मुलाखतकारांचं मागणं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 03:31 AM2018-04-13T03:31:36+5:302018-04-13T03:31:36+5:30

मेतकूट-भात खाऊन पुण्यातील घरी सुधीर गाडगीळ अंथरुणावर पडले. राज ठाकरे यांनी पुण्यात येऊन शरद पवार यांची मुलाखत घेतल्यापासून गाडगीळ यांच्या डोळ्याला डोळा लागत नाही.

Asking interviewers ... | मुलाखतकारांचं मागणं...

मुलाखतकारांचं मागणं...

Next

-संदीप प्रधान
मेतकूट-भात खाऊन पुण्यातील घरी सुधीर गाडगीळ अंथरुणावर पडले. राज ठाकरे यांनी पुण्यात येऊन शरद पवार यांची मुलाखत घेतल्यापासून गाडगीळ यांच्या डोळ्याला डोळा लागत नाही. उत्तररात्रीपर्यंत ते तळमळत असतात. पहाटे कधीतरी डोळा लागतो. सकाळी ‘गाडगील दूध ले लो...’ अशी आरोळी ठोकणारा तिवारी नावाचा दूधवाला डोळे चोळत दरवाजा उघडल्यावर गाडगीळांवर मुलाखतकार असल्यासारखी प्रश्नांची सरबत्ती करतो.

‘क्युं गाडगीलसाब, रात को ठीक से सोए नही क्या?’ ‘देर रात तक प्रोग्राम था क्या?’ वगैरे वगैरे... आपली मिरासदारी असलेल्या (मानेला हलकेच झटका देऊन) मुलाखती घेण्याच्या प्रांतात आता राज ठाकरेंपासून संजय राऊतांपर्यंत अनेकांनी घुसखोरी केल्यानं गाडगीळ अस्वस्थ आहेत. लतादीदी नाराज होणार नाहीत, पण आशातार्इंना नथीतून वार केल्याचा आनंद मिळेल, अशी साधकबाधक मुलाखत घेण्यात आपला कुणी गळा धरू शकणार नाही, असे असताना हे अचानक काय विपरीत घडले, या कल्पनेने गाडगीळ गोरेमोरे झाले.

(राधेश्याम तिवारी दूधवाला संजय निरुपम यांची मुलाखत घेत असल्याची स्वप्नं पडून गाडगीळ गेल्या आठवड्यात दोन वेळा दचकून जागे झाले) पहाटेची स्वप्नं खरी होतात म्हणे. तिकडं मुंबईत प्रदीप भिडे यांचीही वेगळी अवस्था नाही. कोट-टाय परिधान करून मुलाखतीच्या निमंत्रणाची दिवसभर चातकाप्रमाणं वाट पाहून रात्री ते टायची नॉट सैल करतात आणि कोट हँगरला अडकवून दीर्घ सुस्कारा सोडतात. अजित पवार हे चंद्रकांत पाटील यांची आॅर्थर रोड जेलच्या अंडासेलमध्ये मुलाखत घेणार आहेत, असा मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर पाहून भिडे भडकले आणि त्यांनी ‘आजच्या ठळक बातम्यां’चा सूर लावत ‘मी प्रदीप भिडेच घेणार आजच्या ठळक मुलाखती’, अशी गर्जना केली.
आपण आपल्याच घरी असून मुलाखतीची ती अफवा असल्याचं कळल्यावर भिडे शांत झाले. मंगला खाडिलकर या देखील अस्वस्थपणे घराच्या गॅलरीत येरझारा घालत असल्याचे कानांवर आले आहे. शब्दांचा पाक, उपमा-अलंकारांचा सुकामेवा, अभंग-ओव्यांचा केशर, काव्याचे मनुके अशा वाक्कृतीतून तयार झालेल्या मिठ्ठास प्रश्नांची लाडिक हास्याच्या धनुष्यातून समोरच्या व्यक्तीवर फेक करण्याचे आपले कसब सर्वश्रुत असताना आता अचानक हे असे आक्रित का घडले? या विवंचनेने गॅसवरील करपलेल्या वरणाचे भान मंगलातार्इंना राहिले नाही. जेव्हा शेजारच्या घरातून मोबाईलवर फोन आला, तेव्हा त्या स्वयंपाकघरात धावल्या. मुलाखतींच्या प्रांतातील राजकीय स्थित्यंतरात यापुढं कसदार प्रतिभेच्या आपल्यासारख्या सिद्धहस्त मुलाखतकारांची डाळ शिजणारच नाही का, अशा कल्पनेनं मंगलातार्इंचा कंठ दाटून आला. (राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ यांनी आपल्याला शिवसेनेच्या वहिनीसाहेब रश्मी ठाकरे यांची मुलाखत घ्यायला आवडेल, असं टिष्ट्वट केल्याचं कुणीतरी मंगलातार्इंना सांगितलं, तेव्हा त्या खिन्न हसल्या) योगायोगानं विलेपार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघात या तिघांची अलीकडेच भेट व प्रदीर्घ चर्चा झाली. त्यांनी संयुक्तपणे तीन प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांना पाठवलेली पत्रे वाचून सर्वच राजकीय पक्ष भेदरले. पत्रातील मागणी एवढीच की, येत्या निवडणुकीकरिता उमेदवार निवडीच्या मुलाखती घेण्याचा मान तरी आम्हा बेरोजगार मुलाखतकारांना द्या.

Web Title: Asking interviewers ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.