विकास, भावनिकता दोन वेगळ्या बाजू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 12:29 PM2018-11-25T12:29:53+5:302018-11-25T12:32:46+5:30

विकास आणि भावनिकता या एकाच नाण्याच्या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत. नाण्याचा उपयोग करायचा असेल तर दोन्ही बाजूंनी सकारात्मक विचार होणे आवश्यक आहे.

Development and emotionalism are two different sides | विकास, भावनिकता दोन वेगळ्या बाजू

विकास, भावनिकता दोन वेगळ्या बाजू

महेश सरनाईक

विकास आणि भावनिकता या एकाच नाण्याच्या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत. नाण्याचा उपयोग करायचा असेल तर दोन्ही बाजूंनी सकारात्मक विचार होणे आवश्यक आहे. या लेखाच्या निमित्ताने कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत, तर जी वस्तुस्थिती आहे ती प्रत्येकाने स्वीकारायला पाहिजे एवढेच सांगायचे आहे. क्रिया तशी प्रतिक्रिया हा निसर्गाचा अटळ नियम आहे. सद्गुरू वामनराव पै यांच्या जीवनसूत्राप्रमाणे ‘सतत शुभ चिंतावे, शुभ ईच्छावे, शुभ बोलावे, शुभ कर्माच्या सामर्थ्याने जीवनाचे सोने करावे!’ अशा पद्धतीत जर येणाऱ्या परिस्थितीला सामोरे गेल्यास निश्चितच चांगले फळ मिळेल आणि जीवन आनंदानेही जगता येईल.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. केंद्रातील भाजपा सरकारला चार वर्षे पूर्ण झाली. कोकणातील सर्वात महत्त्वाचे आणि गेली कित्येक वर्षे रखडलेले महामार्गाचे काम मार्गी लावल्याचे मोठे श्रेय केंद्र शासनाला द्यावे लागेल. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात येणारी प्रत्येक अडचण दूर करून लोकांची समजूत काढत हे काम पुढे सरकविण्यात येत आहे. 

महामार्गावरून विस्थापित होणाऱ्या प्रत्येकाला त्याचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. त्याचे योग्य पुनर्वसन होण्यासाठीची मदत त्याला मिळाली पाहिजे ही रास्त मागणी पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यात दिरंगाई झाल्यास योग्य न्याय मिळण्यासाठी आवश्यक मार्गांचा अवलंबदेखील केला जात आहे. परंतु विकास प्रक्रिया राबविताना विकासाला भावनिकतेशी जोडणे योग्य नाही. कारण या दोन्ही बाबी परस्पर वेगळ्या आहेत. विकास प्रक्रिया राबविताना ती पूर्ण करण्यासाठी काही जणांना काही गोष्टी दान कराव्या लागतील. मग, त्या गोष्टी आपल्याला कायमस्वरुपी हव्या-हव्या अशा वाटल्या तरी त्या आपल्याकडे राहणे शक्य नाही. कारण त्या आहे तशा स्थितीत ठेवून विकास प्रक्रिया राबविणे शक्य होणार नाही. 

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. खारेपाटणपासून झारापपर्यंत सध्याच्या महामार्गावरील हजारो झाडे यासाठी तोडण्यात आली आहेत. भविष्यात या मार्गावर तशी झाडे पुन्हा उभी राहण्यास मोठा अवधी जाईल, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर या मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी होईल, गाड्यांची होणारी झीज कमी होईल, अतिशय कमी वेळात आपल्याला इच्छित स्थळी जाणे सोपे होईल यांसह अनेक फायदे होणार आहेत.

महामार्ग चौपदरीकरणाचे काम गेल्या वर्षभरात अतिशय वेगाने होण्यामागची कारणे शोधल्यास लक्षात येईल, अगदी भूसंपादनापासून  मोबदला देण्यापर्यंतची प्रक्रिया संबंधित विभागाने अगदी जलदगतीने राबविली. काही ठिकाणी यात अडचणी आल्या. काही ठिकाणी चुकीचे सर्वेक्षणही झाले. त्याचा फटका सर्व संबंधितांना बसला. परंतु त्यातून आवश्यक मार्ग काढण्यासाठीची प्रक्रियाही राबविण्यात आली. ठेकेदार कंपनीच्या यंत्रणेला दाद द्यावी लागेल. येथील नैसर्गिकरित्या आलेले अनेक अडथळे दूर करण्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळ त्यांनी वेळोवेळी तैनात ठेवले. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम कणकवली शहरात गेल्या आठ दिवसांपासूनच सुरू झाले आहे. मात्र, त्याचा वेग प्रचंड आहे. कणकवली बाजारपेठ म्हणा किंवा गडनदीचा नवीन पूल उभारणी म्हणा. अगदी बोलता-बोलता हे काम आटोपल्यासारखे वाटत आहे. 

महामार्गाचे चौपदरीकरण होत असताना मार्गावरील अनेक घरे, हॉटेल्स, बिल्डींग, झाडे, मंदिरे, अनेक ऐतिहासिक वास्तू पाडण्यात येत आहेत. या वास्तू आता आपल्याला पुन्हा दिसणार नाहीत. परंतु, त्या वास्तुंच्या आठवणी कायम राहतील. त्या वास्तुंबाबत आपुलकीची भावना प्रत्येकाला असायलाच हवी. मात्र, त्या वास्तू नसल्यामुळे आपण पोरके झालो म्हणण्याची गरज नाही. कारण त्या वास्तुंची आयुष्य मर्यादा ही तेवढीच होती. एव्हाना त्या वास्तुंनी आपण महामार्गासाठी दान दिले. माणसाच्या प्रगतीच्या आड आपण येऊ नये, अशा भावनेतून त्यांनी आपले सर्वस्व आम्हांला दिले. 

जग बदलतेय. काळाप्रमाणे आपण बदलण्यासाठी आपल्या मुलांना किंवा भावी पिढीला आवाहन करीत आहोत. मात्र, आपण स्वत: वागताना ‘जुने ते सोने’ म्हणण्यात धन्यता मानत आहोत. कोणाच्या भावनांशी फारकत घेऊन विचार मांडणे हा या मागचा उद्देश नसून बदलत्या आणि धकाधकीच्या युगात आपणही आपल्यात बदल घडवायला हवे, असे नुसते म्हणून चालणार नाही. तर समाजमनालादेखील ते पटवून सांगण्याची गरज आहे. सोशल मीडिया हा भावना व्यक्त करण्याचे मोठे माध्यम झाले आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणावरून एखाद्या वटवृक्षाच्या नसण्यावरून दरदिवशी शेकडो मतप्रवाह व्यक्त केले जात आहेत. 

प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य लोकशाहीने दिले आहे. त्यात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, म्हणून प्रत्येकाने एकासारखेच मत व्यक्त करावे, असे म्हणणेही क्रमप्राप्त नाही. परंतु आपण कुठल्याही माध्यमांद्वारे व्यक्त होत असताना, नाण्याच्या दोन्ही बाजूंचा विचार करून व्यक्त झाल्यास ते अगदी उचित ठरणार आहे.

काही वर्षांपूर्वी ज्यावेळी प्रा. मधु दंडवते यांच्या रुपाने साकारलेल्या कोकण रेल्वेचा प्रकल्प सुरू होता. त्यावेळी त्या काळातदेखील अशाच अनेक आठवणी दृश्यरुपाने पुसून टाकण्यात आल्या असतील. परंतु आता कोकण रेल्वेमुळे कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये विकासाची जी दारे खुली झाली आहेत ते पाहता आता कोणाच्या मनातही त्या आठवणी येत असतील असे वाटत नाही. कारण कोकण रेल्वेमुळे अनेकाधिक फायदे झालेले आपल्याला प्रत्यक्ष डोळ्याने दिसत आहेत. त्या काळात कोकण रेल्वेची संकल्पना मांडणाºया प्रा. मधु दंडवते यांना लोकांनी मूर्ख ठरविले होते. मात्र, प्रत्यक्षात हा प्रकल्प साकारून आज दररोज हजारो प्रवासी या रेल्वेतून प्रवास करताना पाहिल्यावर तेच लोक दंडवतेंना धन्यवाद देत आहेत.

कोकण रेल्वेमुळे दक्षिणेकडील राज्ये महाराष्ट्राशी जोडली गेली. त्यामुळे लोकांना कमी वेळेत या राज्यांमध्ये जाण्याचा मार्ग उपलब्ध झाला. तसेच मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर दक्षिणेकडे जलदगतीने जाणारा हा मार्ग ठरणार आहे. तसेच यामुळे कोकणच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये कायापालट होण्यास मदत होणार आहे. कोकणात येणाºया पर्यटकांच्या संख्येतही मोठी वाढ होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी येथे विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पाच ते सहा महिन्यांत हे विमानतळही सुरू होईल. तसेच वर्षभरात महामार्गाचे कामदेखील पूर्ण होईल. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून रस्ते वाहतुकीद्वारे येणारा पर्यटक म्हणा किंवा देश-विदेशातील पर्यटक हवाई वाहतूक व्यवस्थेने सिंधुदुर्गशी जोडला जाईल.

सिंधुुदुर्ग जिल्हा हा देशातील एकमेव पर्यटन जिल्हा आहे. या पर्यटन जिल्ह्यात आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी राज्यकर्त्यांनी प्रयत्न करायला हवेत. गोवा राज्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी असणाºया सुख-सुविधा आणि आवश्यक बाबी येथे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. गोवा हे स्वतंत्र राज्य आहे. त्यामुळे पर्यटनाला पोषक वातावरण निर्मितीसाठीचे निर्णय ते स्वतंत्ररित्या घेत आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनवाढीसाठी काही निर्णय जिल्ह्यापुरते मर्यादित घेण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

मुंबई-गोवा महामार्ग हा विकासाचा मार्ग म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे या मार्गाच्या निमित्ताने काही गोष्टींना सिंधुदुर्गवासीयांना तिलांजली द्यावी लागणार आहे. त्या गोष्टींबाबत आत्मियता असणे चुकीचे नाही. मात्र, त्या क्रमप्राप्त आहेत, त्या कराव्याच लागतील. ज्यावेळी आताच्या मुंबई-गोवा मार्गाची निर्मिती झाली त्यापूर्वीदेखील अशाच काहीशा खडतर बाबींमधून त्याची निर्मिती झाली असेल. त्याकाळातदेखील या मार्गावरील काही जुन्या आठवणींना तिलांजली मिळाली असेल, हे निश्चितच.

 

Web Title: Development and emotionalism are two different sides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.