चोखा डोंगा परि ‘भाव’ नाही डोंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 03:24 AM2018-01-18T03:24:17+5:302018-01-18T03:24:37+5:30

संत चोखामेळा यांच्या जयंतीदिनी शासनाने राज्यस्तरीय पुरस्काराची, तसेच मेहुणाराजा या जन्मस्थळाच्या विकासासाठी पाच कोटींच्या निधीची घोषणा केली.

Chokha Donga par 'bhav' no donga | चोखा डोंगा परि ‘भाव’ नाही डोंगा

चोखा डोंगा परि ‘भाव’ नाही डोंगा

googlenewsNext

संत चोखामेळा यांच्या जयंतीदिनी शासनाने राज्यस्तरीय पुरस्काराची, तसेच मेहुणाराजा या जन्मस्थळाच्या विकासासाठी पाच कोटींच्या निधीची घोषणा केली. दरवर्षी अशा अनेक लहान-मोठ्या घोषणा होतात; मात्र पुढे काहीच होत नाही. चोखोबांच्या जन्मस्थळ विकासाच्या घोषणेचाही प्रवास त्याच मार्गावर होऊ नये, ही अपेक्षा.

महाराष्टÑाच्या समृद्ध अशा संत परंपरेतील एक रत्न म्हणजे संत चोखामेळा! इतर संतांच्या लौकिकांच्या पालख्या उचलण्यासाठी अनेकांची भाऊगर्दी उसळते. तसे भाग्य संत चोखोबांच्या नशिबी नाही. गावकुसाबाहेरील वस्तीत वाढलेला हा संत त्यांच्या हयातीत दुर्लक्षित राहिला; पण त्यांच्या अलौकिक प्रतिभेतून निर्माण झालेली साहित्यसंपदा वारकरी पंथामध्ये शिरोमान्य झाली. चोखोबांच्या अभंगाशिवाय वारीतील एकही भजन, कीर्तन, प्रवचन पूर्ण होत नाही. संपूर्ण कुटुंबच संत पदाला पोहोचलेले अन् अभंग रचना करणारे, असे एकमेव उदाहरण संत चोखोबांच्या रूपाने पाहावयास मिळते.
अशा या संताचा जन्म बुलडाणा जिल्ह्यातील मेहुणाराजा येथे झाला. त्यांच्या जन्मस्थळाविषयी अनेक वाद असले तरी, त्यांच्या अभंग रचनेत वारंवार येणारा ‘मेहुणपुरी’ हा शब्द बुलडाण्यातील मेहुणाराजाशी असलेला संबंध अधोरेखित करतो.
राज्य शासनाने या संताच्या नावाने त्यांच्या जयंतीला पुरस्कार देण्याची घोषणा १४ जानेवारी रोजी केली अन् चोखोबांची शासकीय स्तरावर दखल घेण्याचे एक वर्तुळ पूर्ण झाले. उशिरा का होईना, शासनाने संत चोखोबांच्या नावाने सुरू केलेल्या पुरस्काराबद्दल सत्ताधाºयांचे अभिनंदन; पण या पुरस्कारामागील ‘भाव नाही डोंगा’ असेच चित्र चोखोबांच्या जन्मभूमीचे दर्शन घेतल्यावर जाणवते. केवळ पुरस्काराची घोषणा करून चोखोबांच्या जन्मभूमीला व कार्याला न्याय देता येणार नाही.
बुलडाणा जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष व विद्यमान आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी २९ वर्षांपूर्वी, संत चोखोबांंचा जयंती उत्सव जिल्हा परिषदेच्या मार्फत सुरू करण्याची परंपरा सुरू केली होती. ती आजतागायत कायम आहे. दरवर्षी १४ जानेवारीला सूर्योदयी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते पूजा, गावातून पालखीची परिक्रमा, काही सांस्कृतिक कार्यक्रम अन् नंतर चोखोबांच्या जन्मस्थळाचा विकास करण्याची शासकीय घोषणा पार पडून हा सोपस्कार संपतो. या वर्षीही असेच स्वरूप होते. फक्त सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी येथील विकासासाठी पाच कोटी देण्यासोबतच पुरस्काराची केलेली घोषणा, एवढीच काय ती नव्याने भर! चोखोबांच्या प्रत्येक जयंतीदिनी अशा घोषणा होतात. त्या प्रत्यक्षात मात्र उतरत नाहीत.
सभामंडप, उघड्यावर औदुंबराच्या झाडाखाली विसावलेल्या मूर्तीला मेघडंबरी, चोखोबांच्या नावाचा गजर पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या समग्र साहित्याचे एक दालन, चोखोबा व समकालीन संतांची माहिती देणारी अभ्यासिका अशा स्वरूपात चोखोबांच्या कार्याचा गौरव होणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र अजूनही या स्थळाला तीर्थक्षेत्र व पर्यटनाच्या दर्जासाठी झगडावे लागते.
मेहुणाराजापासून हाकेच्या अंतरावर सिंदखेड राजा आहे. राष्टÑमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी शासनाने ३११ कोटींची घोषणा केली. प्रत्यक्षात १११.६८ कोटींचा आराखडा तयार झाला अन् पहिल्या टप्प्यातील २५ कोटीही तांत्रिक मान्यतेत अडकले आहेत. काम सुरू होणे तर दूरच! या पृष्ठभूमीवर चोखोबांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी केलेली घोषणा केवळ घोषणाच राहू नये. चोखोबांच्याप्रती शासनाचा भाव ‘डोंगा’ असावा; अन्यथा ‘चोखा डोंगा, परि भाव नाही डोंगा’, हे चोखोबांचेच विधान प्रत्यक्षात येईल.

     
 - राजेश शेगोकार

rajshegaokar@gmail.com

Web Title: Chokha Donga par 'bhav' no donga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.