मरण खरच एवढे स्वस्त झाले आहे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 02:22 AM2017-11-09T02:22:06+5:302017-11-09T02:22:19+5:30

मरण खरच एवढे स्वस्त झाले आहे काय? माणसाच्या संवेदना एवढ्या बोथट कशा झाल्या? नकारात्मक भावनांचा एवढा उद्रेक का?

Is Death really cheap? | मरण खरच एवढे स्वस्त झाले आहे काय?

मरण खरच एवढे स्वस्त झाले आहे काय?

Next

मरण खरच एवढे स्वस्त झाले आहे काय? माणसाच्या संवेदना एवढ्या बोथट कशा झाल्या? नकारात्मक भावनांचा एवढा उद्रेक का? सामाजिक आणि कौटुंबिक स्वास्थ्य एवढे बिघडलेच कसे, असे एक ना अनेक प्रश्न उपराजधानीतील नागरिकांना सतावत आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. अलीकडेच माहितीच्या अधिकारांतर्गत शहरातील गुन्हेगारीची जी आकडेवारी समोर आली आहे ती अत्यंत धक्कादायक आणि समाजाची चिंता वाढविणारी आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत शहरात ६४ खून झाले आहेत. या शृंखलेत गेल्या आठवड्यात झालेल्या प्राचार्य वानखेडे हत्याकांडाने तर केवळ शिक्षण क्षेत्रच नव्हे, सा-या पंचक्रोशीला हादरवून टाकले.

मृत प्राचार्यांच्या मुलीनेच आपल्या वडिलांची हत्या घडवून आणल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून ही घटना आपले कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्य किती बिघडत चालले आहे, याचे जळजळीत वास्तव मांडणारी आहे. खुनांची संख्या वाढली असतानाच लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांनी पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक आहे. अत्यंत पाशवी, माणुसकीला काळिमा फासणाºया या घटनांचा विचार केला की एवढे प्रचंड क्रोैर्य, विकृती, अमानुषता आणि पराकोटीची असहिष्णुता कुठून येते तेच कळत नाही. अगदी क्षुल्लक कारणांवरुन लोक हिंसक होताना दिसतात. जगण्यात सहजता राहिलेली नाही. परस्पर अविश्वासाचे वातावरण आणि नकारात्मकतेने समाजजीवन ढवळून निघाले आहे.

गुन्ह्यांच्या या आकड्यांसोबतच आत्महत्येचे जे प्रमाण समोर आले आहे ते सुद्धा भयभीत करणारे आहे. राज्याच्या या उपराजधानीत अवघ्या नऊ महिन्यात दीड हजारावर लोकांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले. याचा अर्थ दिवसाला सरासरी पाच जणांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. यात शाळकरी मुलांचाही समावेश आहे. राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याने नागपूर शहरावर संपूर्ण देशाची नजर असते. त्या अनुषंगाने आता संपूर्ण देशाच्या गुन्हेगारीचा विचार होत असताना नागपूर शहराचीही आवर्जून दखल घेतली जात असते आणि अशा अध्ययनात नागपूरची तुलना आता मुंबई आणि कोलकाताशी व्हायला लागली आहे. नागपूर गुन्हेगारांची राजधानी असल्याचे चित्र रंगवू नका, असे आवाहन मुख्यमंत्री करीत असतात. त्यांचे म्हणणे बरोबर असले तरी वाढत्या गुन्ह्यांचे वास्तवही नजरअंदाज करता येणार नाही. त्याचप्रमाणे हा प्रश्न केवळ कायदा आणि व्यवस्थेवर सोपवूनही चालणार नाही. बदलती सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थितीही त्याला जबाबदार आहे, हे लक्षात घ्यावे लागेल.

Web Title: Is Death really cheap?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.