Avoid encroachments on forests | वनांवरील अतिक्रमण टाळा

अलीकडेच मुलुंड येथे बिबट्याच्या हल्ल्यात सातहून अधिक मुंबईकर जखमी झाले असतानाच मंगळवारी सादर करण्यात आलेल्या अहवालात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची संख्या ४१ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. बिबट्यांचा आकडा वाढणे हे उत्तम दर्जाच्या जंगलाचे लक्षण आहे. मात्र आता बिबटे मानववस्तीत शिरणार नाहीत, याची खबरदारी अधिक प्रकर्षाने घ्यावी लागणार आहे. २०१५मध्ये कॅमेरा ट्रॅपिंग परीक्षणात ३५ बिबटे आढळले होते. आता ताज्या सर्वेक्षणात ही संख्या ४१ एवढी झाली आहे. आरे मिल्क कॉलनी, आयआयटी-पवई, घोडबंदर गाव, नागला ब्लॉक या परिसरात ही मोजणी झाली. जवळपास १४० किलोमीटर क्षेत्रात हा अभ्यास करण्यात आला. २०१५मधील डेटाबेसच्या तुलनेत २०१७ साली बिबट्यांची संख्या वाढल्याचे दिसते. त्यामुळे आता हल्ले वाढणार नाहीत, यासाठी प्रशासनाने काळजी आणि खबरदारी घेणे गरजेचे आहे. उद्यानाच्या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करणे हे मोठे आव्हान आहे. तर लोकांमध्ये जागृती करणे हे दुसरे आव्हान. मुळात बिबट्या मनुष्यवस्तीत शिरतो, असे म्हणणे चुकीचे आहे. उद्यानालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. त्यामुळे बिबट्याने आपल्या घरात नाही; तर आपण त्याच्या घरात शिरकाव केला आहे. दुसरे असे की बिबट्या कधीच माणसावर हल्ला करीत नाही. बिबट्या हल्ला करतो तो त्याच्या समांतर उंची असलेल्या भक्षावर. यासाठी उद्यानालगत उघड्यावर शौचास बसणे बंद करावे लागेल. म्हणजेच सरकारला पुरेशी शौचालये बांधावी लागतील. आरे कॉलनीत शौचालयांचा अभाव आहे. एकंदर महापालिका आणि उद्यान प्रशासनाला यासाठी एकत्र काम करावे लागेल. बिबट्याला जेरबंद करण्याची वेळ आल्यास पुरेसे साहित्य वनविभागाकडे नाही. एक किंवा दोन पिंजरे असले म्हणजे झाले, ही भूमिका बदलावी लागेल. हल्ले होण्याचे प्रमाण अधिक आहे; तेथे कायमस्वरूपी पिंजरे लावण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांत हल्ले कमी झाल्याचा दावा उद्यान प्रशासनाने केला आहे. बिबटे मानवी वस्तीत शिकारीसाठी शिरतात हे सत्य आहे. जंगलेच राहिली नाही, तर त्यांनी जावे कुठे? अशाच प्रकारे मोर, हरणेदेखील मानवी वस्तीत पाण्यासाठी येतात. वाढत्या लोकवस्तीमुळे वन क्षेत्रावर होणारे अतिक्रमण हे मानव आणि प्राणी संघर्षाचे मुख्य कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. निसर्गाचा बदलणारा असमतोल सावरायचा झाल्यास त्यात वन्य प्राण्यांची भूमिका मोठी आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांना जपण्याचे काम मनुष्याला अग्र्रक्रमाने करावे लागणार आहे. यात साथ लागेल ती सगळ्यांचीच!


Web Title: Avoid encroachments on forests
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.