मुत्सद्दी अटल आणि मेहनती मोदी, उदारमतवादी हिंदू आणि करारी हिंदुत्व

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 03:14 PM2018-12-25T15:14:51+5:302018-12-25T15:15:52+5:30

वाजपेयी व मोदी यांच्या कार्यशैलीत मूलतः फरक आहे. तो समजून न घेता दोघांची तुलना करणे चुकीचे ठरेल. वाजपेयी भाजप (त्याआधी जनसंघ) नेते असले तरी एनडीएचे नेते म्हणूनही त्यांना मान्यता होती.

Atal Bihari Vajpayee Birth Anniversary Comparison between Vajpayee and Narendra Modi | मुत्सद्दी अटल आणि मेहनती मोदी, उदारमतवादी हिंदू आणि करारी हिंदुत्व

मुत्सद्दी अटल आणि मेहनती मोदी, उदारमतवादी हिंदू आणि करारी हिंदुत्व

googlenewsNext

- प्रशांत दीक्षित

अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान म्हणून त्यांची कारकीर्द व सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार यांची तुलना होणे साहजिक आहे. पंतप्रधान पदाचा पूर्ण काळ कारभार करणारे काँग्रेसेतर हे दोनच नेते. अन्य नेत्यांना पाच वर्षे पूर्ण करता आली नाहीत. वाजपेयी यांनी तर सहा वर्षे कारभार केला.

वाजपेयी व मोदी यांच्या कार्यशैलीत मूलतः फरक आहे. तो समजून न घेता दोघांची तुलना करणे चुकीचे ठरेल. वाजपेयी भाजप (त्याआधी जनसंघ) नेते असले तरी एनडीएचे नेते म्हणूनही त्यांना मान्यता होती. किंबहुना राजकारणात प्रवेश केल्यापासूनच वाजपेयी हे सर्वपक्षीय नेते होते. केवळ भाजप वा जनसंघाचे नेते म्हणून त्यांना ओळखले जात नव्हते. सर्व पक्षात आणि समाजातील सर्व थरांमध्ये प्रथमपासून मान मिळविणारा वाजपेयी हा एकमेव नेता म्हणता येईल. पंडित नेहरू तसे होते पण त्यांचा करिश्मा अलौकिक होता. त्यांच्यामागे स्वातंत्र्यलढ्याचे वलय होते. स्वातंत्र्योत्तर काळात वाजपेयी हाच एकमेव सर्व पक्षांना आपलासा वाटणारा नेता ठरला. पंडित नेहरूंना स्वतः वाजपेयी मानत असत व वाजपेयींच्या परराष्ट्रीय धोरणांवर पंडित नेहरूंचा ठसा होता. तथापि त्यापुरतीच ही तुलना राहत नाही. पंडित नेहरूंच्या उदारमतवादी स्वभावाचा व धोरणांचा वाजपेयींवर अधिक प्रभाव होता. वाजपेयी राष्ट्रीय स्वयंसेवर संघाचा आदर करीत असले तरी ते संघीय कधीच नव्हते. संघाचा संकुचित दृष्टिकोन त्यांच्या स्वभावात बसणारा नव्हता. मात्र त्याचवेळी संघ परिवारात वाजपेयी यांना जितके स्वातंत्र्य होते तितके ते काँग्रेसमध्ये मिळाले नसते. काँग्रेसमधील घराणेशाही वाजपेयींना सहन झाली नसती. त्याचबरोबर नेहरू परिवाराला (इंदिरा गांधींचा अपवाद) हिंदुत्वाबद्दल जितका आकस होता, तितका तो वाजपेयींना नव्हता. ते उदारमतवादी हिंदू होते. आपला हिंदू चेहरा लपविण्याची गरज त्यांना वाटली नाही. यामुळेच राम मंदिर आंदोलनाला त्यांनी पाठिंवा दिला असला तरी अतिरेकी हिंदुत्व त्यांना मान्य नव्हते. वाजपेयी हिंदू होते पण कडव्या हिंदुत्वापासून दूर होते. यामुळे त्यांचे नेतृत्व हे सर्वसमावेशक होऊ शकले. या स्वभाव वैशिष्ट्यामुळे एनडीएचे आघाडी सरकार वाजपेयींच्या नेतृत्वाखाली कुशलतेने कारभार करू शकले.

सर्वसमावेशकता वाजपेयी यांच्या स्वभावात होती हे जसे खरे तसेच ते ज्यावेळी पंतप्रधान झाले त्यावेळी भाजप आजच्याइतका बलवान नव्हता. भाजपची सदस्यसंख्या मर्यादित होती व मित्रपक्षांना बरोबर घेतल्याशिवाय गत्यंतर नव्हते. वाजपेयींमधील एक महत्त्वाचा गुण म्हणजे कोणत्याही नेत्याच्या मर्यादा व गुण यांचे नेमके भान त्यांना होते. ते जन्मजात मुत्सद्दी होते. या गुणामुळे आघाडी सरकारमधील जॉर्ज फर्नांडिस, ममता बॅनर्जी, जयललिता, मायावती अशा अनेकांना ते सांभाळून घेऊ शकले. आघाडी सरकारमधील अडचणी निपटण्यासाठी त्यांनी प्रमोद महाजनांमधील चातुर्य व डावपेच आखण्याच्या गुणाचा उत्तम उपयोग करून घेतला.

मुत्सद्दीपणाच्या दैवी वारशामुळे वाजपेयी यांना अन्य पक्षातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही मित्र लाभले. नरसिंह राव व त्यांचे मैत्र सर्वश्रुत होते. नवाझ शरीफ त्यांचा सल्ला घेत व बिल क्लिंटनशीही त्यांचं सख्य होतं. करूणानिधी त्यांचे खास चाहते होते. करूणानिधींबरोबरची युती कायम राहू द्या असे वाजपेयी यांनी अडवाणी व महाजन यांना सुचविले होते. परंतु, त्या दोघांनी जयललिता यांच्या बाजूने कौल दिला. हा कौल चुकला. करूणानिधींनी काँग्रेसशी आघाडी करून तामीळनाडूतील सर्व जागा जिंकल्या. २००४च्या निवडणुकीत भाजपला काँग्रेसपेक्षा फक्त सात जागा कमी पडल्या होत्या. करूणानिधी यांच्याशी आघाडी कायम ठेवली असती तर वाजपेयी सत्तेवर कायम राहिले असते. मुत्सद्देगिरीतील वाजपेयींची नैपुण्य जिनिव्हामधील पाकिस्तानचा पराभव, कारगिल संघर्ष व अणुस्फोटानंतर अमेरिकेशी झालेल्या वाटाघाटी या सर्वात ठळकपणे दिसले.

मुत्सद्दी हा मेहनती असतोच असे नाही. मेहनतीपेक्षा कामाचे उत्तम नियोजन आणि योग्य व्यक्तीवर योग्य जबाबदारी टाकण्याची कला त्याच्या अंगी असावी लागते. योग्य व्यक्ती निवडण्यात वाजपेयींचा हातखंडा होता. हे प्रशासनातही दिसून आले. वाजपेयी यांचे पंतप्रधान कार्यालय हे सर्वात कार्यक्षम पंतप्रधान कार्यालय म्हणून ओळखले जाते. ब्रजेश मिश्रांवर त्यांनी विश्वास टाकला होता व सहकारी मंत्र्यांना कारभाराची मोकळीक असली तरी मुख्य मुद्यांवर वाजपेयींचे बारीक लक्ष असे. शनिवार-रविवार अशी दोन दिवस सुटी घेणारे हे एकमेव पीएमओ असावे. लेस गर्व्हनन्स हा अलीकडील प्रचारमंत्र वाजपेयींनी अंमलात आणला होता. भारतीय अर्थव्यवस्थेला सुबत्तेकडे नेणारा जो मार्ग नरसिंह राव यांना दाखविला होता, तो वाजपेयींना मान्य होता आणि त्यांच्या काळात जीडीपीही चांगली प्रगती दाखवित होता. 

समुदायात राहूनही अंतरंगात एकांत साधायचा गुण मुत्सद्द्याच्या अंगी असतो. वाजपेयींमध्ये तो भरपूर प्रमाणात होता. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर असले तरी संघ परिवारात नव्हते. एनडीएचे नेते असले तरी एनडीएमधील वावटळींपासून दूर होते. वाजपेयी यांच्याप्रमाणेच नरसिंह राव हेही मुत्सद्दी. पण झारखंडचे किटाळ राव यांना जसे चिकटले तसे वाजपेयींना कोणतेही किटाळ चिकटले नाही. व्यक्तिगत आयुष्यातही ते स्वतंत्र राहिले. संघ परिवाराचा आचारधर्म वा नैतिकतेचा काच त्यांनी मानला नाही. तरीही ते लोकप्रिय राहिले. वाजपेयी संघाला फारसे पटले नाहीत. संघ परिवारातील नेते वाजपेयींच्या नावाने खासगीत बोटे मोडत. तसा वाजपेयींनाही संघ फार पटला नव्हता. मात्र दोघांना परस्परांची गरज होती. आपल्या व्यक्तिमत्वाने संघ परिवारात जे स्वातंत्र्य वाजपेयींनी उपभोगले ते त्यांना काँग्रेसमध्ये मिळाले नसते आणि वाजपेयींच्या लोकप्रियतेची व सर्वसमावेशक नेतृत्वाची संघ परिवाराला गरज होती. स्वतंत्र पक्ष वाजपेयी काढू शकले नसते. कारण पक्ष उभारणीसाठी करावी लागणारी अथक मेहनत, संघटना चातुर्य, हेडमास्तरी काम आणि पैशाची आवक-जावक अशा गोष्टी वाजपेयींना जमणाऱ्या नव्हत्या. 

वाजपेयींच्या तुलनेत मोदी मुत्सद्दी नाहीत, पण मेहनती आहेत हा या दोन नेत्यांमधील मुख्य फरक आहे. मोदी संघटनेतून वर गेलेले आहेत. ते संघाला बांधील आहेत, स्वतंत्र नाहीत. ही बांधिलकी त्यांनी स्वखुशीने मानलेली आहे. ते मुत्सद्दी नसल्यामुळे परिस्थितीचे मर्म आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी लागणारी अंतःप्रतिभा मोदी यांच्याकडे फारशी नाही. केवळ अंतःस्फूर्तीने वाजपेयी यांनी कठीण समस्येतून मार्ग दाखविल्याची काही उदाहरणे त्यांच्या पीएमओमधील अधिकारी सांगतात. दाखवून दिलेल्या मार्गावर मोदी आपला अश्व दौडत नेऊ शकतात, पण मार्ग शोधणे त्यांना चटकन जमत नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेत सध्या साचलेपण आले आहे, नवी गुंतवणूक होत नाही आणि अर्थव्यवस्थेत चैतन्यही नाही. यावर उपाय शोधण्यासाठी आऊट ऑफ बॉक्स विचारांची गरज असते. (नोटबंदी हा आऊट ऑफ बॉक्स विचार नाही. ती शुद्धीकरणाची मोहिम होती) मोदींना असा विचार अद्याप सुचलेला नाही.

संघटनेच्या चौकटीतच बंदिस्त असल्यामुळे संघटनेबाहेरची बुद्धिमत्ता मोदींना स्वतःकडे आकर्षिक करता येत नाही. वाजपेयींकडे अन्य बुद्धिमंत आकर्षित होत व कारभाराला मदत करीत. मोदींना ते जमत नाही. कारण संघटनेची घडी विस्कळीत होण्याची भीती त्यांना वाटत असावी. यामुळेच मित्रपक्षांशी ते मोकळेपणे वागू शकत नाहीत. कारण चौकट मोडण्याची धास्ती त्यांना वाटत असते. म्हणून स्वबळाचा नारा ते सतत देतात. वाजपेयींना स्वबळाचा नारा देण्याची गरज वाटत नव्हती.

मोदी उदारमतवादी हिंदू नाहीत. ते योगी आदित्यनाथ वा बजरंग दल यांच्याप्रमाणे कडवे हिंदू नसले तरी करारी हिंदू आहेत. हिंदूंचा या देशावर प्रथम हक्क आहे हे ठसविण्याचा आग्रह त्यांच्याकडे आहे. मोदींचे हिंदुत्व हे हिंदू तत्वज्ञान वा विचारधारेपेक्षा, कर्मकांड वा आचारधर्माला जास्त प्राधान्य देणारे आहे. करारी हिंदुत्वाचा ठसा देशावर उमटविण्याची जिद्द मोदींमध्ये आहे. यासाठी त्यांना उदारमतवादी हिंदू उपयोगी पडणार नाहीत. म्हणून योगींसारख्या कडव्या हिंदु नेत्यांशी त्यांचे अधिक जुळते.

करारी नेता जसा मुत्सद्दी होऊ शकत नाही तसेच करारी नेत्याला मित्रही मिळू शकत नाहीत. त्याला अनुयायी मिळतात. वाजपेयींना अनुयायी नव्हते, पण मित्र बरेच होते. या मित्रांमुळेच ते कार्यक्षम कारभार करू शकले. अनुयायी बहुदा कार्यक्षम नसतात. अनुयायी असल्यामुळे नेत्याला सुरक्षित वाटले तरी नवा विचार त्यातून मिळत नाही. इंदिरा गांधी करारी होत्या व त्यांना अनुयायीही खूप मिळाले. पण त्यातून काँग्रेसचा लाभ झाला नाही.

मित्रांपेक्षा अनुयायांवर अवलंबून असणार्‍या नेता हा कठोर प्रशासक होऊ शकतो. तो व्यवस्था सुदृढ व मजबूत करण्याचा उत्तम प्रयत्न करतो. (जसा मोदी करीत आहेत) पण तो व्यवस्थेला नवी दिशा देऊ शकत नाही. चीनमध्ये डेंग वा इथे नरसिंह राव यांनी जे केले ते मोदींना अद्याप जमलेले नाही. माओकडे निष्ठावान अनुयायी अमाप होते. पण डेंग यांनी ज्या उंचीवर चीनला नेले तेथे माओ घेऊन जाऊ शकला नाही. मोदीही देशाला नवी दिशा देऊ शकलेले नाहीत. उलट देश उदारमतवादाकडून संकुचिततेकडे जाऊ लागला आहे. सामाजिकबरोबर आर्थिक क्षेत्रातही.

मोदी यांनी कोणता गुण आत्मसात करायला हवा असा प्रश्न प्रशांत किशोर यांना अलिकडेच एका मुलाखतीत विचारण्यात आला. मोदींच्या २०१४च्या विजयामध्ये प्रशांत किशोर यांच्या प्रचार-व्यवस्थापनाचा महत्वाचा वाटा होता. विनम्रता हवी, असे उत्तर प्रशांत किशोर यांनी दिले. मोदी हे उत्तम श्रोते (लिसनर) आहेत, फार एकाग्रतेने ते ऐकतात, असेही प्रशांत किशोर म्हणाले. विनम्रता हा मुत्सद्द्याचा गुण असतो, तर एकाग्रता हा करारी नेत्याचा. करारी बाणा व मुत्सद्दीपणा या दोन्हींचा देशाला व पक्षाला उपयोग असतो. अडवाणींच्या करारी नेतृत्वाचा वाजपेयींना फायदा झाला. मोदी करारी असले तरी त्यांना मुत्सद्दी जवळ करता आलेले नाहीत. भाजपसमोर पेच हाच आहे.

राहुल गांधींनी यातून काही शिकायला हवे. 

Web Title: Atal Bihari Vajpayee Birth Anniversary Comparison between Vajpayee and Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.