तिचे आकर्षणच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 05:06 AM2019-01-31T05:06:40+5:302019-01-31T05:09:19+5:30

राहुल गांधींमध्ये पूर्वी दिसणारा अननुभवी राजकारणी जाऊन त्यांच्यात एक प्रभावी व गंभीर नेता असल्याचे साऱ्यांच्या लक्षात आले होते. तरीही प्रियंकांचे येणे महत्त्वाचे झाले त्याला कारण ती केवळ एक राजकीय शक्ती नसून एक प्रदीर्घ राजकीय परंपरा आहे.

bjp feeling Restless after priyanka gandhi joins active politics ahead of lok sabha election 2019 | तिचे आकर्षणच

तिचे आकर्षणच

googlenewsNext

प्रियंका गांधींचे राजकारणात आज ना उद्या पदार्पण होणार हे सारेच जाणून होते, पण त्या देशाचे राजकारण एवढे ढवळून काढतील, असे कुणाला वाटले नव्हते. त्यांच्या येण्याचे जेवढे स्वागत काँग्रेसमध्ये झाले, त्याहून त्याचा मोठा गदारोळ भाजपा आणि त्यांच्या परिवारात झाला. काँग्रेसचे नेते गप्प होते. पण भाजपाचे पुढारी, प्रवक्ते आणि चाहते आक्रमक झाले आणि सोशल मीडियातील ट्रोल्सही त्यांच्याविरोधात कमालीची धूळवड करताना दिसले. ‘राहुल गांधी कमी पडतात, म्हणून प्रियंकांना आणले’ इथपासून ही ओरड सुरू झाली. वास्तव हे की प्रियंका येण्याआधीच राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षाने राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड ही तीन राज्ये जिंकली होती, त्या आधी लोकसभा, विधानसभेच्या सर्व पोटनिवडणुका जिंकल्या होत्या.

राहुल गांधींमध्ये पूर्वी दिसणारा अननुभवी राजकारणी जाऊन, त्यांच्यात एक प्रभावी आणि गंभीर नेता असल्याचे या काळात साऱ्यांच्या लक्षात आले. तरीही प्रियंकांचे येणे देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे झाले, त्याला अनेक कारणे आहेत. लोकांना त्यांच्यात इंदिरा गांधींची छबी दिसते. त्यांचे रूप आणि देहबोली दिसते. त्यांचा कणखर, पण देखणा चेहरा दिसतो. इंदिरा गांधींनी काँग्रेसमधील प्रतिगाम्यांची केलेली हकालपट्टी, पाकिस्तानचा निर्णायक पराभव करून त्याचे केलेले दोन तुकडे, शेजारी राष्ट्रांशी राखलेले मैत्रीचे संंबंध आणि खलिस्तानचे बंड मोडून देश एकात्म राखण्यासाठी केलेले बलिदान कुणालाही विसरता येणारे नाही.

सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर प्रियंकांचे राजकारणातील पदार्पणही साधे नाही. त्या आधी त्यांची जमेल तेवढी बदनामी करून झाली आहे. त्यांच्या पतीविरुद्ध चौकशांचे ससेमिरे लागले आहेत. त्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा बोलली जात आहे. या साऱ्या काळात त्या गप्प होत्या, पण त्यांच्याविषयीची लोकांची आत्मीयता कमी होताना कधी दिसली नाही. त्यांनी आजवर राजकारणात जे काही केले, त्याबद्दलचे आकर्षण कायम राहिले. नेमके हेच भाजपा आणि त्यांच्या परिवाराचे दु:ख होते. आता त्या आल्या आहेत. सभेत बोलण्याचा त्यांना सराव आहे. न डगमगता प्रश्नांची त्या उत्तरे देतात. मोदी, शहा आणि भाजपा यांच्यावर कठोर टीका करतात. चेहऱ्यावरचे हास्य मावळू न देता त्यांना जनतेशी संवाद साधता येतो. आजवरच्या काँग्रेसच्या पराभवाने त्यांना निराशा आलेली दिसत नाही. आपला करिश्मा मोठा आहे आणि त्यातून आपल्यावर टाकलेली जबाबदारी मोठी आहे, हे त्यांना कळते. त्याच वेळी उत्तर प्रदेशात त्यांच्यापुढे असलेले आव्हान मोठे आहे, याचीही त्यांना जाण आहे. त्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणेच अखिलेश यादव आणि मायावती यांच्या युतीलाही तोंड द्यायचे आहे. त्यांच्या तुलनेत प्रियंका यांचा राजकारणाचा अनुभव लहान आहे, तरीही हे पक्ष त्यांच्या पदार्पणाने गडबडले आहेत. भाजपाचे संबित पात्रा हे सध्या त्यांच्याखेरीज दुसऱ्या विषयावर बोलत नाहीत आणि सुब्रमण्यम स्वामी यांनाही त्यांचा विचार गंभीरपणे करावासा वाटू लागला आहे. संघ गप्प आहे, पण त्यांनाही तिच्या येण्याचा हादरा बसला आहे.

देशाच्या राजकारणाचे प्रतिबिंब उत्तर प्रदेशच्या राजकारणात पाहायला मिळते, असे मानले जाते. त्यामुळे तेथील जबाबदारी स्वीकारत प्रियंका यांचा राजकारणातील प्रवेश तेथील समीकरणे बदलण्यास कारणीभूत ठरेलच, पण त्याचे पडसाद राष्ट्रीय राजकारणावरही उमटतील. या साऱ्यांचे कारण प्रियंका ही शक्ती नसून परंपरा आहे. ती मोतीलाल नेहरूंपासून सुरू होते, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी अशी ही शंभर वर्षांची परंपरा तिच्यामुळे जागी होते. त्यातच त्यांच्या बाजूला राहुल गांधींचे विजयी नेतृत्व उभे आहे. ज्योतिरादित्य शिंदेचीही समर्थ साथ आहे आणि काँग्रेसने अलीकडेच मिळविलेले मोठे विजय आहेत. झालेच तर मोदींची पडलेली प्रतिमा, त्यांच्या पक्षाचे झालेले पराभव आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनांचे खोटेपणही याच काळात उघड झाले आहे. येत्या काळात त्यांचे पुरावेही देशाला मिळतील. अशा परिस्थितीत प्रियंकांवर शिंतोडे उडविणे एवढेच भाजपाला जमणारे आहे.

Web Title: bjp feeling Restless after priyanka gandhi joins active politics ahead of lok sabha election 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.