BJP: Akola Pattern of the controversy elsewhere | भाजपा : वादाचा अकोला पॅटर्न अन्यत्रही

अकोला जिल्ह्यातील भाजपांतर्गतचा वाद सध्या गाजत आहे. अशा वादाची अन्य जिल्ह्यांमध्येही लागण झाली असल्याचे दिसून येत असून, ती आटोक्यात आणण्याचे जोरकस प्रयत्न राज्य पातळीवरून होताना दिसत नाहीत. ते करण्यासाठी प्रदेशाध्यक्षांइतकीच महत्त्वाची भूमिका ही प्रदेश संघटन मंत्र्यांची असते; पण रवी भुसारी या पदावरून गेल्यापासून ते पदच भरलेले नाही. संघाला त्यासाठी वेळ मिळालेला दिसत नाही. पक्षांतर्गत वादाचा भाजपाला पुढे फटका बसू शकतो.
सोलापूरमध्ये सहकार मंत्री सुभाष देशमुख विरुद्ध राज्यमंत्री विजय देशमुख यांच्या समर्थकांमध्ये भाजपाची विभागणी झाली आहे. दोघे एकमेकांवर पक्षांतर्गत कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अहमदनगरमध्ये खासदार दिलीप गांधी आणि अभय आगरकर यांच्या गटात वादाची ठिणगी सतत पडत असते. त्यापासून पालकमंत्री राम शिंदे स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. राष्ट्रवादीतून आलेले आमदार शिवाजी कर्डिले आणि आमदार स्नेहलता कोल्हे स्वत:चे सुभे सांभाळतात. नाशिक शहरात अध्यक्ष आ. बाळासाहेब सानप, आ. सीमा हिरे आणि देवयानी फरांदे यांच्यात वर्चस्वाची लढाई असते. महापौर, उपमहापौरही भाजपाचे आहेत, पण त्यांचे आपसात जमत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी समज देऊनही सामोपचाराचे वातावरण तयार होऊ शकलेले नाही. धुळ्यात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे विरुद्ध आमदार अनिल गोटे यांच्यात सतत कलगीतुरा सुरू असतो. एकमेकांना शह-काटशह देण्याची संधी दोघेही सोडत नाहीत. त्यातून कार्यकर्ते विभागले गेले आहेत. जळगाव जिल्ह्यात माजी मंत्री एकनाथ खडसे विरुद्ध जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची वेगवेगळी सुभेदारी सर्वज्ञात आहेच.
अमरावतीमध्ये पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील आणि स्थानिक आमदार डॉ. सुनील देशमुख असे पक्षांतर्गत राजकारण चालते आणि त्यातून पक्ष विभागला गेला आहे. याशिवाय आ. डॉ. सुनील बोंडे, जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, स्थायी समितीचे अध्यक्ष तुषार भारतीय यांच्या वेगळ्या चुली आहेतच. विदर्भात अन्यत्रही थोडीफार धुसफूस आहे; पण वाद चव्हाट्यावर न येण्याचे मुख्य कारण म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार हे तीन तीन हेडमास्तर तिथे असल्याने सगळे हाताची घडी, तोंडावर बोट ठेवून बसतात.
पुण्यात पालकमंत्री गिरीश बापट विरुद्ध खा. संजय काकडे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. दोघांमध्ये श्रेयवादाची लढाई कायम जुंपलेली असते. बापटांचा मुंबईतील सरकारी बंगला मुख्यमंत्र्यांच्या शेजारी आहे, पण मुख्यमंत्र्यांना काकडेच जवळचे असल्याचे काकडे समर्थक सांगतात. कोल्हापुरात भाजपा संस्कृतीवर महाडिक गट कधी कधी भारी पडताना दिसतो. मात्र, पक्षावर एकहाती वर्चस्व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचेच आहे. मराठवाड्यातील भाजपाच्या दोन प्रमुख तरुण नेत्यांमध्ये (ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर) समन्वय साधला गेला तर त्याचा फायदा पक्ष अन् मराठवाड्यालाही होईल. सध्या पक्षाच्या यशाची कमान सर्वत्र चढती असल्याने, सगळे वाद जाणवत नसले तरी ते भविष्यात डोके वर काढू शकतात. त्यातच बाहेरून भाजपात आलेल्या अनेकांना अजूनही सुखकर वाटत नाही. जुन्या घराची आठवण अधूनमधून होत राहते. त्यातून दोन-चार आशिष देशमुख तयार झाले तर आश्चर्य वाटायला नको.
- यदु जोशी


Web Title:  BJP: Akola Pattern of the controversy elsewhere
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.