शीतयुद्धाने टोक गाठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 12:50 AM2018-04-02T00:50:02+5:302018-04-02T00:50:02+5:30

रशियामधील व्लादिमीर पुतिन यांच्या हुकुमशाही राजवटीविरुद्ध इंग्लंड व अमेरिकेसह सर्व नाटो राष्ट्रे संघटित झाली असून त्यांनी आपापल्या देशात असलेल्या अनेक रशियन राजदूतांना त्यांच्या घराचा रस्ता दाखविला आहे. इंग्लंडमध्ये वास्तव्य करीत असलेल्या आपल्या एका माजी दूताचा रशियाने आपल्या एजंटांकरवी खून केल्याचा बदला म्हणून हे पाश्चात्त्य देश रशियाविरुद्ध एकत्र आले आहेत.

 Cold war | शीतयुद्धाने टोक गाठले

शीतयुद्धाने टोक गाठले

Next

रशियामधील व्लादिमीर पुतिन यांच्या हुकुमशाही राजवटीविरुद्ध इंग्लंड व अमेरिकेसह सर्व नाटो राष्ट्रे संघटित झाली असून त्यांनी आपापल्या देशात असलेल्या अनेक रशियन राजदूतांना त्यांच्या घराचा रस्ता दाखविला आहे. इंग्लंडमध्ये वास्तव्य करीत असलेल्या आपल्या एका माजी दूताचा रशियाने आपल्या एजंटांकरवी खून केल्याचा बदला म्हणून हे पाश्चात्त्य देश रशियाविरुद्ध एकत्र आले आहेत. प्रथम इंग्लंडने त्या देशातील १३ रशियन राजदूतांना देश सोडून जायला सांगितले. त्यापाठोपाठ अमेरिकेने तेथील ६० रशियन राजदूतांना तसाच आदेश दिला. त्याचवेळी अमेरिकेच्या सिअ‍ॅटलमधील पाणबुड्यांच्या तळाजवळ असलेली रशियाची वकालतही त्या देशाने बंद केली. त्यानंतर लगेच फ्रान्स, जर्मनी, इटली, नॉर्वे इत्यादींसह युक्रेननेही आपल्या भूमीवरील रशियन राजदूत त्यांच्या देशात परत पाठविण्याचा निर्णय घेतला. या संघटित कारवाईविरुद्ध आम्हीही योग्य ती कारवाई करू अशी धमकी रशियाकडूनही सर्व संबंधित देशांना देण्यात आली आहे. या घटनेमुळे अमेरिका व रशिया यांच्यातील जुन्या शीतयुद्धाने पुन्हा उचल खाल्ली आहे आणि ते कमालीच्या स्फोटक पातळीपर्यंत पोहोचले आहे. याआधीच अमेरिकेने रशियाविरुद्ध अनेक आर्थिक निर्बंध जारी केले आहेत. रशियाने अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेप करून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाला मदत केली ही बाब आता अमेरिकेच्या सिनेटकडून तपासली जात आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेसह सर्व पाश्चात्त्य देशांनी आता घेतलेली भूमिका महत्त्वाची व काहीशी आक्रमक म्हणावी अशी आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या या भूमिकेने इंग्लंडमधील तेरेसा मे यांच्या सरकारचे बळही वाढविले आहे. या सरकारने घेतलेली ब्रेक्झिटची भूमिका अद्याप त्या देशाच्या व युरोपच्या अंगवळणी पडली नाही. त्यामुळे हे सरकारही काहीसे अडचणीत आले आहे. या स्थितीत सारी युरोपीय राष्ट्रे त्या देशासोबत उभी राहत असतील तर ती बाब तेथील सरकारच्या पाठीशी सारे पाश्चात्त्य जग उभे असल्याचे सांगणारी आहे. मात्र त्याचवेळी पाश्चात्त्य जग विरुद्ध रशिया ही विभागणी जगातील शांततेचा काळ काहीसा चिंताग्रस्त करणारीही आहे. या घटनेमुळे रशिया आणि अमेरिकेसह सगळी पाश्चात्त्य राष्ट्रे यांच्यातील संवाद संपविला आहे आणि हा संवाद संपणे ही बाब त्यांच्यातील शीतयुद्ध कोणत्याही क्षणी प्रत्यक्ष युद्ध होऊ शकेल याची सूचना देणारी आहे. आजच्या घटकेला साऱ्या जगातच राष्ट्रा-राष्ट्रात वैर उभे होताना दिसत आहे. चीन आणि भारत यांच्यातील तणाव आता जगजाहीर आहे. चीनचे जपान, आॅस्ट्रेलिया आणि व्हिएतनामशी असलेले संबंध फारसे चांगले नाहीत. त्यातून उत्तर कोरिया हा देश अमेरिकेला अणुयुद्धाची धमकी देत आहे आणि त्याचा अध्यक्ष किम उल जोन हा सध्या चीनच्या भेटीला आलाही आहे. याचवेळी चीन आणि रशिया या एकेकाळच्या मित्रदेशातील संबंधही आता तेवढ्या जवळिकीचे राहिले नाहीत. हा काळ भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर रोज घडत असलेल्या गोळीबारांच्या घटनांनीही ग्रासला आहे. तात्पर्य, जगातील प्रत्येकच प्रमुख देश आज कोणत्या ना कोणत्या दुसºया देशाविरुद्ध भूमिका घेत असताना दिसत आहे. सारा मध्य आशिया तेथील अतिरेक्यांच्या कारवायामुळे हिंसाचारग्रस्त आहे. शिवाय तेथील अरब देश पुन्हा इस्रायलविरुद्ध युद्धाच्या भूमिकेत अनेक वर्षांपासून उभे आहेत. या देशांना अनुक्रमे रशिया व अमेरिका यांचे कधी छुपे तर कधी उघड असे पाठबळही मिळत आहे. सारे जगच एखादेवेळी युद्धाची भूमी होईल असे सांगणारे हे जागतिक राजकारणाचे चित्र आहे. हे चित्र बदलायचे तर जगातील सर्व प्रमुख देशांना पुन्हा एकवार आपसात संवाद करणे व त्यासाठी लागणारे वातावरण तयार करणे गरजेचे आहे. मोठ्या राष्ट्रांच्या संघर्षमय भूमिकेत लहान देश फारसे भाग घेत नाहीत मात्र त्यांच्यातील संघर्षाच्या काळात ते फारसे सुरक्षितही राहात नाहीत. त्यामुळे जागतिक शांततेची आताची गरज परस्पर संवाद ही आहे व तो तातडीने सुरू होणे गरजेचे आहे.

Web Title:  Cold war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.