‘स्वच्छ भारत’ मोहीम हे गांधी विचारांचं विकृतीकरणच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 03:18 AM2017-10-05T03:18:46+5:302017-10-05T03:19:10+5:30

मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस आपला कधी काळी नेता होता आणि त्यांच्यामुळंच आपल्याला भारतावर राज्य करता आलं.

The 'Clean India' campaign is a distortion of Gandhian thought! | ‘स्वच्छ भारत’ मोहीम हे गांधी विचारांचं विकृतीकरणच!

‘स्वच्छ भारत’ मोहीम हे गांधी विचारांचं विकृतीकरणच!

Next

प्रकाश बाळ (ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभ लेखक)
मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस आपला कधी काळी नेता होता आणि त्यांच्यामुळंच आपल्याला भारतावर राज्य करता आलं. हे गेल्या चार दशकांच्या काळात काँग्रेस विसरूनच गेली आहे. गांधी जयंती व पुण्यतिथी या दोन दिवशी निव्वळ प्रतिकात्मकतेच्या स्वरूपात काँग्रेसला या महात्म्याची आठवण होत असते.
उलट स्वत:ला हिंदुत्ववादी विचारांचा पाईक मानणाºया नथुराम गोडसे यानं महात्माजींचा खून केला. त्यानंतर भारत हे ‘हिंदू राष्टÑ’ बनवणं, हा विडा ज्या संघटनेनं उचलला आहे, त्या राष्टÑीय स्वयंसेवक संघाची राजकीय आघाडी असलेला भाजपा गांधीजींच्या खुनानंतर सहा दशकांनी स्वबळावर सत्तेवर आला आहे. गांधीजींचा खून केला तरी त्यांचे विचार संपवता येत नाहीत. सर्वसामान्य भारतीयांच्या मनातही आणि जगभरातही. ‘हा गांधींचा भारत आहे’, असंच जग मानतं. म्हणूनच जपानचे पंतप्रधान शिंझो अ‍ॅबे यांना साबरमतीलाच घेऊन जाणं मोदी यांना भाग पडतं आणि चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग यांनाही तेथेच मोदी यांना न्यावं लागतं. दीनदयाल उपाध्याय किंवा गोळवलकर वा हेडगेवार यांच्याशी संबंधित स्थानी कोणत्याही नेत्याला मोदी यांना नेता आलेलं नाही.
गांधीजींचा खून केल्यावरही त्यांचा विचार संपवता येत नाही, हे हिंदुत्ववाद्यांना लक्षात आल्यावर, गांधीजींना चौथºयावर बसवून त्यांच्या विचारातील क्रांतिकारकता मारून टाकण्याचा आणि त्याचवेळी आम्हीही महात्माजींना मानतो, असं चित्र जनतेपुढं उभं करण्याचे हे डावपेच होते. आता सत्ता हाती आल्यावर गेल्या तीन वर्षात ‘स्वच्छ भारत’च्या मोहिमेसाठी गांधीजींना जुंपण्यात आलं आहे. ‘भारत स्वच्छ करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊ या’ असं आवाहन गांधीजीचं नाव घेऊन पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. असं भासवलं जात आहे की, जणू काही भारत स्वच्छ करणं, हेच महात्माजींचं एकमेव स्वप्न होतं, ते काँग्रेसनं वाºयावर सोडून दिलं आणि आता आम्ही ते पुरं करण्यासाठी झटत आहोत.
गांधीजींच्या समाधीपुढं नतमस्तक होण्याचं नाटक पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात. पण ‘हिंदुत्ववादी विचार मानणाºया नथुरामनं गांधीजींचा खून केला, याची मला शरम वाटते; कारण आम्ही जे हिंदुत्व मानतो, त्यात हे बसत नाही’, असं जाहीररीत्या कबूल करण्याची मोदींची किंवा संघ व भाजपातील कुणाचीच तयारी नाही.
काँग्रेसनं आणि कम्युनिस्ट वगळता (कारण ते गांधीजींना मानतच नाहीत) इतर बिगर हिंदुत्ववादी विचारांच्या पक्ष व संघटना यांनी महात्माजींना निव्वळ प्रतिकाच्या पातळीवरच ठेवून त्यांच्या विचारातील क्रांतिकारकता वाºयावर सोडून दिली. आता संघ, मोदी व भाजपा गांधीजींच्या या विचारांचं विकृतीकरण करून तो पूर्णत: निष्प्रभ करण्याच्या प्रयत्नात आहेत.
परवाच्या २ आॅक्टोबरला ‘स्वच्छ भारत’चा जो ‘इव्हेंट’ सरकारी स्तरावर व प्रसार माध्यमात विशेषत: वृत्तवाहिन्यातून साजरा केला गेला, त्याचं उद्दिष्टं हेच होतं. प्रसार माध्यमं ‘मॅनेज’ करण्यात मोदी सरकारचा किती हातखंडा आहे, हे या निमित्तानं पुन्हा एकदा दिसून आलं.वस्तुत: गांधीजींच्या ‘स्वच्छते’च्या आग्रहामागं खरं कारण होतं, ते जातिव्यवस्थेच्या विरोधात उभं राहण्याचं. किमान चार-साडेचार दशकांपूर्वी एका बैठकीत बोलताना समाजवादी चळवळीतील एक ज्येष्ठ नेते, आमदार राहिलेले दत्ता ताम्हाणे यांनी एक आठवण सांगितली होती. ते असं म्हणाले होते की, मी जेव्हा पहिल्यांदा सेवाग्राम आश्रमात गेलो, तेव्हा दुसºया दिवशी सकाळी महात्मा गांधी, कस्तुरबा यांच्या जोडीनं इतर सर्व आश्रमवासीयांसमवेत मलाही मैला डोक्यावरून वाहण्याचं काम करावं लागलं. मैला भरलेलं टोपलं डोक्यावर घेऊन, त्यातून गळणारं पाणी अंगावर पडलेलं सहन करीत मी पहिल्या दिवशी जेव्हा हे काम उरकलं, तेव्हा दलितांना काय भोगावं लागत असेल, याची जी कल्पना आली, ती पुढं आजतागायत विसरलेलो नाही. कम्युनिस्ट चळवळीत ‘डिक्लास होणं’ अशी एक संकल्पना असते. महात्माजींचा ‘स्वच्छते’चा आग्रह हा समाज ‘डिकास्ट’ करण्यासाठी होता. टीव्ही कॅमेºयासमोर उभं राहून हातात लांब झाडू घेऊन नुसता कचरा लाटत रस्त्यावरून फिरणं आणि ‘स्वच्छते’चा ‘इव्हेंट’ साजरा करणं, हा गांधीजींचा उद्देश कधीच नव्हता. तसा तो आज उरला आहे. म्हणून तर गरबा बघायला आला, यासाठी एका दलिताला ठेचून मारलं जातं आणि देशातील महानगरातील गटारं साफ करताना दरवर्षी १०० च्या वर दलित कामगार बळी पडतात.
एकदा डॉ. आंबेडकर यांच्याशी ‘पुणे करार’ केल्यावर गांधीजींनी पुढील काळात सतत ‘अस्पृश्यता निवारणा’ची भूमिका घेतलेली आढळते. अर्थात मुळात हेतूच गांधी विचारांचं विकृतीकरण हा असल्यानं महात्माजींचे खरे विचार जनतेपुढं येणं, हिंदुत्ववाद्यांना परवडणारंही नाही. गांधी विचारात जी सत्य व प्रामाणिकता यांची ‘दाहकता’ आहे, त्यापुढं हिंदुत्ववादी विचार टिकणार नाही, हे संघ जाणतो. म्हणूनच ही तिकडमबाजी केली जात आहे आणि झाडू घेतलेल्या गांधींचं स्वप्न रस्त्यावरील घाण स्वच्छ करण्याचंच होतं, हे जनमनावर ठसवलं जात आहे.

Web Title: The 'Clean India' campaign is a distortion of Gandhian thought!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.