कलाकारांनी नाही बोलायचे तर कुणी?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 04:05 AM2019-02-17T04:05:02+5:302019-02-17T04:05:21+5:30

पणती जशी लावली की, काम संपले, असे होत नाही. वादळ, वाऱ्यात, पावसात ती पणती तेवत राहील, याची जपवणूक करावी लागते

Artists do not talk about who? | कलाकारांनी नाही बोलायचे तर कुणी?

कलाकारांनी नाही बोलायचे तर कुणी?

Next

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या ज्येष्ठ अभिनेते, चित्रकार अमोल पालेकर यांनी मुंबईतील नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्टमधील कार्यक्र मात उपस्थित केलेल्या मुद्यांमुळे औचित्यभंग झाला, असे ठामपणे म्हणता येणार नाही. सभाशास्त्रात औचित्यभंगाचे ठोस असे नियम नाहीत. औचित्यभंग ही व्यक्तिसापेक्ष बाब आहे. उलटपक्षी, पालेकर यांनी जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला, तो केवळ कलाकार, चित्रकार यांच्यापुरता महत्त्वाचा नसून समाजाकरिता महत्त्वाचा मुद्दा आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आज मिळाले व उद्या नाही मिळाले तरी चालेल, अशी गोष्ट नाही. ती सातत्याने लक्षपूर्वक जपवणूक करण्याची गोष्ट आहे.

पणती जशी लावली की, काम संपले, असे होत नाही. वादळ, वाऱ्यात, पावसात ती पणती तेवत राहील, याची जपवणूक करावी लागते, तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे कालातीत आहे. आज ही राजवट, उद्या दुसरी राजवट असली, तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे जपले, टिकलेच पाहिजे. लॉर्ड अ‍ॅक्टन यांचे एक सुप्रसिद्ध वचन आहे की, ‘पॉवर करप्ट्स, बट अ‍ॅब्स्युल्युट पॉवर करप्ट अ‍ॅब्स्युल्युटली.’ त्यामुळे कुठल्याही राजवटीत, समाजात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जपवणूक ही व्हायलाच हवी. देशात आणीबाणी लागू झाली, तेव्हा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून ख्यातनाम विदुषी दुर्गा भागवत यांनी समोर यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे दिग्गज नेते असतानाही औचित्यभंग होऊ न देता टीका केली होती. त्याच संमेलनात कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी ‘सलाम’ कविता वाचून दाखवली व सर्वसामान्य माणसाच्या मनातील भावना उलगडून दाखवली. लोकांनी त्यांना अक्षरश: डोक्यावर घेतले. त्यामुळे पालेकर यांनी त्या व्यासपीठावरून ‘कलाकार गप्प का?’ असा सवाल केला असेल, तर ते चुकीचे नाही. समाजातील सद्य:स्थितीवर चित्रपट कलाकार, साहित्यिक, चित्रकार यांनी स्वत:च्या माध्यमातून व्यक्त व्हायला हवे. समाजातील काही घटकांनी ट्रोल केले, तरीही आजच्या परिस्थितीवर भाष्य केलेच पाहिजे. वेळप्रसंगी त्याचे परिणाम भोगायलाही तयार राहिले पाहिजे. जेव्हा समाजात अभिव्यक्ती स्वातंत्र्य संकोचित होते, तेव्हा अनेक कलाकार, साहित्यिक, चित्रकार हे स्वत:वर सेन्सॉरशिप लादून घेतात. परिस्थितीचे दडपण त्यांना तसे करायला भाग पाडते. त्यामुळे चित्रकार म्हणून तुम्ही कसे व्यक्त होता, हाच प्रश्न त्यांनी केला. जयपूर येथे एका कलात्मक कार्यक्र मानिमित्त गाय हवेत उलटी लावली होती. मात्र, काही लोकांनी त्याला आक्षेप घेतल्याने तिला सुलटे करून खाली आणावे लागले. समाज कुठल्या विषयावर त्यात्या काळात कसा प्रतिक्रि या देतो, ते पाहणे महत्त्वाचे आहे.

ज्या ख्यातनाम कलाकार प्रभाकर बरवे यांच्या प्रदर्शनानिमित्ताने हा वाद झडला, त्या बरवे यांच्या कार्याची तब्बल २५ वर्षांनंतर दखल घेतली गेली, हेही येथे नमूद करायला हवे. कलेच्या क्षेत्रातील त्यांचे काम उत्तम असूनही ते दुर्लक्षित राहिले. नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्ट येथे कलाकारांची प्रदर्शने लावण्याबाबत निर्णय घेण्याकरिता कलाक्षेत्रातील मंडळींच्या समित्या कार्यरत होत्या. ज्याप्रमाणे सेन्सॉर बोर्डावर तज्ज्ञ असतात तसेच येथे कलेतील तज्ज्ञ निर्णय घेण्याकरिता नियुक्त केले होते. त्या समित्यांची मुदत संपल्यावर नव्या समित्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत, हे वास्तव आहे. सरकारने नियुक्त केलेले संचालक किंवा अधिकारी हे प्रशासक असतात. मात्र, ते या सल्लागार समितीच्या सल्ल्याने काम करतात. यासंदर्भात त्या समित्यांचे महत्त्व पालेकर यांनी अधोरेखित केले असावे. पालेकर यांनी जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा त्याला क्युरेटर जेसल ठक्कर यांनी आक्षेप घेताना बर्वे यांच्याबद्दल बोला, असे सुचवले, तर हा सरकारी कार्यक्र म असल्याने तुम्ही सरकारवर टीका करू नका, अशी भूमिका तिथल्या संचालकांनी घेतली. सरकारवर एका मर्यादेपर्यंत टीका होणार, हे सरकारनेही स्वीकारलेले असते.

आणखी महत्त्वाचा मुद्दा असा की, आपण कुठल्या कार्यक्र माला कुणाला पाहुणे बोलवत आहोत, त्या व्यक्तीची वेगवेगळ्या विषयांवरील भूमिका काय आहे, आपण बोलवत असलेली व्यक्ती स्पष्टवक्ती आहे किंवा कसे, याचा विचार आयोजकांनी अगोदरच करायला हवा. अर्थात, काही व्यक्ती या काय बोलतील, याबाबतचा अंदाज बांधणे अशक्य असते. परंतु, तरीही मला असे वाटते की, पालेकर यांना आयोजकांनी थांबवायला नको होते. आयोजकांनी पालेकर यांना थांबवले नसते, तर हा वाद झाला नसता. कदाचित, पालेकर याच विषयावर टीकात्मक बोलले असते व तेथे उपस्थितांपलीकडे कुणी फारशी त्याची दखल घेतली नसती. सध्या देशात निवडणुकांचे वातावरण असून वेगवेगळ्या विषयांवर वादविवाद सुरू झाले आहेत. त्यामुळे पालेकर यांनी पत्रकार परिषद घेताच हा वाद चिघळला.
मुंबईसारख्या शहराचा चेहरामोहरा बदलणारी दीड लाख कोटी रु पयांची कामे सुरू असताना येथे कलेच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी जागा उपलब्ध केली पाहिजे, याची जाणीव कुणालाच नाही. मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात एकही परिपूर्ण एक्झिबिशन सेंटर नाही. महाराष्ट्रातील संत साहित्याची, नाट्य-चित्रपट, साहित्य, कला यांची परंपरा उलगडून दाखवणारे एखादे म्युझियम महाराष्ट्रात नाही. ही खरी दुर्दैवाची गोष्ट आहे. शांघायसारख्या शहरातील मोठी टेक्सटाइल मिल बंद पडल्यावर तेथील सरकारने तेथे टॉवर उभे न करता ४५० स्टुडिओ, आर्ट गॅलरी, कॅफेटेरिया, असे कलासंकुल उभारले. जुन्या विधानभवनाची ऐतिहासिक वास्तू पोलीस महासंचालकांच्या कार्यालयाकरिता न देता तेथे असे मुंबईसह महाराष्ट्राची ओळख करून देणारे म्युझियम उभे करता आले असते. कलेच्या व्यासपीठावर कलेशी संबंधित हे मुद्दे चर्चेत येणे गरजेचे आहे.


आपण कार्यक्रमाला कुणाला पाहुणे म्हणून बोलवत आहोत, त्याची वेगवेगळ्या विषयांवरील भूमिका काय आहे, ती व्यक्ती स्पष्टवक्ती आहे किंवा कसे, याचा विचार आयोजकांनी अगोदरच करायला हवा. तरीही, मला वाटते की, पालेकर यांना आयोजकांनी थांबवायला नको होते.

प्रकाश बाळ जोशी

(लेखक सुप्रसिद्ध चित्रकार व ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Web Title: Artists do not talk about who?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.