‘ती’चा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 02:31 AM2017-08-24T02:31:33+5:302017-08-24T02:31:38+5:30

पुणे चळवळींचे उगमस्थान मानले जाते. एखाद्या परंपरेची मुहूर्तमेढ येथे रोवली गेली की ती जगभरात लौकिक पावते. लोकमतच्या ‘ती’चा गणपतीद्वारे उभारली जात असलेली लोकचळवळ म्हणूनच महत्त्वाची आहे.

Cheers of 'Te' | ‘ती’चा जयघोष

‘ती’चा जयघोष

Next

- विजय बाविस्कर

पुणे चळवळींचे उगमस्थान मानले जाते. एखाद्या परंपरेची मुहूर्तमेढ येथे रोवली गेली की ती जगभरात लौकिक पावते. लोकमतच्या ‘ती’चा गणपतीद्वारे उभारली जात असलेली लोकचळवळ म्हणूनच महत्त्वाची आहे.

स्त्री सक्षमीकरण ही केवळ गप्पांचे फड रंगवताना, चर्चा घडवताना किंवा व्यासपीठ गाजवताना बोलून दाखवण्याची गोष्ट नाही. तर त्याला जेव्हा जीवनात कृतिशील आधार मिळेल तेव्हाच समानतेची वाट सुकर होणार आहे. आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये ‘ती’ सर्वत्र आहे; पण तिचे स्थान कायम दुय्यम राहिले अथवा ती दुर्लक्षित राहिली. रूढी-परंपरामध्ये अग्रणी राहिला तो पुरुषच. स्त्री-पुरुष समानतेच्या मूल्यांची चर्चा करायची; मात्र जगताना त्यात विसंगती ठेवायची हे योग्य नाही. हे लक्षात घेऊन स्त्री सक्षमीकरणाला प्रत्यक्ष कृतीची जोड देण्याचा निर्धार ‘लोकमत’ने केला. पुरोगामित्वाच्या वाटेवर चालताना सलग पाचव्या वर्षी ‘लोकमत’ने ‘ती’चा गणपती उत्सव दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यासाठी कंबर कसली आहे. यंदा संपूर्ण गणेशोत्सवात तिचे स्थान बरोबरीच्या नात्याने उजळून काढण्यासाठी आर‘ती’चा तास या अभिनव कल्पनेंतर्गत लोकमत सर्वांसमोर आले आहे. ‘ती’चे महत्त्व अधोरेखित करताना समानतेचा धागा अधिक घट्ट करण्याचा हा प्रयास आहे. स्त्री सक्षमीकरणासाठी समाज जागर करून त्याला लोकचळवळीचे स्वरूप यावे, असा ‘लोकमत’चा प्रयत्न आहे. यामागील दृष्टिकोन विधायक आणि सकारात्मक आहे.
आपल्या संस्कृतीची नाळ ही आपल्या सण उत्सवात आहे. आपल्या विविध उत्सवांमधील सर्वांत चैतन्याने भरलेला उत्सव म्हणजे गणेशोत्सव. मांगल्य, भाविकता व पारंपरिकता यांचा सुरेख मिलाफ या उत्सवात दिसून येतो. श्रीगणेशाप्रमाणेच आपल्या संस्कृतीत महत्त्व आहे आदिशक्तीला. आदिशक्तीचा एक अवतार असणाºया पार्वतीदेवीचा पुत्र असलेल्या श्रीगणेशाचा उत्सव म्हणून त्याला एक वेगळा अर्थ आहे. उत्सवाला कृतीची जोड देऊन एका विधायक पाऊलवाटेवरून वाटचाल सुरू करून तिचा हमरस्ता व्हावा, असे स्वप्न ‘लोकमत’ने पाहिले. त्यामुळे पुरोगामित्वाची कास धरतानाही त्या संस्कृतीशी असणारे बंध लक्षात घेऊन ‘ती’चे स्थान अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. गणेशोत्सवात स्त्रीशक्तीचा विधायक जागर व्हावा यासाठी पहिले पाऊल उचलले आणि स्त्रीशक्तीला गौरविण्यासाठी ‘ती’ चा गणपती या अभिनव उपक्रमाची सुरुवात पुण्यातून केली. हा उपक्रम सुरू करताना त्यामागे ‘लोकमत’ची एक निश्चित अशी वैचारिक भूमिका आहे. त्यामागे समतेचे तत्त्व आहे.
आजची ‘ती’ निडर, धाडसी, साहसी आहे. ‘ती’ मुक्त अन् सक्षम आहे. तिच्या शहरात तिला घाबरून राहण्याचे कारणच नाही. ‘ती’चं अवकाश सुरक्षित आहे हे जगाला दाखवून देण्यासाठी पुण्याच्या सहा भागांतून आज गुरुवारी २४ आॅगस्ट रोजी रात्री ११ ला रॅली काढण्यात येणार आहे तसेच २७ आॅगस्ट रोजी सायं. ७ ते ८ या वेळेत घरोघरी, तसेच सार्वजनिक गणेश मंडळांची आरती केवळ महिलांच्या हस्ते करण्यासाठी लोकजागृती केली जात आहे. हा उपक्रम म्हणजे स्त्री सक्षमीकरणाच्या चळवळीतील मैलाचा दगड ठरणार आहे.
‘लोकमत’ने नेहमीच महिलांमध्ये सकारात्मकता, त्यांचा आत्मविश्वास जागविणारे उपक्रम साकारलेले आहेत. ‘लोकमत सखी मंच’च्या माध्यमातून महिलांच्या अभिव्यक्तीला मुक्त व्यासपीठ देतानाच विचारांचा जागरही होईल, याची दक्षता घेतली आहे. लोकमत माध्यम समूहाचे चेअरमन विजय दर्डा व एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांची प्रेरणा, प्रोत्साहन व समर्थ पाठबळ यामुळे अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना अधिक ऊर्जा मिळत आहे.
‘ती’च्या गणपतीपासून प्रेरणा घेऊन पुण्यातील अनेक मंडळांनी महिलांना मागील वर्षी आरतीला निमंत्रित केले. पुणे चळवळींचे उगमस्थान मानले जाते. एखाद्या परंपरेची मुहूर्तमेढ येथे रोवली गेली की ती जगभरात लौकिक पावते, असे मानले जाते. गेल्या पाच वर्षांपासून पुण्यात सुरू झालेली ‘ती’च्या गणपतीची ही संकल्पना महाराष्ट्राच्या कानाकोपºयात पोहोचेल आणि पुरोगामित्वाची कास धरणारा हा उपक्रम समानतेचा मानबिंदू ठरेल, यात शंका नाही.

Web Title: Cheers of 'Te'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.