चला, टीव्ही बंद करु या...!

By अतुल कुलकर्णी on Sat, February 10, 2018 5:41am

माझ्या माहितीप्रमाणे आपण १८ आॅगस्ट २०१४ रोजी ‘चला, हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम झी टीव्हीवर सुरु केला आणि लोकांच्या मनात तुम्ही अल्पावधीत हक्काचे घर केले. सामाजिक विषयांनाही हळुवार विनोदी ढंगाने सादर करण्याची एक वेगळी शैली तुम्ही या कार्यक्रमाने पेश केली. यातील विनोद सभा समारंभात, खासगी पार्ट्यांमध्ये आवर्जून सांगण्यात लोकांना धन्यता वाटू लागली. सगळ्यात महत्वाचे म्हणजे लोक तासभर तरी स्वत:चे दु:ख विसरुन हसू लागले. त्याबद्दल तुमचे जाहीर कौतुक. अभिनंदन..!

प्रिय निलेश साबळे आणि टीम, माझ्या माहितीप्रमाणे आपण १८ आॅगस्ट २०१४ रोजी ‘चला, हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम झी टीव्हीवर सुरु केला आणि लोकांच्या मनात तुम्ही अल्पावधीत हक्काचे घर केले. सामाजिक विषयांनाही हळुवार विनोदी ढंगाने सादर करण्याची एक वेगळी शैली तुम्ही या कार्यक्रमाने पेश केली. यातील विनोद सभा समारंभात, खासगी पार्ट्यांमध्ये आवर्जून सांगण्यात लोकांना धन्यता वाटू लागली. सगळ्यात महत्वाचे म्हणजे लोक तासभर तरी स्वत:चे दु:ख विसरुन हसू लागले. त्याबद्दल तुमचे जाहीर कौतुक. अभिनंदन..! पाहता पाहता तुम्ही लोकप्रियतेचे सगळे मापदंड ओलांडले. त्यामुळे बॉलीवूडमधून शाहरुख, आमिर, सलमान असे सगळे खान व अनेक मोठे नेते या कार्यक्रमात आले. त्यावेळी तुम्ही शाहरुखच्या पाया पडलात, तरीही कोणी त्याबद्दल ब्र काढला नाही. कारण तुमचा हेतू शुद्ध आणि प्रामाणिक होता. यश पचवणे मोठे कठीण असते; पण तुम्ही सगळ्यांनी ते यशही लिलया पचवले. उतला नाहीत, मातला नाहीत... म्हणूनच पाहता पाहता तुम्ही जगाच्या दौ-यावर गेलात आणि मग मात्र तुमचा स्वत:वरचा ताबा सुटला तो सुटलाच. अत्यंत दर्जाहिन, किळसवाणे आणि सतत पुरुषांना महिलांच्या वेशात (ते ही किळसवाण्या पध्दतीने) फिरवले की लोक हसतात असा जणू तुम्ही पक्का समज करुन घेतला आणि तुमची स्वत:चीच नाही तर महाराष्ट्राच्या विनोदाची पातळीही तुम्ही घालवून टाकली. मराठी विनोद या असल्या भिकार गोष्टींच्या पुढे जाऊ शकत नाही, हे ही तुम्ही दाखवून दिले. आचार्य प्र.के. अत्रे, पु. ल. देशपांडे अशा अनेक कसलेल्या महाराष्ट्र भूषणांनी विनोदाची जी जातकुळी तयार केली होती आणि ती ज्या भव्य उंचीची होती त्याच्या नखाचीही बरोबरी न साधणा-या तुमच्या परदेशवारीने स्वत:चे वैचारिक दारिद्य्र दाखवून दिले आहे. दादा कोंडके आज हयात असते तर त्यांच्या शैलीत तुमची कापडं टराटरा फाडून टाकली असती. परदेशात गेल्यानंतर आपल्या विनोदाची भव्य दिव्य परंपरा दाखवण्याऐवजी साड्या नेसलेल्या आणि अत्यंत घाणेरडे विनोद करत परदेशात वावरणा-या तुम्ही सगळ्यांनी स्वत:ची तर लाज काढलीच शिवाय त्या त्या देशात राहणा-या मराठी भाषिक जनतेला देखील खाली मान घालायला लावली आहे. ‘तुमच्याकडे विनोदी कार्यक्रम हे असेच असतात का...?’ असे आम्हाला विचारले जात आहे, अशा तक्रारी तेथे राहणा-या अनेक मराठी भाषिकांनी केल्या. त्या तुमच्यापर्यंत आल्या की नाही माहिती नाही, आल्या असल्यातरी तुमच्या अंगभर नेसलेल्या साड्यांमधून त्या तुमच्यापर्यंत आल्या की नाही ते ही कळत नाही...! अरविंद जगताप सारख्या अत्यंत संवेदनशील लेखकाने लिहीलेल्या अनेक पत्रांनी तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढली. लोक तुमच्याकडे सामाजिक विषयावर भाष्य करणारे मान्यवर म्हणून पाहू लागले. तुमची दखल घेऊ लागले. अर्थात त्याचे श्रेय आमच्या अरविंदचे पण तुम्ही तर फारच फुटकळ आणि टुकराट निघालात... तुमच्याकडून ही असली अपेक्षा नव्हती..! तुमचे हे असले थिल्लरपण लख्खपणे उघडे झाले ते कलर्स वाहिनीवर तुमच्याच वेळेला सुरु झालेल्या ‘सूर नवा, ध्यास नवा’ या कार्यक्रमाने. अत्यंत दर्जेदार आणि संयत असा या कार्यक्रमाने मराठी भाषेची श्रीमंती न बोलता दाखवून दिली ती स्वत:च्या कृतीने..! महेश काळे, अवधूत गुप्ते आणि शाल्मली खोलगडे यांच्या अभ्यासू प्रतिक्रिया, तेजश्री प्रधानचे चपखल भाष्य आम्हाला भावले आणि आम्ही रेकॉर्डिंगला टाकलेला तुमचा कार्यक्रम रद्द करुन त्याचे रेकॉर्डिंग सुरु केले तर त्यात काय चुकले..? शरयु दाते या मुलीने ‘सहेला रे...’ जेव्हा गायले तेव्हा तिचे कौतुक करताना परीक्षक असणारी शाल्मली देखील रडते यातून सच्चेपणा दिसला. तुमच्या कार्यक्रमातला सच्चेपणा कदाचित तिकडे गेला असावा... तुमच्या कलेवर प्रेम करण्याचा आमचा अधिकार हिरावून घेण्याचा हक्क तुम्हालाही नाही, याचा अर्थ तुम्ही बेताल वागावे असा होत नाही हे लक्षात ठेवा. जमले तर स्वत:मध्ये सुधारणा करा, नाहीतरी आम्ही कार्यक्रम बघणे बंद करुन हा विषय आमच्यापुरता संपवलेला आहेच...

आपल्या कलेवर प्रेम करणारा, - अतुल कुलकर्णी @atulkulkarnijournalist

संबंधित

‘थार’च्या वाळवंटात रंगणार ‘राग’स्थान’ महोत्सव!
महात्मा फुले यांच्यावर तीन भाषांत चित्रपट; नामांकित संस्थेकडून निर्मिती
दिल्लीत होणार थिएटर आॅलिम्पिक्स! ३0 देशांचा सहभाग; २५ हजारांहून अधिक कलाकार येणार
डांग सेवा मंडळ संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
तिच्या नजरेनं अन् हास्यानं तरुणाई घायाळ; फॉलोअर्सची संख्या गेली लाखोंच्या घरात

संपादकीय कडून आणखी

श्री श्री रविशंकर यांना दूर सारतेय भाजपा!
हौतात्म्याला धर्माचा रंग नको
चालता-बोलता संदर्भ ग्रंथ !
संघाला समांतर लष्कर निर्माण करण्याची गरज का?
‘नमो ताणमुक्ती जाळी योजना’

आणखी वाचा