Atal Bihari Vajpayee : एका युगाचा अंत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 03:35 AM2018-08-17T03:35:46+5:302018-08-17T03:35:55+5:30

अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे एका युगाचा अंत झाला आहे. त्यांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत भारतीय राजकारणाची गुणवत्ता वाढवली. सरकार चालविण्याची जी प्रक्रिया आहे तिला उद्देशपूर्ण केले. त्यांनी भारतीय राजकारणात काँग्रेसला पर्यायच उत्पन्न होणार नाही, या समजाला आपल्या कर्तृत्वातून धक्के दिले.

Atal Bihari Vajpayee: The end of a era | Atal Bihari Vajpayee : एका युगाचा अंत

Atal Bihari Vajpayee : एका युगाचा अंत

Next

- विनय सहस्रबुद्धे
भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष

अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे एका युगाचा अंत झाला आहे. त्यांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत भारतीय राजकारणाची गुणवत्ता वाढवली. सरकार चालविण्याची जी प्रक्रिया आहे तिला उद्देशपूर्ण केले. त्यांनी भारतीय राजकारणात काँग्रेसला पर्यायच उत्पन्न होणार नाही, या समजाला आपल्या कर्तृत्वातून धक्के दिले आणि देशाच्या राजकारणाच्या इतिहासात प्रथमच एका काँग्रेसेतर पक्षाचे सरकार पूर्णवेळ चालवून दाखविले. त्याचबरोबर राजकारणामध्ये विचारधारेवर आधारीत संघटना बांधणी करता येते, हे त्यांनी आपल्या परिश्रमातून सिद्ध केले.
विचारधारेच्या संदर्भात देशामध्ये भांडवलदारी की साम्यवाद, अशी वैचारिक फाळणी झाली असताना, त्यांनी दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेल्या मिश्र अर्थव्यवस्थेची कास धरली आणि भाजपाच्या रूपाने एक नवा सामाजिक आर्थिक न्यायाचा विचार मांडला. भाजपाच्या स्थापनेपासून ते पक्षात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत असत. सुरुवातीला पक्षाचे अध्यक्ष, त्यानंतर विरोधी पक्षनेते आणि शेवटी पंतप्रधान अशा चढत्याक्रमाने त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा परिचय करून दिला. अटलजींनीच आघाडीच्या राजकारणात एक नवीन इतिहास निर्माण केला. आघाडीचा धर्म या शब्दाचे जनक अटलजीच. २५-२५ पक्षांना घेऊन स्थिर सरकार देण्याची कामगिरी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. आणीबाणीच्या काळात लोकशाही वाचविण्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले, संघर्ष केला आणि तुरुंगवासही भोगला. हे सर्व करत असताना राजकारणात वैचारिक मतभेद असले तरी सदैव विरोधाची भूमिका घेऊ नये, अशी निकोप प्रथा-पद्धती निर्माण केली. १९७१ च्या बांग्लादेश युद्धानंतर त्यांनी श्रीमती इंदिरा गांधींविषयी गौरवोद््गार काढले होते. पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, नरसिंह राव, चंद्रशेखर इत्यादी अनेकांशी त्यांचे आदरपूर्ण मैत्रीचे संबंध होते. साम्यवादी राजकारण्यांमध्येही त्यांच्याविषयी आदराची भावना होती. सरकारमध्ये आल्यानंतर सुरुवातीला परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून त्यांनी अलिप्ततावादाच्या अतिरेकी प्रभावामुळे एकारलेल्या परराष्ट्र नीतीला अधिक भक्कम पाया मिळवून दिला. अलिप्ततावादाची प्रासंगिकता उरलेली नाही, हे लक्षात घेऊन अलिप्ततावादाला सोडचिठ्ठी न देता त्याला कालसुसंगत नव्या नीतीची जोड देणारे ते पहिले परराष्ट्रमंत्री होते. त्यांनी त्यांच्या अल्प कारकिर्दीत भारतीय- इस्रायल संबंधाची मुहूर्तमेढ रोवली. एकप्रकारे भारतीय परराष्ट्र नीतीला व्होट बँक राजकारणाच्या दबावातून मुक्त करण्याचे काम अटलजींनीच केले. पंतप्रधान म्हणून त्यांनी अनेक वैशिष्ट्यपूर्ण कामे केली. सर्व शिक्षा अभियान, पंतप्रधान ग्रामसडक योजना, सुवर्ण चतुष्कोन, तीन नव्या राज्यांची निर्मिती आणि लोकतांत्रिक सुधारणांसाठी ठोस प्रयत्न हे अटलजींच्या योगदानाचे महत्त्वपूर्ण पैलू आहेत.
त्यांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवली नसती तर झारखंड, छत्तीसगड आणि उत्तराखंड ही तीन राज्ये भारताच्या नकाशावर अस्तित्वात आली नसती. शिवाय ईशान्य भारताच्या उपेक्षेवर उतारा म्हणून वेगळ्या आणि स्वतंत्र अशा डोनर मंत्रालयाची स्थापना करून त्यांनी ईशान्य भारताच्या विकासाचा अनुशेष दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया पारदर्शी झाली. त्याचबरोबर लोकशाही राजकारणातील भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी आणि मंत्रिपदाची खैरात वाटून राजकीय स्थैर्य विकत घेण्याच्या प्रवृत्तीला आळा बसावा, यासाठी त्यांनी मंत्रिमंडळाच्या संख्येवर निर्बंध घालणारी संवैधानिक तरतूद केली. यातूनच राजकारणातील भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्याचा मार्ग मोकळा झाला. अटलजींच्या व्यक्तिमत्त्वात लवचिकता आणि सामंजस्य होते. त्याचबरोबर तत्त्वांशी तडजोड न करण्याचा कणखरपणाही होता. त्यामुळे त्यांच्याविषयी सर्वदूर आदराची भावना आहे. आज ते गेल्यानंतर प्रत्येक भारतीयाला आपल्या घरातील वडीलधारे माणूस गेल्याची वेदना जाणवत आहे.
 

Web Title: Atal Bihari Vajpayee: The end of a era

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.