भाजपाच्या घराचे वासे फिरू लागले!

By रवी टाले | Published: January 12, 2019 12:12 PM2019-01-12T12:12:49+5:302019-01-12T12:21:20+5:30

पाच वर्षांपूर्वी भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होण्यासाठी देशाच्या विविध भागांमध्ये अस्तित्व राखून असलेल्या अनेक छोट्या पक्षांची जणू रीघ लागली होती. आज चित्र पूर्णपणे पालटले आहे. रालोआतील घटक पक्ष एकामागोमाग एक भाजपाची साथ सोडून देत आहेत.

BJP's house started to smash! | भाजपाच्या घराचे वासे फिरू लागले!

भाजपाच्या घराचे वासे फिरू लागले!

googlenewsNext
ठळक मुद्देउत्तर प्रदेशातील काही पोटनिवडणुकांनी भाजपाचा अश्वही रोखता येऊ शकतो, अशी आशा विरोधकांना दाखविली. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालांनी त्यावर शिक्कामोर्तब केले.पाच वर्षांपूर्वी जशी रालोआत सहभागी होण्यासाठी लगबग सुरू झाली होती, तशीच लगबग आता रालोआ सोडण्यासाठी सुरू झाल्याचे दिसत आहे.

घर फिरलं, की घराचे वासे फिरायला वेळ लागत नाही! ही म्हण सध्या भारतीय जनता पक्षासंदर्भात अगदी चपलखपणे लागू पडते. बरोबर पाच वर्षांपूर्वी भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होण्यासाठी देशाच्या विविध भागांमध्ये अस्तित्व राखून असलेल्या अनेक छोट्या पक्षांची जणू रीघ लागली होती. आज चित्र पूर्णपणे पालटले आहे. रालोआतील घटक पक्ष एकामागोमाग एक भाजपाची साथ सोडून देत आहेत.
अवघ्या काही महिन्यांपूर्वी भाजपाचे वर्णन निवडणूक जिंकणारे यंत्र असे केले जात होते. पौराणिक काळात शक्तिशाली सम्राट अश्वमेध यज्ञ करीत असत. त्यासाठी सोडलेला घोडा एकामागोमाग एक नवनवी राज्ये पादाक्रांत करीत असे आणि त्या राज्यांच्या राजांना निमूटपणे अश्वमेध यज्ञाचा संकल्प सोडलेल्या सम्राटाचे मांडलिकत्व मान्य करावे लागायचे; अन्यथा युद्धात सर्वनाश ठरलेलाच असे! भाजपाचाही जणू काही २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून अश्वमेध यज्ञच सुरू होता. एकापाठोपाठ एक राज्य तो पक्ष जिंकत सुटला होता. अपवाद केवळ दिल्ली आणि बिहारचा; मात्र त्यानंतर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने एवढे देदीप्यमान यश संपादन केले, की आता भाजपाचा अश्व कुणीही रोखू शकणार नाही, असे भाजपा विरोधकांनाही वाटू लागले; मात्र त्याच उत्तर प्रदेशातील काही पोटनिवडणुकांनी भाजपाचा अश्वही रोखता येऊ शकतो, अशी आशा विरोधकांना दाखविली. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालांनी त्यावर शिक्कामोर्तब केले आणि पाच वर्षांपूर्वी जशी रालोआत सहभागी होण्यासाठी लगबग सुरू झाली होती, तशीच लगबग आता रालोआ सोडण्यासाठी सुरू झाल्याचे दिसत आहे.
सर्वप्रथम हिंदुस्तान अवामी मोर्चा-सेक्युलर पक्षाचे नेते जितनराम मांझी यांनी गत फेब्रुवारी महिन्यात भाजपाला रामराम केला. त्यानंतर एकाच महिन्यात तेलुगू देशम पक्षाने आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या आश्वासनाची पूर्तता न केल्याचा आरोप करीत, भाजपाची साथ सोडली. त्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये भाजपानेच पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीला सोडचिठ्ठी दिली. पुढे उपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोकसमता पक्षाने बाहेरची वाट धरली. कालपरवा आसाम गण संग्राम पक्षानेही त्यांचा कित्ता गिरविला. महाराष्ट्रात तब्बल २५ वर्षांपासून भाजपाचा विश्वासू साथीदार असलेल्या शिवसेनेनेही स्वबळाचा नारा दिला आहे. तिकडे उत्तर प्रदेशात मंत्री पद भुषवित असूनही सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे ओमप्रकाश राजभर दररोज भाजपावर ताशेरे ओढत असतात. अपना दलही जादा जागांसाठी भाजपा नेतृत्वावर दबाव वाढवित आहे. राजकारणातील वातकुक्कुट म्हणून प्रसिद्ध झालेल्या रामविलास पासवान यांनीही भाजपाला इशारे देणे सुरू केले होते. शेवटी स्वत:साठी राज्यसभेची जागा आणि लोकसभा निवडणुकीत हव्या तेवढ्या जागा पदरात पाडून घेतल्यावरच त्यांनी तलवार म्यान केली.
भाजपा नेतृत्व वरकरणी या घडामोडींना फार महत्त्व देत नसल्याचे भासवत आहे; पण ज्याप्रकारे महाराष्ट्रात शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढणे सुरू आहे आणि बिहारमध्ये पासवान यांच्यासमोर मान तुकविण्यात आली, ते बघू जाता भाजपा नेतृत्वालाही वस्तुस्थितीची जाणीव झाली असल्याचे स्पष्ट होते. हिंदुस्तान अवामी मोर्चा-सेक्युलर, राष्ट्रीय लोकसमता पक्ष, सुहेलदेव भारतीय समाज पक्ष यासारखे छोटे पक्ष मोदी लाटेवर स्वार होण्यासाठीच रालोआच्या आश्रयाला आले होते. आता मोदी लाट ओसरू लागल्याची जाणीव झाल्याने, ते रालोआच्या जहाजावरून उड्या घेऊ लागले आहेत. त्यांनी साथ सोडल्याने भाजपाला निवडणुकीत काही प्रमाणात नुकसान नक्कीच होणार आहे; पण भाजपासाठी खरा चिंतेचा विषय शिवसेनेचा स्वबळाचा नारा, नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने काही मुद्यांवर घेतलेली भाजपाविरोधी भूमिका, अण्णाद्रमुकसारख्या नेतृत्वविहीन झालेल्या पक्षानेही चार हात दूर राहण्याचा घेतलेला पवित्रा हे आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्वबळावर बहुमत मिळण्याची शक्यता धुसर दिसत आहे. स्वाभाविकच सरकार गठनामध्ये छोट्या पक्षांना अतोनात महत्त्व येणार आहे. अशा परिस्थितीत सोबत असलेल्या पक्षांनी लढाईस तोंड फुटण्यापूर्वीच पळ काढणे, हे कोणत्याही प्रमुख पक्षासाठी दुश्चिन्हच म्हणावे लागेल. भाजपा नेतृत्वाने काही प्रमाणात ही परिस्थिती स्वत:हून ओढवून घेतली आहे. एकट्या शिवसेनेने भाजपा नेतृत्वावर अहंकारी आणि उर्मट असल्याचा आरोप केला असता, तर महाराष्ट्रात दुय्यम भूमिकेत जावे लागल्याने झालेल्या संतापाचा तो परिपाक आहे, असे म्हणता आले असते; पण सोडून गेलेले आणि सोडून जाण्याच्या वाटेवर असलेले जवळपास सगळेच पक्ष तोच आरोप करीत असतील, तर भाजपा नेतृत्वाने अंतर्मुख होण्याची वेळ नक्कीच आली आहे. भाजपाच्या दुर्दैवाने आता त्या पक्षाच्या नेत्यांसाठी त्यासाठीही वेळ उरलेला नाही!

- रवी टाले                                                                                                    

 ravi.tale@lokmat.com

Web Title: BJP's house started to smash!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.