न्यायालयांच्या खटल्यांपासून ते दुर्मीळ झालेल्या चिमण्यांपर्यंतची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 06:49 AM2019-01-13T06:49:42+5:302019-01-13T06:49:50+5:30

मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्यावर गांधी विचारांचा खूप मोठा पगडा होता. शांतीवनासाठी त्यांनी भरपूर काम केले होते. समाजातल्या प्रश्नांबाबतही त्यांना खूप काळजी होती. त्यांच्या समग्र आठवणी उलगडणारा हा लेख.

Concerns from court cases to rare sparrows | न्यायालयांच्या खटल्यांपासून ते दुर्मीळ झालेल्या चिमण्यांपर्यंतची चिंता

न्यायालयांच्या खटल्यांपासून ते दुर्मीळ झालेल्या चिमण्यांपर्यंतची चिंता

Next

ज्या दिवशी एकही कुष्ठरोगी राहणार नाही, कुणी दु:खी-कष्टी उरणार नाही, तो दिवस माझ्यासाठी अत्याधिक आनंदाचा असेल. मी हौस म्हणून शांतीवनाचा पसारा वाढविला आहे का? न्यायमूर्ती धर्माधिकारी व्यासपीठावरील टेबलासमोर खुर्ची मांडून बोलू लागत आणि शेकडोंच्या संख्येने ज्ञानपिपासू कानात प्राण एकवटून शांत चित्ताने ऐकू लागत. मग न्यायालयांच्या खटल्यांपासून ते दुर्मीळ झालेल्या चिमण्यांपर्यंतची चिंता ते व्यक्त करीत.


त्याचप्रमाणे, भूमिगत दादांचा (वडील) स्वातंत्र्य लढा, त्या बैठका, ते उठाव, गोऱ्या सायबांच्या संगिनी-लाठ्या, तुरुंगाच्या वाºया आणि या स्वातंत्र्य सैनिकांची सेवा करता-करता, मनोरुग्ण झालेल्या आईची गोष्ट सांगताना त्यांच्यासवे आमचीही हृदये हेलावून जात. दादा तुरुंगातच असत आणि आई वेड्यांच्या इस्पितळात. आईला दगड मारणाºया त्या लहान मुलांचा मला कधी राग नाही आला. स्वातंत्र्यासाठी सारे वेडेच झाले होते ना? असे पराकोटीच्या सहनशीलतेचे उद्गार ऐकताच, त्या उत्तुंग न्यायाधीशाच्या पुढील शब्दांसाठी आम्ही आशाळभूत नजरेने जीव कानात एकवटून बसत असू.


समाजाला भेडसावणारा प्रत्येक विषय बाबांना यातना देत होता. माणूसपण हरवलेल्या समाजातील अराजगता उघड्या डोळ्यांनी पाहताना, या शतकाकडे झुकलेल्या-पारतंत्र्यातल्या व स्वतंत्र भारतातल्या संवेदनशील साक्षीदाराचे मन अलीकडच्या काळात विषण्ण झाले होते. त्याच दरम्यान कधीतरी बाबांचे अनुभव कथनपर उद्बोधक भाषण सुरू होई.


काल माझी नात परदेशातून आली, ‘बाबा, मला चिमणी दाखवा,’ म्हणाली. त्या नरिमन पॉइंटच्या समुद्रकिनारी मी तिला कशी चिमणी दाखविणार? आपण त्यांना दाणा-पाणी ठेवले नाही, चिऊ-काऊचा घास काढायला विसरलो, त्यांच्या राहण्याची ठिकाणे बंद केली, मग त्या कशा दिसणार? आपल्या आधाराने राहणाºयांची-पशू-पक्षांची आपण नको का काळजी घ्यायला? न्यायमूर्ती भूतदया शिकवत आणि लहान मुले सावरून बसत.


गेल्याच महिन्यात हिमालयात (आसपास कुठेतरी) एक स्थानिक वृद्धा वेफर्स विकत होती. तिथे फक्त बटाट्यांचेच पीक येते, तिने दहा-दहा रुपयांच्या वेफरचे ढीग लावले होते. माझा नातेवाईक म्हणाला, दहाला दोन ढीग दे. तिने दिले व म्हणाली, ‘साहब दुकान में तुम दस रुपयोंकी हवाही खरीदते हो, वेफर नहीं.’ मी त्याच्याकडे पाहून म्हणालो, ही काही श्रीमंत होण्यासाठी इथे बसली आहे का? तिच्या कुटुंबाला कुवत असणाºयांनीच नको का हातभार लावायला? आणि लोक शहाणी होत व कुष्ठरोग्यांच्या, आदिवाशी बचतगटांच्या स्टॉलवर गर्दी करीत.


आता ही मेधा, मी हिला नर्मदा म्हणतो. धरणग्रस्तांसाठी लढली. उमेदीचा काळ तिने घालविला, मी व बाबा आमट्यांनी सारे जवळून पाहिले, पाठिंबा दिला...तरी धरण झाले. प्रश्न काही सुटले नाहीत. खरे काय ते तिने सांगितलेच. मला परवा एक मोठा पुढारी म्हणाला, ‘काय धर्माधिकारी साहेब, मेधा पाटकर हरलीच ना?’ त्यावर मी काही बोललो नाही, पण नंतर तो खजील झाला. एक गोष्ट ऐका... आणि न्यायमूर्ती बाबांनी गोष्ट सुरू केली.


एक डोंगर होता. त्यावर बरेच पशुपक्षी राहत आणि एके दिवशी त्या डोंगराला आग लागली. सारे पशुपक्षी जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळू लागले. मात्र, एक चिमणी घाबरून गेली नाही. तिने एक कापसाचा बोळा घेतला आणि दूरवरून पाणी आणून ती त्या आगीवर शिंपडू लागली. ते पाहून इतर सारे तिला हसू लागले, हिणवू लागले. तुझ्या कापसाच्या बोळ्याने ही आग विझणार आहे का? सोड हा वेडेपणा चल पळ. त्यावर ती चिमणी म्हणाली, ‘मला माहीत आहे, माझ्या विझविण्याने ही आग विझणार नाही, पण जेव्हा केव्हा या डोंगराचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा आग लावणाºयांच्यात माझे नाव नसेल, तर आग विझविणाºयांमध्ये माझे नाव लिहिले जाईल-भोज राजाप्रमाणे,’ आणि आम्ही नर्मदाताईसह सारेच कार्यकर्ते सुखावलो. समाधान पावलो. आपण करीत असलेल्या निष्काम सेवेची ती पावतीच होती ना. आता आम्ही मेधातार्इंना ‘नर्मदाताई’च म्हणतो.


वाढत्या बलात्काराच्या घटनांनी न्यायमूर्तींचे हृदय पिळवटून गेले होते. त्यांची घुसमट शब्दांतून बाहेर पडत होती.
माझी नात मला रात्रीचा डबा घेऊन येते. जेवण झाल्यावर थोड्या गप्पा मारून झाल्यावर रस्त्यापलीकडच्या इमारतीत तिच्या घरी जाते. गॅलरीत उभे राहून ती सुरक्षित इमारतीत पोहोचते का, हे पाहण्याची गरज मला का बरं भासावी? एवढे आपण असुरक्षित झालो आहोत का? समाजात ही अराजकता कशामुळे पसरत चाललीय? एक शिक्षण आणि दोन संस्कार, आता संस्कार होतील, अशी ठिकाणे तरी राहिली आहेत का? मूल शाळेतच असुरक्षित असेल, तर ती शिक्षण व्यवस्था कोणत्या बरं दिशेने चाललीय?


त्सुनामी आली. लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. जे मरण पावले ते सुटले, पण उरलेल्यांच्या नशिबी काय बरं भोग आले? या अभय आणि राणीने माणसाच्या रूपातला पशू पाहिलाय. सोन्या-नाण्याची लूट तर झालीच, पण त्या रात्री किती महिलांवर, पोरी-बाळींवर अत्याचार झाले, याची कल्पनाही करवणार नाही. या बंग दाम्पत्याने तिथेच कायमचा मुक्काम ठोकला. बरं, ते त्यांचे घाव-जखमा बºया करतील, पण मनावरील आघात-माणसावरील भरवसा कसा बरं परत आणतील?
आपल्या सुरक्षेसाठी प्रत्येक वेळी पोलिसांवरच का बरं अवलंबून राहावे लागते. शेजारधर्म आपण पार विसरून गेलो आहोत का ? प्रत्येकाने शेजारधर्माचे पालन केलेच पाहिजे ना.जो देव, याला आत घे आणि याला बाहेर ठेव, अशी शिकवण आपल्या अनुयायांना देतो, अशा देवाच्या देवळात आपण जावेच कशाला? हे मी तुम्हाला धर्माधिकारी या नात्याने विचारतो. माणसाने माणसाशी माणसासारखेच वागावे. ही साधी गोष्ट आपल्याला कळू नये का? आणि लोकांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडायचा.


राष्ट्र सेवादलाचे संस्कार असल्याने शांतीवनात आम्ही विद्यार्थी दशेपासूनच जात होतो. आमची बहुतांश शिबिरे शांतीवन कुष्ठरोग निवारण केंद्रातच होत असत. बाबा आमट्यांनी जेव्हा शांतीवनाला भेट दिली, तेव्हा या विभूतींचे कार्य पाहून त्यांना गहिवरून आले, आनंदवनाला पडलेले पहाटेचे स्वप्न म्हणजेच शांतीवन, या शब्दांत त्या महामानवाने शांतीवनाचा गौरव केला. शांतीवनाची धुरा न्यायमूर्तींनी १९९५ साली सांभाळली. माणूस आणि त्याच्या कर्तृत्वावर न्यायमूर्तींना असलेला अदम्य विश्वास, शांतीवनाची अक्षय शक्ती ठरला. कुष्ठरोगी आत्मनिर्भर होऊ लागले. शेती करू लागले. भल्यामोठ्या शेडमध्ये सूत कातू लागले. खादीची विक्री करू लागले आणि लोकांच्या मनातील कुष्ठरोग्यांबद्दलची भीती वाºयासवे पळाली आणि कुठे शांतीवनाला उभारी आली. थोरा-मोठ्यांची पावले कुष्ठरोग निवारण केंद्राकडे वळू लागली. मदतीचा ओघ आला. कुष्ठरोग्यांचे पुनर्वसन झाले. मुलांसाठी आश्रम शाळा सुरू झाली. वृद्धाश्रमाची स्थापना झाली. गतिमंद आणि अपंगांसाठी आधारकेंद्र सुरू झाले. दोन गोशाळा सुरू झाल्या, निसर्गोपचार केंद्र सुरू केले.


आता नेºयापर्यंत डेव्हलपमेंट होत आली आहे. शांतीवनातूनही शासनाचे रस्ता-उड्डाणपुलाचे नियोजन पुढे येत आहे. भविष्यात काळाच्या ओघात न्याय मिळेल की सारे उद्ध्वस्त होईल, हीच चिंता गेल्या दोन मेळाव्यांत न्यायमूर्तींनी व्यक्त केली. ६ जानेवारीला न्यायमूर्ती शांतीवनात मेळाव्याच्या तयारीला येणार होते.


- प्रमोद पवार

Web Title: Concerns from court cases to rare sparrows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.