भाष्य - जन्मदात्यांची निष्ठूरता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:17 AM2017-09-14T00:17:20+5:302017-09-14T00:18:43+5:30

आर्थिक विवंचनेपुढे हतबल झालेल्या कल्याण येथील अनिता कनोजिया नावाच्या मातेने रविवारी पती कामानिमित्त बाहेर गेल्याची संधी साधून आपल्या दोन कोवळ्या जीवांसह स्वत:लाही जाळून घेतले. घटना तशी हृदयद्रावक असली तरी एक जन्मदात्री म्हणून तिने उचललेले हे पाऊल म्हणजे निष्ठूरतेचा कळसच म्हणायला हवा. जगातील सर्वच मानवजात तोंडात सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेली नसते. अनेकांच्या शिरावर कमी-अधिक प्रमाणात कर्जाचा भार हा असतोच.

Despair of Resurrection! | भाष्य - जन्मदात्यांची निष्ठूरता!

भाष्य - जन्मदात्यांची निष्ठूरता!

Next

आर्थिक विवंचनेपुढे हतबल झालेल्या कल्याण येथील अनिता कनोजिया नावाच्या मातेने रविवारी पती कामानिमित्त बाहेर गेल्याची संधी साधून आपल्या दोन कोवळ्या जीवांसह स्वत:लाही जाळून घेतले. घटना तशी हृदयद्रावक असली तरी एक जन्मदात्री म्हणून तिने उचललेले हे पाऊल म्हणजे निष्ठूरतेचा कळसच म्हणायला हवा. जगातील सर्वच मानवजात तोंडात सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेली नसते. अनेकांच्या शिरावर कमी-अधिक प्रमाणात कर्जाचा भार हा असतोच. अशा खडतर प्रसंगातून सहीसलामत मार्ग काढणे म्हणजेच जीवनाच्या कसोटीला उतरणे होय. जन्मदाते इतके निष्ठूर होण्याची आणि टोकाचे पाऊल उचलण्याची ही घटना तशी पहिल्यांदाच घडली असे नव्हे. कल्याण येथील घटनेच्या तीन दिवस आधी नगर जिल्ह्यातील पोखरी बाळेश्वरच्या सोंडवस्तीत पत्नी माहेरी गेलेली असताना चिमुकला मुलगा व मुलीचा गळा आवळून अशोक फटांगरे नामक पित्याने खून केला व स्वत:ही घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तत्पूर्वी २०१६ साली यवतमाळमध्ये कौटुंबिक कलहातून तीन मुलांसह पित्याने आत्महत्या तर एप्रिल २०१७ मध्ये नाशिकरोड येथेही याच कारणाने दोन मुलांचा गळा आवळून सुनील बेलदार या पित्याने स्वत:ला जाळून आत्महत्या केली होती. अशा प्रकारात दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. कर्ज आणि कलह या गोष्टी ‘घरोघरी मातीच्या चुली’ याप्रमाणे प्रत्येक घरी आहेत, म्हणून काय प्रत्येक जण इतक्या टोकाची भूमिका घेत नसतो. एकीकडे मूलबाळ होत नसलेले दाम्पत्य वंध्यत्व निवारणासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची अनेक उदाहरणे आपल्या अवतीभोवती असताना, दुसरीकडे आपल्या सोन्यासारख्या मुलांचा निष्ठूरपणे गळा आवळून, जाळून आणि भोजनात विष कालवून त्यांचा जीव घेतला जातो, यास काय म्हणावे? माता-पिता मग ते कोणतेही असोत, त्यांना केवळ जन्म देण्याचा अधिकार असतो, जीव घेण्याचा नव्हे. त्यांच्या बिकट परिस्थितीची, कर्जाची आणि कलहाची शिक्षा त्या निष्पाप कळ्यांच्या माथी मारणे हे केवळ निष्ठूरतेचेच नव्हे, तर विकृत मनोवृत्तीचे लक्षण मानायला हवे. मानवी जन्म मिळणे हे इतर जीवसृष्टीमध्ये भाग्याचे मानले जाते. त्यामुळे त्या चिमुकल्यांना जीवनाचा आनंद उपभोगण्याचा, आयुष्य म्हणजे नेमके काय असते, हे अनुभवण्याचा पूर्ण अधिकार असतो. जीवनाचा अर्थ उमगण्याच्या आतच त्यांना मृत्यू नावाच्या काळोखी खोल दरीत कायमचे लोटले जाणे आणि तेही जन्मदात्यांच्या हाताने, यासारखा दैवदुर्विलास दुसरा कोणता असूच शकत नाही. 

Web Title: Despair of Resurrection!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.