरण पावले. त्याचा संबंध घरातील आणि घराबाहेरील प्रदूषणाशी होता. त्यापैकी ३० लाख लोक पी.एम. २.५ मुळे मरण पावले. हवेतील अतिसूक्ष्म तरंगणाºया धूलिकणांच्या स्वरूपात दोन प्रकारची प्रदूषकं यासाठी कारणीभूत आहेत. वैज्ञानिक भाषेत त्याचा व्यास २.५ मायक्रोमीटर्सपेक्षा कमी असतो. तसेच अगदी जमिनीलगत ओझोनचे प्रमाण जास्त असणंदेखील यात भर घालतं. जगातील सर्वाधिक वायुप्रदूषित क्षेत्रात भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि बांगलादेश अशा दाट लोकवस्ती असलेल्या दक्षिण आशियाचा समावेश आहे. चीनने सुरुवातीला यावर उपाययोजना करण्याचे प्रयत्न केले. त्यातून आता त्यांना चांगलं यश लाभताना दिसतंय. या अहवालातील अध्ययनातून भारतानेही केलेल्या प्रयत्नांचं कौतुक आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, मॅक्सलरेटेड भारत सेज-६, स्वच्छ वाहनांची प्रमाणकं यामुळे फरक पडू लागल्याचं अहवालात नमूद केलंय.
जगात एकूणच जागतिक आरोग्य संघटनेनं ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा वातावरणातील पीएम २.५ चं प्रमाण तसं जास्तच आहे. २०१७ मध्ये जगातील ९२ टक्के लोक जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या हवा गुणवत्ता मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा जास्त पीएम असलेल्या भागात राहत होते, असं अहवालातून दिसतं. हवामान बदलाविरुद्धच्या महापद्धतीतील हवा प्रदूषणाविरुद्धची लढाई खूपच महत्त्वाची आहे. इंधनाऐवजी इतर ऊर्जास्रोतांचा (अर्थात कमी प्रदूषण करणाºया) वापर दरवर्षी मृत्यू कमी करेल. मानव जातीच्या समग्र भवितव्यासाठी प्रदूषण कमी होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मानवी आरोग्यच नव्हे तर हवामानावरही सकारात्मक प्रभाव पडेल.
(विज्ञान पत्रकार)

Web Title: Development and Increasing Air Pollution: A Paradox

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.