गोव्यातील भाजपा काँग्रेसचीच प्रतिकृती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 08:15 PM2018-10-17T20:15:35+5:302018-10-17T20:16:07+5:30

- राजू नायक सत्तेसाठी वाट्टेल ते असे गोवा भाजपाचे सध्याचे वर्तन आहे. ही टीका भाजपाचे केवळ विरोधक काँग्रेस व ...

The BJP in Goa has a replica of Congress | गोव्यातील भाजपा काँग्रेसचीच प्रतिकृती

गोव्यातील भाजपा काँग्रेसचीच प्रतिकृती

Next

- राजू नायक

सत्तेसाठी वाट्टेल ते असे गोवा भाजपाचे सध्याचे वर्तन आहे. ही टीका भाजपाचे केवळ विरोधक काँग्रेस व अन्य पक्षच नव्हे, तर निष्ठावंत भाजपमधूनही होत आहे. दोन्ही पक्षात काही फरकच उरलेला नाही, याविषयी ही मंडळी खंत व्यक्त करत आहेत. गोवा भाजपा म्हणजे काँग्रेसचीच प्रतिकृती, एकाच नाण्याच्या दोन बाजू असे बोलले जात आहे.
सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांना भाजपात प्रवेश दिल्यामुळे भाजपाच्या निष्ठावानांमध्ये असंतोष आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि ज्येष्ठ नेते राजेंद्र आर्लेकर यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. गोव्याचे एकेकाळचे संघाचे प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी तर भाजपा आणि कॉँग्रेसमध्ये कसलाही फरक राहिला नसल्याचे म्हटले आहे.
काँग्रेस पक्षाला खिंडार पाडल्याशिवाय भाजपापुढे दुसरा पर्याय नव्हता, यात तथ्य आहे. कारण मनोहर पर्रीकर यांचा आजार बळावला आहे. कॉँग्रेस पक्षाची सदस्य संख्या १६ असतानाही पर्रीकरांच्या नेतृत्वाखालील भाजपाने १४ सदस्यसंख्या असूनही इतर छोटे पक्ष व अपक्षांच्या साहाय्याने सत्ता काबीज केली होती; परंतु पर्रीकर गेले सात महिने आजारी असल्यामुळे प्रशासन कोलमडले व सरकारमधील घटक पक्षांमध्ये नाराजी वाढली. लोकांमध्ये मोठा असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने भाजपाला शह देऊन राज्यात सरकार स्थापनेचे प्रयत्न चालविले होते. या पक्षाने राहुल गांधींच्या आशीर्वादाने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला आपल्या बाजूला वळविण्याचे प्रयत्न चालविल्याचा सुगावा लागल्यानंतर भाजपाने काँग्रेसला काटशह दिला. परंतु तेवढेच एक कारण या राजकीय नाट्याला नाही.

भाजपा पक्षश्रेष्ठींना वाटते, की पर्रीकर आजारी असले तरी त्यांचे भाजपासाठीचे योगदान व त्याग पाहून त्यांच्याकडून राजीनामा घेतला जाऊ नये. पर्रीकर राजीनामा देण्यास तयार असतानाही पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांना सांगितले, तुम्हीच शेवटपर्यंत मुख्यमंत्री राहाल. परंतु या दरम्यान जर पर्रीकरांना काही झाले असते तर राज्यात राजकीय पेचप्रसंग उभा ठाकला असता. म्हणजे, राज्यपालांना सर्वांत मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी पाचारण करावे लागले असते. भाजपाचे मुख्यमंत्री वगळता आणखी दोन सदस्य इस्पितळात आहेत. त्यांना विधानसभेत आणण्यात अडचणी आहेत. भाजपाला विधिमंडळात शक्तिप्रदर्शन करण्यात अडथळेच आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे दोन सदस्य घेऊन या पक्षाची नांगीच तोडून टाकणे भाजपाला सोपे बनले.

परंतु, या राजकीय नाट्यामुळे स्वत:ला इतरांहून ‘वेगळा’ मानणाऱ्या भाजपाची शान पुरती गेली. गेले सात महिने सरकारचा चाललेला खेळखंडोबा, पर्रीकरांकडे असलेली २६ खाती व स्वत:ही प्रशासनाला रेटा देण्यात आलेले अपयश, मंत्र्यांमधील सुंदोपसुंदी व प्रशासनाचा तुटलेला ताळमेळ यांमुळे राज्यात असंतोष आहे. आधीच गोवा फॉरवर्ड व मगोपचे सरकारातील मंत्री भाजपाला जुमानत नसल्याबद्दल नाराजी होती. आता तर काँग्रेसमधून त्यांच्या दोघा नेत्यांना पक्षात आणताना पक्षात साधी चर्चाही झाली नाही, याचे त्यांना वैषम्य वाटते. या प्रवेशामुळे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे राजकीय भविष्य संपल्यात जमा आहे. त्यांच्या राजकीय विरोधकालाच पक्षात स्थान मिळाल्याने ते कमालीचे संतापले आहेत व त्यांनी पर्रीकर आणि प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्या विरोधात तोफ डागली. त्यांच्यामुळेच पक्षाला २०१७ मध्ये निवडणुकीत नामुष्की सहन करावी लागली होती, असे ते म्हणाले.

शिरोडा मतदारसंघातही माजी आमदार महादेव नाईक यांचे कट्टर विरोधक शिरोडकर यांना पक्षात प्रवेश मिळाल्याने तेही संतप्त बनले आहेत. केवळ आमदारांनाच नव्हे, तर पक्षाची ध्येयधोरणेही बासनात गुंडाळून ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे आता भाजपा व काँग्रेसमध्ये काडीचाही फरक राहिलेला नाही, अशी प्रतिक्रिया बंडखोर संघ नेते सुभाष वेलिंगकर यांनी व्यक्त केली आहे.

 

Web Title: The BJP in Goa has a replica of Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.