विकास व विनाश एकत्र नांदू शकत नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 04:27 AM2018-12-13T04:27:15+5:302018-12-13T04:28:24+5:30

दहशतवादी कृत्यांनाही धार्मिक रंग देण्याचे प्रयत्न होतात हे अत्यंत दुर्दैवी आहे. दहशतवाद हा मुळातच अमानवीय असून कोणत्याच धर्माची त्याला मान्यता नाही.

Development and destruction can not be possible at a same time | विकास व विनाश एकत्र नांदू शकत नाहीत

विकास व विनाश एकत्र नांदू शकत नाहीत

googlenewsNext

- एम. व्यंकय्या नायडू

कशाहीचे आणि जनतेच्या आकांक्षांचे सजीव प्रतीक असलेल्या आपल्या संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १७ वर्षे पूर्ण होत आहेत. हा भयानक हल्ला परतवून लावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या आपल्या सुरक्षा दलांच्या व इतरांच्या बहाद्दुरीचे या दिवशी स्मरण करत असतानाच आपल्या मातृभूमीचा इंचन्इंच भाग पूर्णपणे सुरक्षित करण्याच्या निर्धारासोबतच दहशतवादाच्या वाढत्या उपद्रवाचे जगातूनही उच्चाटन करण्यासाठी आपल्याला राजनैतिक पातळीवर नेटाने प्रयत्न करावे लागतील.

या हल्ल्यात आपल्या सुरक्षा दलांचे सहा जवान शहीद झाले. देशाच्या सीमांचे रक्षण करणारे लष्कराचे शूर जवान, आपल्या जीवित-वित्ताची काळजी घेणारे पोलीस आणि आक्रमक, दहशतवादी व समाजकंटकांशी सदैव मुकाबला करणारी आपली अर्र्धलष्करी सैन्यदले नक्कीच कौतुकास पात्र आहेत. त्यांची व्यक्तिनिरपेक्ष कर्तव्यनिष्ठा आणि देशाची सुरक्षा व जनतेची सुरक्षितता याविषयी त्यांची अतूट बांधिलकी आपणा सर्वांना प्रेरणादायी आहे. आपल्या विकासयात्रेसाठी अनुकूल वातावरण कायम ठेवण्यातील त्यांचे योगदान विसरून चालणार नाही.
दहशतवाद ही संपूर्ण मानवतेला जडलेली व्याधी असून तिच्या निर्मूलनासाठी आपल्याला इतरांना सोबत घेऊन मजबूत आघाडी उघडावी लागेल. संसदेवरील व मुंबईवरील दहशतवादी हल्ले हे आपल्या समाजमनावर कोरले गेलेले कधीही न भरून निघणारे ओरखडे आहेत.

सीमेच्या पलीकडून येणाºया दहशतवादास भारत गेली कित्येक वर्षे तोंड देत आहेच; पण गेल्या काही वर्षांत दहशतवादाच्या या भस्मासुराने इतरही अनेक देशांत थैमान घातले आहे. यास सर्वंकषपणे पायबंद करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय समझोता करण्याचा प्रस्ताव भारताने १९९६ मध्ये संयुक्त राष्ट्र संघात मांडला, पण अद्याप तो मंजूर झालेला नाही. कोणत्याही स्वरूपातील दहशतवादाचे कदापि समर्थन केले जाऊ शकत नाही. दहशतवादी हा दहशतवादीच असतो व त्यात चांगला आणि वाईट दहशतवाद असा भेदभाव केला जाऊ शकत नाही. संसदेवरील राक्षसी हल्ला आणि मुंबईतील महाभयंकर हल्ला या दोन्हींमुळे भारतीयांच्या मनात संतापाची भावना आजही कायम आहे. सर्व प्रकारच्या विघातक, विध्वंसक आणि अराजकवादी शक्तींचा बीमोड करण्याचा आपला निर्धार या दोन्ही घटनांनी आणखी मजबूत झाला आहे.

या हल्ल्यामागचे सीमेच्या पलीकडे शिजलेले कारस्थान उघड करण्यात मुंबई पोलीस आणि ‘एनआयए’ने केलेली कारवाई स्पृहणीय आहे. विशेष पब्लिक प्रॉसिक्युटर उज्ज्वल निकम यांची कायद्यातील मातब्बरी व निर्विवाद पुराव्याच्या जोडीला केलेला बिनतोड युक्तिवाद यामुळे मुंबई हल्ल्यातील एका गुन्हेगाराला फासावर लटकविणे शक्य झाले. परंतु दहशतवादाचे हे विखारी जाळे अधिकच गुंतागुंतीचे होत चालले आहे. तेच मुळातून उखडून टाकणे गरजेचे आहे. या भयंकर घटनांच्या पडद्यामागील सूत्रधारांच्या मुसक्या आवळून त्यांना कायद्यापुढे उभे करणे नितांत गरजेचे आहे. देशपातळीवर आपल्याला सागरी आणि किनारी सुरक्षेसह एकूणच सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करावी लागेल.

मने विखाराने ठासून भरलेल्या व मानवी जीव आणि मानवी हक्क यांची जराही किंमत नसलेल्या मोजक्या लोकांना संपूर्ण जगाला वेठीला धरू दिले जाऊ शकत नाही. विशेषत: भारतात काही लोकांनी मानवी हक्कांच्या नावाखाली दहशतवाद्यांविषयी गळा काढावा हा दुर्दैवी विरोधाभास आहे. आपण भारतीयांनी देशात आणि देशाबाहेरून आणि खास करून सीमेच्या पलीकडून दहशतवाद पसरविणाºयांविरुद्ध अधिक निर्धाराने उभे राहावे लागेल. या नतद्रष्ट प्रवृत्तींना देशातून आणि देशाबाहेरून खतपाणी घालणाºया गटांचाही जाहीरपणे निषेध केला जाणे तेवढेच गरजेचे आहे.

दहशतवादी कृत्यांनाही धार्मिक रंग देण्याचे प्रयत्न होतात हे अत्यंत दुर्दैवी आहे. दहशतवाद हा मुळातच अमानवीय असून कोणत्याच धर्माची त्याला मान्यता नाही. यामागे चुकीची, विकृत आणि अमानवी अशी विचारसरणी आहे. याचा मुकाबला मने वळवून व चर्चा करून तसेच प्रसंगी जरब बसेल असा बळाचा वापर विवेकाने करूनच करावा लागेल.

भारत जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर असताना आणि नानाविध आव्हानांना तोंड देत असताना आपल्या विकासाच्या उद्दिष्टांना काडीभरही हातभार लागणार नाही अशा बाबींवर नाहक शक्ती खर्च करणे आपल्याला परवडणारे नाही. भारतात आणि दक्षिण आशियातील इतरही देशांमध्ये बरीच मोठी लोकसंख्या दारिद्र्यात आहे. एक देश म्हणून आपले लक्ष लोकांचे जीवनमान सुधारण्यावर केंद्रित व्हायला हवे. विकास आणि विनाश एकत्र नांदू शकत नाहीत. मात्र शांतता व विकास हे दोन्ही परस्परपूरक आहेत. आपल्याला शांततेच्या शक्तींना सतत बळकटी द्यावी लागेल व त्यांच्या विरोधात काम करणाºया हिंसाचारी आणि दहशतवादी शक्तींना निरंतर ठेचत राहावे लागेल.

(लेखक उपराष्ट्रपती आहेत)

Web Title: Development and destruction can not be possible at a same time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.