भाजपचा ईशान्य विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:52 AM2018-03-05T00:52:35+5:302018-03-05T00:52:35+5:30

उत्तर-पूर्वेकडील मेघालय, त्रिपुरा व नागालँड या तीन राज्यांपैकी त्रिपुरा व नागालँडमधील विधानसभेत बहुमत मिळवून भारतीय जनता पक्षाने आपल्या विजयाची मुहूर्तमेढ त्या प्रदेशात मजबूत बनविली आहे. नागालँड हे राज्य दीर्घकाळ काँग्रेसच्या ताब्यात राहिल्यानंतर मधली बरीच वर्षे तेथे प्रादेशिक पक्षांची सरकारे आली.

 BJP's northeast victory | भाजपचा ईशान्य विजय

भाजपचा ईशान्य विजय

Next

उत्तर-पूर्वेकडील मेघालय, त्रिपुरा व नागालँड या तीन राज्यांपैकी त्रिपुरा व नागालँडमधील विधानसभेत बहुमत मिळवून भारतीय जनता पक्षाने आपल्या विजयाची मुहूर्तमेढ त्या प्रदेशात मजबूत बनविली आहे. नागालँड हे राज्य दीर्घकाळ काँग्रेसच्या ताब्यात राहिल्यानंतर मधली बरीच वर्षे तेथे प्रादेशिक पक्षांची सरकारे आली. हे प्रादेशिक पक्ष प्रामुख्याने जमातींच्या आधारावर उभे राहिले होते. त्यांचा पराभव होणे व तेथे पुन: एकवार एका राष्ट्रीय पक्षाचे सरकार सत्तारूढ होणे ही एकात्म राष्ट्राच्या दिशेने महत्त्वाची व स्वागतार्ह ठरणारी बाब आहे. नागालँड हे तसेही कमालीचे अस्वस्थ व अशांत राज्य राहिले आहे. जमातींचे प्रमुख व राज्याचे सरकार यांच्यातील तौलनिक बळाच्या भरवशावरच तेथील राजकारण आपली वाटचाल करीत आले आहे. भाजपच्या विजयामुळे तेथे पुढील पाच वर्षे स्थिर सरकार राहू शकले तर ती देशाच्या मजबुतीच्या दृष्टीनेही महत्त्वाची बाब ठरेल. भाजपचा त्रिपुरामधील विजय मात्र सर्वांना धक्का देणारा व चकित करणारा ठरला आहे. माणिक सरकार यांच्या नेतृत्वातील तेथील डाव्या कम्युनिस्ट पक्षाचे सरकार कमालीचे लोकाभिमुख व भ्रष्टाचारमुक्त राहिले आहे. माणिक सरकार हे देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री म्हणून ख्याती पावलेले व आपल्या निवासस्थानापासून कार्यालयापर्यंत पायीच चालत जाणारे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांचे सरकार जेवढे लोकप्रिय तेवढेच स्थिरही होते. प्रगतीच्या क्षेत्रातील त्यांची गती मात्र म्हणावी तेवढी मोठी नव्हती. देशातील सर्वाधिक साक्षर राज्यात नावाप्रमाणे त्रिपुरा हे आर्थिक आणि औद्योगिक विकासात काहीशा मंद गतीने चालले. शिवाय माणिक सरकारला दीर्घकाळ सत्तेत असल्याने येणारी ‘अ‍ॅन्टी इन्कम्बन्सी’ अनुभवावी लागली. भाजप हा तेथे नव्याने आलेला पक्ष आहे आणि त्याचा अनुभव घ्यावा असे तेथील जनतेला वाटणे स्वाभाविक समजावे असेही आहे. या राज्यातील पराभवाने प्रकाश करातांच्या एकारलेल्या राजकारणाचा बंगालपाठोपाठ दुसरा पराभवही केला आहे. लोकहित व लोकाभिमुख नेत्यांना मागे ठेवणे व पक्षाची सारी सूत्रे स्वत:च्या हाती राहतील या त्यांच्या व्यक्तिगत व महत्त्वाकांक्षी वृत्तीचाही तो पराभव आहे. आता त्या पक्षाची सत्ता केवळ केरळ या एकाच राज्यात राहिली आहे. भाजपाचा विजयाचा हा वारू मेघालयात मात्र काँग्रेसने अडविला आहे. त्या राज्यात काँग्रेस हा सर्वाधिक संख्येने निवडून आलेला पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. आसाम, अरुणाचल, नागालँड आणि त्रिपुरा या सभोवतीच्या सर्व राज्यांत भाजपचे झेंडे उंचावत असताना मेघालयाने काँग्रेसच्या नेतृत्वाला शिरोधार्ह मानले आहे. मेघालय हेही जमातींचेच राज्य आहे. ते सर्वाधिक साक्षर राज्यांपैकी एक असले व समृद्धतेतही अग्रेसर असले तरी त्यातली जनता जमातींमध्ये विभागली आहे. त्यातला जमातवाद मजबूतही आहे. काँग्रेस व संगमा यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव या जमातींवर राहिला आणि तेथील प्रमुख जमाती आपल्याशी जुळल्या असतील असेच राजकारण काँग्रेसने तेथे केले. काँग्रेसचे नेतृत्व सामर्थ्यवान असले तरी देशातील त्याची संघटना विस्कळीत व खिळखिळी झाली आहे. पक्षाचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांना पक्ष कार्यासाठी अजून फारसा वेळ मिळाला नाही. तरीही या पक्षाची स्थानिक यंत्रणा भाजपच्या मुसंडीला आवर घालण्यात कमी पडली, हे स्पष्टपणे सांगितलेच पाहिजे. आपली प्रतिमा राष्ट्रीय राखायची तर केवळ पंजाब, कर्नाटक वा दिल्लीनजीकचे प्रदेश ताब्यात ठेवून त्यास चालणार नाही. राजस्थान, गुजरात किंवा मध्य प्रदेशातील पोटनिवडणुका जिंकणेही त्यासाठी पुरेसे नाही. त्या पक्षाला आपली क्षमता, स्थानिक यंत्रणा बळकट करणे व स्थानिक नेतृत्वाला बळ देणेच आवश्यक ठरणारे आणि तारणारे आहे.

Web Title:  BJP's northeast victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.