Atal Bihari Vajpayee : टूट सकते है मगर हम झुक नही सकते

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 03:46 AM2018-08-17T03:46:20+5:302018-08-17T03:46:59+5:30

तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचे त्यांनी भरभरून कौतुक केले होते. एवढेच नव्हे तर संसदेत भाषण करताना एक पाऊल पुढे टाकून त्यांनी इंदिराजींना दुर्गा संबोधले होते.

Atal Bihari Vajpayee: breaks but we can not bend | Atal Bihari Vajpayee : टूट सकते है मगर हम झुक नही सकते

Atal Bihari Vajpayee : टूट सकते है मगर हम झुक नही सकते

Next

- राजेंद्र दर्डा
एडिटर इन चीफ, लोकमत समूह

पत्रकार, प्रखर वक्ता, संवेदनशील कवी ते पंतप्रधान असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व अटलबिहारी वाजपेयीजी यांनी जागतिक राजकारणावर अमीट ठसा उमटवला. वाजपेयी नावाच्या झंझावातासोबत विदेश दौरा करण्याचे भाग्य मला १९९९ मध्ये जी-१५ परिषदेच्या निमित्ताने लाभले. ७ ते १४ फेब्रुवारीदरम्यान त्रिनिदाद-टोबॅगो, जमैका, मोरोक्को या देशांच्या भेटीत मी त्यांच्यासोबत होतो. त्यांची उभी हयात आणि एकूण राजकीय कारकीर्द खरोखरच सर्वांसाठी आदर्श ठरावी. भारतीय जनसंघाचे खासदार ते विविध विरोधी पक्षांची खऱ्या अर्थाने पहिल्यांदा मोट बांधणारे तीनवेळा पंतप्रधान हा प्रवास वाजपेयींनी स्वकर्तृत्वाने यशस्वी केला. त्यांनी शेवटपर्यंत संसदेत आपला दबदबा कायम ठेवला.
विदेश दौºयात वाजपेयीजी यांच्यातील अनेक पैलू मला पाहता आले, प्रत्यक्ष अनुभवता आले. पोर्ट आॅफ स्पेन (त्रिनिदाद) येथे महात्मा गांधी सांस्कृतिक केंद्राची वाजपेयी यांनी पायाभरणी केली. महात्मा गांधींचा जन्म भारतात झाला असला तरी ते साºया जगाचे होते आणि वसुधैव कुटुंबकम या वैदिक स्वप्नांचे साक्षात रूप बनले होते, अशी भावना वाजपेयीजी यांनी व्यक्त केली होती. भारतात त्यावेळी ख्रिश्चनांवर झालेल्या हल्ल्यांबाबत भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी नेमके पोर्ट आॅफ स्पेनचे व्यासपीठ त्यांनी निवडले होते. कारण भारताप्रमाणे त्रिनिदाद हाही एक बहुधार्मिक देश आहे. त्यावेळी त्रिनिदाद व टोबॅगोची निम्मी लोकसंख्या भारतीय वंशाची होती आणि वासुदेव पांडे हे त्या देशाचे पंतप्रधान होते. यावेळी अटलजींमधील ठाम नेतृत्वाची झलक बघावयास मिळाली.
त्रिनिदादला पोहोचण्यासाठी तब्बल २० तासांची रात्र आणि १५ हजार कि.मी.चा प्रवास आम्ही अनुभवला. दिल्लीहून एअर इंडियाचे विशेष विमान आकाशात झेपावले तेव्हा रात्रीचे ९ वाजले होते. मध्ये इंधन घेण्यासाठी पोर्तुगालची राजधानी लिसबान येथे काही काळासाठी विमान उतरले होते. त्यानंतर त्रिनिदादला पोहोचेपर्यंत अशी एकूण २० तासांची रात्र आम्ही पहिल्यांदाच अनुभवली.
अटलजींच्या या दौºयात भारतातील आम्ही एकूण १३ पत्रकार होतो. विमानात अटलजींनी मला भेटायला बोलावले. मी मराठी वृत्तपत्र लोकमतचा मुख्य संपादक अशी ओळख करताच अटलजी म्हणाले, दर्डाजी मुझे लोकमत के बारे मे मालूम हैै. वैसे आपके अखबार के विचार और हमारे विचार अलग हैै. लेकिन आपका अखबार अच्छा काम कर रहा हैै. आपल्या विचारांशी ज्याची नाळ जुळत नाही, त्यांचाही कसा आदर सन्मान करावा, हा उदारवाद मला अटलजींमध्ये बघावयास मिळाला.
इकडे आम्ही विदेशात असताना मागे देशात राजकीय घटनाक्रम वेगाने वेगवेगळे वळण घेत आहे, त्याचा अंत केंद्रातील सरकार पडण्यानेही होऊ शकतो, याचा किंचितही तणाव वाजपेयींच्या चेहºयावर कधीही जाणवला नाही किंवा विचलित दिसले नाहीत. सरकारचा पाठिंबा काढण्याचा इशारा देणारे ओमप्रकाश चौटाला यांना दूरध्वनी करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यास त्यांनी याच दौºयात संमती दिली होती. या दौºयावरून परतल्यानंतर बरोबर दोन महिन्यांनी १६ एप्रिल १९९९ रोजी वाजपेयी यांचे सरकार केवळ एका मताने कोसळले. त्या एका मताची खंत आजही सर्वांच्या स्मरणात आहे.
दांव पर सब कुछ लगा है, रुक नही सकते
टूट सकते है मगर हम झुक नही सकते
असे सांगणारे कवी मनाचे अटलजी प्रसंग आला तर वज्रासारखे कठोरही होतात, हे कारगिल युद्धाच्या वेळी दाखवून दिले. १९७१ साली बांगलादेश युद्धात विजय मिळविल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचे त्यांनी भरभरून कौतुक केले होते. एवढेच नव्हे तर संसदेत भाषण करताना एक पाऊल पुढे टाकून त्यांनी इंदिराजींना दुर्गा संबोधले होते. भारतीय जनता पार्टीतील एक उदारमतवादी नेता, पक्ष व धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करणारा नेता आज आपल्यातून निघून गेला आहे. खंबीर बाण्याच्या या आदर्श नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली !
 

Web Title: Atal Bihari Vajpayee: breaks but we can not bend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.