गोपूज गावचा पाण्यासाठी संघर्ष ! जागर-- रविवार विशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:13 AM2018-05-27T00:13:46+5:302018-05-27T00:13:46+5:30

सातारा जिल्ह्यातील गोपूज गावामध्ये गेल्या ८ एप्रिलपासून सलग दीड महिना पाण्यासाठी श्रमदानातून काम चालू होते. निसर्गाची अवकृपा असली तरी पाणी फाऊंडेशनच्या कृपेने गावकरी उन्हाची तमा न बाळगता उद्या पडणाऱ्या पावसाचे पाणी अडविण्यासाठी संघर्ष करीत आहेत.

 Conflicts of water for the cow! Jagar-- Sundays Special | गोपूज गावचा पाण्यासाठी संघर्ष ! जागर-- रविवार विशेष

गोपूज गावचा पाण्यासाठी संघर्ष ! जागर-- रविवार विशेष

googlenewsNext

- वसंत भोसले -

सातारा जिल्ह्यातील गोपूज गावामध्ये गेल्या ८ एप्रिलपासून सलग दीड महिना पाण्यासाठी श्रमदानातून काम चालू होते. निसर्गाची अवकृपा असली तरी पाणी फाऊंडेशनच्या कृपेने गावकरी उन्हाची तमा न बाळगता उद्या पडणाऱ्या पावसाचे पाणी अडविण्यासाठी संघर्ष करीत आहेत.

सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी-वडूज रस्त्यावरील बावीसशे लोकसंख्येचे गोपूज गाव आहे. रखरखत्या उन्हामुळे परिसर उदास वाटतो; पण गावात प्रवेश केला आणि चारी बाजूला पसरलेल्या जमिनीवर नजर टाकली, तर ती फुलविण्यासाठी शेतकरीराजाने आजवर घेतलेली मेहनत दिसते. गावच्या पश्चिमेस डोंगरांची रांग आहे, तसेच उत्तरेस पूर्व-पश्चिम रांग आहे. पश्चिमेच्या डोंगरास मलकोबाचा डोंगर म्हणतात, तर दुसरा डोंगर भावलिंग डोंगर म्हणून ओळखला जातो. हा डोंगर गोपूज आणि नागाचे कुमठे या गावांच्या मध्ये आहे. दोन्ही डोंगररांगांकडे चढ चढत जाऊ लागलो आणि मागे फिरून पाहिले तर संपूर्ण गाव दिसते. गावच्या पूर्वेकडून जाणाºया उरमोडीच्या कालव्याच्या पाण्याने गावची दहा टक्के जमीन सिंचनाखाली आहे. तेथे उसाची शेती, हिरवी राने फुलताना दिसतात. दक्षिणेला साखर कारखानाच उभा आहे. गोपूजचा साखर कारखाना!

गोपूज गावच्या परिसरात सरासरी चारशे ते साडेचारशे मिलिमीटर पाऊस पडतो. इंचांमध्ये मोजला तर सरासरी अठरा होईल. उसाच्या शेतीला किमान चाळीस इंच पाणी लागते. त्यामुळे ऊस शेती ही या गावच्या परिसरात शक्यच नाही. किमान पडणारा पाऊस अडवून गावच्या शिवारात पाणी मुरविण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी गावकरी एकत्र आले. कामधंद्यानिमित्त आणि नोकरीसाठी बाहेर असणाºया या गावच्या सुपुत्रांनीही त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. अभिनेता आमिर खान यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या पानी फाऊंडेशनच्या मदतीने पाणीदार गाव करण्यासाठीच्या स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रातील सुमारे चार हजार गावे यामध्ये उतरली आहेत. त्यात सातारा जिल्ह्यातील १९२ गावांचा समावेश आहे. माण, खटाव, फलटण, खंडाळा, आदी तालुक्यांतील दुष्काळी पट्ट्यातील बहुतांश गावांचा यामध्ये समावेश आहे. गेल्या ८ एप्रिलपासून सहा आठवड्यांच्या ग्रामस्थांच्या श्रमदानातून कामाला सुरुवात झाली. पश्चिम आणि उत्तरेस असलेल्या डोंगररांगांवर पडणारा पाऊस गावच्या दोन्ही बाजूने वाहत पूर्वेकडे पाणी वाहून घेऊन जातो. त्यामुळे या दोन्ही डोंगररांगांमध्ये ठिकठिकाणी पाणी अडविण्याचे तंत्र अवलंबण्यात आले. छोटे-छोटे ओहोळ वाहतात. ते गावच्या बाजूने वाहणाºया मोठ्या नाल्याला मिळतात. त्यावर असंख्य ठिकाणी दगडावर दगड रचत बांध घालण्यात गावकरी, तरुण-तरुणी आणि महिला मोठ्या संख्येने उतरल्या आहेत. गावच्या सरपंच उषाताई जाधव, त्यांचे पती महादेव जाधव, निवृत्त प्राध्यापक दत्तात्रय जाधव, व्हिजन इंडियाचे प्रतिनिधी आणि पानी फाऊंडेशनचे प्रतिनिधी सूर्यभान जाधव, गावचे सुपुत्र आणि वलसाड (गुजरात) मध्ये भावाच्या कारखान्यात मदत करणारे मिनाज मुलाणी, आदींच्या देखरेखीखाली सरासरी दोनशे माणसं उन्हाचा तडाखा सहन करीत राबत होती.

संपूर्ण गावचा नकाशा तयार करण्यात आला आहे. पावसाचा मार्ग आणि वाहणाºया पाण्याचा प्रवाह, आदींचा विचार करून प्रत्येक ओहोळ अडविण्याचे नियोजन झाले आहे. या कामामध्ये अनेक शेतकरी उतरले आहेत. वडूजचे प्रा. सुधीर इंगळे यांची खासीयत आहे की, फलटणच्या मुधोजी महाविद्यालयाच्या एनएसएसमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींना घेऊन सामाजिक कार्यात उतरायचे. इंगळे सर पन्नास मुलांची टीम घेऊन गेले सहा आठवडे गावात तळ ठोकून आहेत. या सर्वांच्या श्रमदानाने गावाने ‘पाणी अडवा आणि पाणी जिरवा’ या कामात स्वत:ला झोकून दिले आहे. आता ही सर्व कामे पूर्ण झाली आहेत. पानी फाऊंडेशनतर्फे या कामाचे मूल्यमापन यथावकाश होईल. उत्तम काम केलेल्या गावांची निवडही केली जाईल, त्यांना बक्षीसही मिळेल, गौरव होईल.
ही सर्व धडपड पाहत असताना उपस्थित शेतकºयांशी झालेला संवाद महत्त्वाचा होता. गावच्या दोन्ही बाजंूना असलेल्या डोंगरांवर पवनचक्क्या बसविण्यात आल्या आहेत. एका डोंगरावर पडणाºया रखरखीत उन्हापासून वीज निर्मिती करणारी सोलर पॅनेल्स उभारली गेली आहेत. गावच्या शिवारात वाहणारा वारा आणि पडणारे ऊन मात्र गावकºयांच्या उत्पन्नाचे साधन झालेले नाही. ते कोणातरी कंपनीचे उत्पन्नाचे साधन झाले आहे. (वास्तविक हा वारा आणि ते ऊन गावच्या परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्तीच आहे. मात्र, त्याची मालकी खासगी झाली आहे. गोपूज वीज निर्मिती कंपनी स्थापन होऊन ही दोन्ही उत्पादनाची साधने गावच्या मालकीची झाली असती तर? आणि हे होण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे धोरण असते तर? असा सवाल मनात येऊन गेला.)

गोपूजचे शेतकरी सांगत होते की, गावाला एकूण हजार हेक्टर जमीन आहे. त्यापैकी थोडी गायरान आणि पडीक आहे. जवळपास दोन हजार एकरांवर पूर्वी नगदी पीक म्हणून रताळी घेतली जात होती. रताळ्यांसाठी पाणी कमी पडू लागले तेव्हा शेतकरी बटाट्याकडे वळले. खरीप हंगामात बटाटा आणि रब्बीमध्ये ज्वारी हा अनेक वर्षे पीक पॅटर्न होता. अलीकडे बटाट्याला दर मिळत नाही, त्यामुळे निम्म्याहून अधिक क्षेत्रातील पीक कमी झाले आहे. काही शेतकºयांनी डाळिंबाच्या बागा लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याची कमतरता, तेल्या रोगाचा प्रादुर्भाव आणि दराची शाश्वती नसल्याने ते पीकही धोक्यात आले. उरमोडी धरणाच्या कालव्याने काही भाग सिंचनाखाली आहे. तेथील शेतकºयांनी ऊस लावला आहे. त्याप्रमाणेच आपणही ऊसच लावण्याचा विचार करतो आहोत. उसाशिवाय एकही शाश्वत पीक नाही, मार्केटचा आधार नाही. शिवाय गावच्या शिवारातच साखर कारखाना आहे.

पानी फाऊंडेशनच्या कार्याला यश मिळणार आहे. गोपूज गावच्या शेतकºयांच्या श्रमाचे चीज होणार आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ याचे उत्तम काम झाले आहे. ही चळवळ कायम करत राहावी लागणार आहे. आज जलयुक्त शिवार होत असेल, मात्र पूर्वीपासून प्रयत्न झाले आहेत ते मध्येच अर्धवट सोडून दिले आहेत, याचा पुरावा याच गावात आहे. डोंगरमाथ्यापासून होत असलेले काम पाहत गावाजवळ आलो तेव्हा तेथे पाझर तलावात जवळपास वीस फूट साचलेला गाळ काढण्याचे काम चालू होते. यंत्राच्या मदतीने काही कामे करायची आहेत, तीही कामे होती. १९७२ च्या दुष्काळाने गाव पाण्याअभावी होरपळत होते तेव्हाच्या सरकारने प्रत्येक गावाला एकतरी पाझर तलाव बांधण्याचा निर्धार केला होता. पाणी अडविण्याबरोबरच रोजगार हमी योजनेतून काम देण्याचा तो प्रयत्न होता. मात्र, हे पाझर तलाव नंतर गाळाने भरले. आता पाणी साठतही नाही आणि पाझरतही नाही. साठण्यासाठी जागा नाही आणि पाझरण्यासाठी पाणी नाही, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे पानी फाऊंडेशनचे काम सतत करत राहावे लागणार आहे.

आज झालेल्या कामात येणाºया हंगामात पाऊस झाला तर पाणी मुरणार आहे. जमिनीखालील पाण्याची पातळी वाढणार आहे. या गावात सुमारे अडीचशे बोअरवेल आहेत, असेही सांगण्यात आले. जमिनीखाली मुरलेले पाणी जपून वापरावे लागणार आहे आणि ज्या मालाला शाश्वत बाजारपेठ मिळेल अशीच पिके घ्यावी लागणार आहेत. पाणी अडले आणि जिरले तरी त्याचा वापर करून उभी राहणारी पीक पद्धत कोणती असेल याचा पुढे जाऊन विचार करावा लागणार आहे. पाणी अडविण्याचा पहिला टप्पा या स्पर्धेत उतरलेल्या गावांनी पार पाडला आहे. तसे गोपूजच्या ग्रामस्थांनी घेतलेले कष्ट आणि चालू ठेवलेला संघर्ष पाहिला की, त्यांना सलाम करावा तेवढा कमी आहे.

पाणी चळवळीचा पुढचा टप्पा हा राहावा की, उपलब्ध होणारे पाणी योग्यरीत्या वापरून कोणती पीक पद्धत अवलंबवावी, जेणेकरून जमिनीखालील पाण्याची पातळी पुन्हा कमी होणार नाही. त्यासाठीचे धोरण आवश्यक आहे. अन्यथा या चळवळीचे परिणाम दोन-तीन वर्षे दिसतील. परत पुन्हा पाणी टंचाई जाणवू लागेल. याचे उत्तर शेतकºयांनी जी विविध पिके घेण्याचे नियोजन बदलले त्यात आहे. रताळी पिकविणारे गाव बटाट्याकडे वळले. डाळिंबे घेण्याचा प्रयत्न केला. आता ऊस घेणार का? त्यासाठी शाश्वत पाणी आहे का? सध्याच्या परिस्थितीत ऊस, हळद, केळी, डाळिंब, द्राक्षे, आदी नगदी पिके किफायतशीर ठरतात; पण त्यासाठी पाणी लागते. पाणी चळवळ पुढे शाश्वतपणे चालू ठेवायची असेल तर पुढील टप्प्यात या गावांना पीक पद्धत आणि तिची बाजारपेठ उपलब्ध करून देणारी यंत्रणा उभी करणारी चळवळ करावी लागेल, असे दिसते.गोपूजच्या त्या माळरानावर चाललेली पाण्यासाठीची चळवळ नवी दिशा देणारी आहे. त्यांचा संघर्ष समृद्धीकडे घेऊन जाणारा आहे. तो यशस्वी होवो!

गोपूजने यंदा सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत सहभाग घेतला होता. कायम दुष्काळाच्या झळा सोसणाºया ग्रामस्थांनी तसेच नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी असलेल्या मंडळींनी गाव पाणीदार करायचे ठरविले. त्यासाठी जनजागृती करण्याच्या हेतूने गावात प्रमुख ठिकाणी असणाºया भिंतींवर पाणी हा विषय घेऊन भित्तीचित्रे काढण्यात आली. भित्तीचित्रे वाराणसीवरून आलेले व दिल्ली स्कूल आॅफ फाइन आर्टचे अनिलकुमार यांनी एक रुपया न घेता काढली. सर्व गाव चित्रांच्या माध्यमातून पाणीदार कसे बनेल याचा संदेश देण्यात आला.

-शोषखड्डे : लोकसंख्येच्या आधारावर १९३ खड्डे आवश्यक.
गावाने २०० हून अधिक शोषखड्डे काढले.

-नर्सरी/रोपवाटिका - लोकसंख्येच्या आधारावर ४४४५ झाडे आवश्यक.
गावाने बनविलेली रोपे - ६५००

-श्रमदान/मनुष्यबळाचा वापर करून केलेली कामे - स्पर्धेसाठी लोकसंख्येच्या आधारावर आवश्यक १३३३२ क्यू.मी.
गावाने केलेले काम १४४८६.१७५ क्यू.मी.

-यंत्राचा वापर करून बांधलेल्या मृद व जलसंधारण रचना - स्पर्धेसाठी आवश्यक - १,५९,९०० क्यू.मी.
गावाने केलले काम - २१६५२०.६७ क्यू.मी.

-वॉटर बजेट : गावचे वॉटर बजेट ४५३ कोटी लि.
पाण्याचा तुडवडा - १२०.३४ कोटी लिटर

वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतल्यानंतर सर्वसाधारण २०० कोटी लिटर पाणी साठेल एवढी कामे पूर्ण.
संपूर्ण क्षेत्रात केलेल्या सीसीटीची लांबी अंदाजे ३५ ते ४० कि.मी. येईल.ओढा खोलीकरण-रुंदीकरण झाले आहे. १७ शेततळी काढली आहेत.

-१९७२ च्या दुष्काळातील तलावाचे भाग्य उजळतेय - या स्पर्धेच्या माध्यमातून यांत्रिकीकरणाच्या साहाय्याने औंध रोडच्या पाझर तलावातून प्रथमच गाळ काढण्याचे काम सुरू आहे.

Web Title:  Conflicts of water for the cow! Jagar-- Sundays Special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.