अतिवृष्टी किंवा अनावृष्टी यांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 05:05 AM2018-09-14T05:05:22+5:302018-09-14T05:06:55+5:30

सतत कोसळणारा पाऊस, त्सुनामी, डोंगरांचे उतार आणि उथळ नदीपात्रे ही पुराचे संकट ओढवणारी काही कारणे सांगता येतील.

Challenges of heavy rain | अतिवृष्टी किंवा अनावृष्टी यांचे आव्हान

अतिवृष्टी किंवा अनावृष्टी यांचे आव्हान

Next

- डॉ. एस.एस. मंठा

आपल्या देशात जून ते सप्टेंबर हे महिने अतिवृष्टी किंवा अनावृष्टी किंवा वादळवारे घेऊन येत असतात. त्यामुळे कधी पाणी पुलाखालून तर कधी पुलावरून वाहू लागते. अतिवृष्टी किंवा अनावृष्टी या दोन्ही गोष्टी चिंता उत्पन्न करीत असतात. यंदा नासाकडून जो पावसाचा अंदाज मिळाला तो उत्तरेकडचा आणि दक्षिणेकडचा असा दोन्ही ठिकाणचा होता. उत्तरेकडील अतिवृष्टी बंगालच्या उपसागरापर्यंत होती तर दक्षिणेकडील अतिवृष्टीने कर्नाटक आणि केरळला तडाखा दिला. त्यापैकी केरळमधील अतिवृष्टीने आठ लाख लोकांना बेघर केले तसेच ३५० लोकांचे प्राण घेतले. ‘होणारे ते घडत असे’ या भारतीय प्रवृत्तीने आपण अशा घटनांकडे दुर्लक्ष न करता वास्तविक त्या दुर्घटनांमध्येच त्याच्या सुटकेचे मार्ग दडलेले असतात. ते शोधण्याचे प्रयत्न मात्र करावे लागतात.
सतत कोसळणारा पाऊस, त्सुनामी, डोंगरांचे उतार आणि उथळ नदीपात्रे ही पुराचे संकट ओढवणारी काही कारणे सांगता येतील. पुरामुळे लोकांचा त्रास वाढतो हे तर खरेच आहे. पण कधी कधी पुरामुळे शेतजमिनीला आवश्यक असलेली पोषक द्रव्येही मिळतात, जी शेतीसाठी किफायतशीर ठरतात. पुरामुळे जो गाळ वाहून आणला जातो त्यामुळे शेतजमीन सुपीक होऊन कृषी उत्पादनात वाढदेखील होऊ शकते.
अनेक भागातील नद्यांना नियमित पूर येतो. जसे ब्रह्मपुत्रा, गंगा, मध्य भारतातील नद्या आणि दख्खनच्या पठारातील नद्या. या पुरांना तोंड देण्याची पद्धत स्थानपरत्वे भिन्न भिन्न असते. केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या माहितीप्रमाणे दरवर्षी पुरामुळे बाधित होणाऱ्या जमिनीचे प्रमाण हे ८००० दशलक्ष हेक्टर इतके असते. तर राष्ट्रीय पूर आयोगाच्या अहवालाप्रमाणे भारतातील पूरप्रवण क्षेत्र हे ४ कोटी हेक्टर्स इतके आहे.
पुरामुळे बाधित होणारी राज्ये पंजाब, प. बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, केरळ, आसाम, गुजरात आणि ओरिसा ही आहेत. गतवर्षी बिहारमध्ये पुरामुळे ५०० लोकांना प्राण गमवावे लागले. नदीतील पुराचे पाणी धोक्याची पातळी ओलांडत असतानाही पूरप्रवण भागातील लोक ती जागा सोडत नाहीत असे दिसून आले आहे.
२०१५ साली झालेल्या मुसळधार पावसामुळे दक्षिणेकडील राज्यांना रु.२०,००० कोटी इतके नुकसान सोसावे लागले होते. तर २०१६ च्या पुरामुळे आसामातील २९ खेडी प्रभावित झाली होती व ९००० लोकांना विस्थापित व्हावे लागले होते. चेन्नईत झालेल्या मुसळधार पावसाने सर्वांनाच आत्मचिंतन करायला लावले होते. तसेच पुराला तोंड देण्याच्या पद्धतीत बदल करण्याची गरज दाखवून दिली होती.
वृत्तपत्रीय माहितीनुसार दरवर्षी पुरामुळे तीन कोटी लोक प्रभावित होत असतात. २०१६ च्या दराच्या आधारे पुरामुळे होणारे नुकसान हे दरवर्षी ११००० कोटी इतके असते. तसे दरवर्षी किमान एक हजार लोकांना पुरामुळे प्राण गमवावे लागतात. तेलंगणाचे नवे राजधानीचे शहर अमरावती हे कृष्णा नदीच्या काठावर वसले जात आहे. या नदीला दरवर्षी किमान तीनदा पूर येतो. त्यामुळे नदीच्या काठावरील निवासस्थाने हा काळजीचा विषय ठरणार आहे. भावी पिढ्यांना पुरामुळे किती किंमत चुकती करावी लागणार आहे?
पुराला तोंड देण्यासाठी व्यवस्थापन आणि पूर नियंत्रण या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पुराचे पाणी नियंत्रित करण्यासाठी भिंती उभारणे आणि फ्लडगेटस् निर्माण करणे गरजेचे ठरेल. पूरप्रवण भागातील घरांचे वॉटरप्रूफिंग आवश्यक करावे लागेल. तसेच पुराच्या काळात लोकांना अन्यत्र हलवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्यक्रमही निश्चित करावे लागतींल. पुराची कल्पना देण्यासाठी फ्लड वॉर्निंग सिस्टीमही मजबूत करावी लागेल.
घरांची बांधकामे करताना पूर पातळीपेक्षा उंच जागी घर बांधण्याची परवानगी द्यावी लागेल. तसेच नदीतील गाळ काढून नदीतून पाणी झपाट्याने वाहून जाईल अशी व्यवस्था करावी लागेल. पूर पसरू नये यासाठी जागोजागी भिंती बांधून अडथळे निर्माण करावे लागतील. पुराचे पाणी साठवून ठेवण्यासाठी कृत्रिम तलाव निर्माण करणे, वनीकरण करणे इ. उपायही अमलात आणावे लागतील.
धरणांचे दरवाजे केव्हा उघडायचे याची पद्धतही विकसित करावी लागेल. नदीतील पाण्याचा प्रवाह अव्याहतपणे खळाळता राहील अशी व्यवस्था करणेही गरजेचे ठरेल. सध्या स्मार्ट शहरे निर्माण केली जात आहेत. तेथे पाण्याचा योग्य पुरवठा होणे आणि नियंत्रित मलनि:सारण व्यवस्था निर्माण करणे गरजेचे राहील. दरवर्षी पुरामुळे होणारे नुकसान टाळायलाच हवे!

(लेखक एआयसीटीईचे माजी चेअरमन आणि एनआयएएस बंगळुरूचे एडीजे. प्रोफेसर आहेत)

Web Title: Challenges of heavy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.