दृष्टिकोन - असामान्य व्यंगचित्रकार, संवेदनक्षम कलावंत विकास सबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 06:01 AM2019-02-20T06:01:17+5:302019-02-20T06:01:39+5:30

शिवाजी पार्कच्या फूटपाथवरून सबनीस किंचित झुकून लांब-लांब टांगा टाकत झपाट्याने चालत असतात

Approximation - Unusual cartoonist, sensational artist development sublinis | दृष्टिकोन - असामान्य व्यंगचित्रकार, संवेदनक्षम कलावंत विकास सबनीस

दृष्टिकोन - असामान्य व्यंगचित्रकार, संवेदनक्षम कलावंत विकास सबनीस

googlenewsNext

प्रशांत कुलकर्णी

शिवाजी पार्कच्या फूटपाथवरून सबनीस किंचित झुकून लांब-लांब टांगा टाकत झपाट्याने चालत असतात. अंगावर नाजूक डिझाइनचा फूल शर्ट, त्यावर हाफ जॅकेट, खांद्यावर उच्च अभिरूची दाखविणारी चामडी बॅग आणि चेहऱ्यावर काळजीचे भाव. सबनीस चालत असतात. न राहवून मी त्यांना लांबूनच हटकतो, ‘‘नमस्कार सबनीस! काय गडबडीत?’’ सबनीस चमकून थांबतात! मी जवळ जातो. ते रोखून बघतात. कपाळावर किंचित आठ्या, मुद्रा गंभीर, पण तरीही ते हसतात. आमच्यासारख्या सामान्याशी बोलायचे म्हणजे, त्यांच्यासारख्या असामान्याला थोडे झुकावेच लागते. गंभीर आवाजात सबनीस सांगतात, ‘‘मला जरा आजचे कार्टुन द्यायला जायचेय. थोडा गडबडीत आहे. नंतर छान गप्पा मारू!’’ सबनीस पुन्हा झपाट्याने चालू लागतात.

हा असा प्रसंग अनेक वेळेला घडलेला आहे. व्यंग्यचित्रकार विकास सबनीस हे एक असामान्य व्यक्तिमत्त्व आहे यात काही शंका नाही. त्यांना सहा फुटांहून अधिक लाभलेली उंची, शिडशिडीत अंगकाठी, चेहºयावरचा तजेला, काळे केस हे सारे अजूनही पहिल्यासारखेच आहे! मी त्यांना ३५ वर्षांपासून ओळखतोय, पण हा माणूस अगदी आहे तसाच आहे. त्यांची उभे राहण्याची पद्धत, बोलण्याची ढब, व्यंगचित्रकार म्हणून असलेला अभिमान आणि आत्मविश्वास हे अगदी आहे तस्सेच आहे, पण मला विकास सबनीस हा एक वेगळ्या अर्थाने न बदललेला विलक्षण माणूस वाटतो, त्याची कारणे वेगळी आहेत.
त्यांच्या व्यंगचित्रातला टापटीपपणा मला खूप आकर्षित करतो. (जो त्यांच्या व्यक्तिमत्त्वातही आहे) त्यांच्या चित्राची रचना, ब्लॅक-व्हाइटचा समतोल, पात्रांचे वैविध्य हे विलक्षण आकर्षक असते. पन्नास वर्षांनंतरही त्यांच्या कमेंटस् या ताज्या वाटतात, ही त्यांची खरी ताकद आहे. त्यांचा महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांचे हस्ताक्षर! विशेषत: मोठ्या व्यंगचित्रांच्या कॅप्शन्स ते हातांनी लिहितात, तेव्हा त्यांच्या हस्ताक्षरातले सौंदर्य खुलते व मुख्य म्हणजे ते आशयाला बाधा आणत नाही.
उत्तम अर्कचित्र काढणे हा त्यांचा आणखी एक वाखाणण्यासारखा गुण. याबाबतीत त्यांच्यावर त्यांचे गुरू बाळासाहेब प्रसन्न आहेत, असा भास नव्हे, खात्रीच पटते. कारण ब्रशच्या साहाय्याने अर्कचित्र काढून चेहºयावरचे हावभाव नेमके पकडणे हे जातिवंत राजकीय व्यंगचित्रकारालाच जमते, जे सबनीस यांनी लीलया साध्य केले आहे!
सबनीस यांचे मराठी उत्तम आहेच, पण त्यांचे इंग्रजीही अतिशय चांगले आहे. म्हणून अनेक इंग्रजी वृत्तपत्रांत ते सन्मानाने अनेक वर्षे व्यंगचित्र काढू शकले. विशेषत: व्यंगचित्रं काढताना त्याची कॅप्शन देताना कमीतकमी व नेमके शब्द वापरण्याची गरज असते, त्या वेळी हे प्रभुत्व कामी येते. मराठी व्यंगचित्रकारांनी सबनिसांचा हा गुण लक्षात घेण्यासारखा आहे. कारण इंग्रजी पत्रकारितेत जाणे सोपे आहे, पण तिथे टिकून राहण्यासाठी अंगभूत कौशल्याचीच गरज असते. त्यामुळे सबनिसांची कारकिर्द आणखी असामान्य वाटते!
सबनिसांवर ठाकरे बंधू आणि लक्ष्मण यांच्या शैलीचा प्रभाव आहे, हे ते अभिमानाने मान्य करतात, पण त्यातूनच त्यांनी स्वत:ची कारकिर्द घडवत असताना, स्वत:ची शैलीही विकसित केली हे महत्त्वाचे! त्यांची अनेक चित्रे मला विलक्षण आवडतात, पण ‘आवाज’ दिवाळी अंकात सुरुवातीलाच डाव्या बाजूला त्यांचे एक राजकीय पूर्णपान व्यंगचित्र अनेक वर्षे प्रकाशित होत असते, ते मला खूप आवडते. सबनिसांच्या व्यंगचित्रकलेतले सगळे पैलू त्या एका चित्रात दिसतात. उदाहरणार्थ, कल्पना, चित्रकला, मांडणी, काळा-पांढरा यांचा समतोल, अर्कचित्र, हस्ताक्षर! यामुळे त्यांची चित्रे उठावदार ठरतात व लक्षात राहतात. मुख्य म्हणजे, या चित्रात ते दिवाळीचा संदर्भ कधीही दृष्टिआड करत नाहीत! पन्नास वर्षे पूर्णवेळ व्यंगचित्र काढणे हे फारच धाडसाचे काम सबनीस यांनी बघता-बघता पूर्ण केले आहे. (म्हणजे त्यांची चित्रे वाचकांनी बघता बघता...) त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. मनाने अतिशय निर्मळ, पण विलक्षण संवेदनक्षम असा हा कलावंत आहे.
मी पुन्हा एकदा सबनिसांकडे पाहतो. त्यांच्या कपाळावर किंचित आठ्या पडलेल्या आहेत. ते माझ्याकडे चष्म्यातून रोखून बघतच आहेत. संत्रस्त भाव जमा होत आहेत त्यांच्या चेहºयावर! कशाची असेल ही चिंता? मी विचार करू लागतो. उद्याच्या डेडलाइनची? बनेल समाजकारणी, बदमाश राजकारणी, निर्ढावलेले अधिकारी यांची? अपघात, दंगली, भेसळ, महागाई या वाढत्या राक्षसांची? की एखादा आढ्यताखोर संपादक किंवा अज्ञानी वाचक यांच्याशी उडालेल्या खटक्याची? मी विचार करत राहतो...!!
मी पुन्हा मागे वळून बघतो. खांद्यावरची चामडी बॅग आणि त्यातले ताजे व्यंगचित्र घेऊन सबनीस झपाट्याने पावले टाकत निघालेले दिसतात!
...जणू काही ते मराठी राजकीय व्यंगचित्रकलेलाच घेऊन पुढे चालले आहेत, असे मला वाटते!

( लेखक ज्येष्ठ व्यंगचित्रकार आहेत)

Web Title: Approximation - Unusual cartoonist, sensational artist development sublinis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.