अनिकेत जाधवची नवी भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 12:10 AM2018-06-19T00:10:11+5:302018-06-19T00:10:11+5:30

कोल्हापूरचा फुटबॉलपटू अनिकेत जाधवला जमशेदपूर एफसी संघाने दोन वर्षांसाठी ४९ लाखांचे मानधन देऊन करारबद्ध केले आहे.

Aniket Jadhav's new fare | अनिकेत जाधवची नवी भरारी

अनिकेत जाधवची नवी भरारी

- चंद्रकांत कित्तुरे
कोल्हापूरचा फुटबॉलपटू अनिकेत जाधवला जमशेदपूर एफसी संघाने दोन वर्षांसाठी ४९ लाखांचे मानधन देऊन करारबद्ध केले आहे. महाराष्ट्रातील तो सर्वात महागडा फुटबॉलपटू ठरला आहे.
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा ज्वर जगभर चढलेला असतानाच कोल्हापूरच्या अनिकेत जाधवने महाराष्ट्राच्या फुटबॉल विश्वात नवा इतिहास घडविला आहे. जमशेदपूर एफसी संघाने त्याला दोन वर्षांसाठी ४९ लाखांचे मानधन देऊन करारबद्ध केले आहे. हा महाराष्ट्रातील एखाद्या फुटबॉल खेळाडूबाबतचा सर्वात मोठा करार आहे. त्यामुळे तो महाराष्ट्रातील आजवरचा सगळ्यात महागडा खेळाडू ठरला आहे. हा पराक्रम त्याने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षीच केला आहे.
भारत हा क्रिकेटवेडा देश समजला जातो. या देशात फुटबॉलवेडेही कमी नाहीत. मात्र, भारतीय फुटबॉल आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणावा तसा चमकू शकला नाही. त्याला अनेक कारणे असली तरी बायचुंग भुतिया, सुनील छत्री यासारख्या खेळाडूंनी भारतीय फुटबॉलला लोकप्रिय बनविले आहे. फुटबॉल म्हटले की भारतात कोलकाता, केरळ आणि गोवा हीच नावे समोर येतात. यात कोल्हापूरचाही समावेश करावा लागेल. कारण स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच कोल्हापुरात फुटबॉल खेळले जाते. स्पर्धा होतात. कोल्हापूरची फुटबॉल परंपरा मोठी आहे. कोल्हापूरने देशाला अनेक राष्ट्रीय फुटबॉलपटू दिले आहेत. नव्या पिढीमध्ये अनिकेत जाधव हा सध्याचा कोल्हापुरातील आणि भारतीय फुटबॉल विश्वातील उदयोन्मुख चमकता तारा आहे. आतापर्यंत त्याने २०१७ मधील १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धा, २०१६ मधील गोव्यात झालेली आंतरराष्ट्रीय युथ फुटबॉल स्पर्धा, आशियाई युवा चषक फुटबॉल स्पर्धा यासारख्या विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आपल्या सातत्यपूर्ण खेळाने त्याने भारतातील अनेक फुटबॉल संघांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे त्याला करारबद्ध करण्यासाठी अनेक संघांकडून विचारणा होत होती. यात जमशेदपूर एफसी संघाने बाजी मारत दोन वर्षांसाठी ४९ लाखांचे मानधन अनिकेतला देऊ केले आहे. दोन दिवसातच याचे सोपस्कार पार पडतील आणि अनिकेत जमशेदपूर एफसी संघाकडून खेळताना दिसू लागेल.
रिक्षाचालकाचा मुलगा ते आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉलपटू असा अनिकेतचा प्रवास. अवघ्या १७ व्या वर्षी त्याला जगातील २३ देशांतील संघाविरोधात खेळण्याची संधी मिळाली आहे. अशी कामगिरी करणारा तो कोल्हापुरातील एकमेव फुटबॉलपटू आहे. वडील रिक्षाचालक, आई गृहिणी अशा सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या अनिकेतचे तिसरीपर्यंतचे प्राथमिक शिक्षक कोल्हापूरजवळील हळदी (ता. करवीर) विद्यामंदिर येथे झाले. या शाळेच्या मैदानावर फुटबॉलचे प्राथमिक धडे गिरवले. चौथीला सांगली येथील क्रीडा प्रबोधिनीत तो दाखल झाला. पाचवीपासून तो पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीत शिकत आहे. त्याचा हा प्रवास कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवणारा आहे. भारतात क्रिकेट त्याखालोखाल कबड्डी लोकप्रिय आहे. आयपीएल, प्रो-कबड्डी यासारख्या व्यावसायिक स्पर्धांनी या खेळांना लोकप्रियता मिळवून देण्यात मोठा हातभार लावला आहे. फुटबॉल यामध्ये कमी पडत आहे. त्यामुळेच भारताचा फुटबॉल संघ आजपर्यंत विश्वचषकात एकदाही खेळू शकला नाही. तसे दिग्गज खेळाडूही अपवाद वगळता तयार होऊ शकले नाहीत. भारतातील फुटबॉलमध्येही अशीच व्यावसायिकता आली तर नवनवे आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉलपटू तयार होऊ शकतील. त्यादृष्टीने सरकार आणि क्रीडा खात्यानेही प्रयत्न करायला हवेत.

Web Title: Aniket Jadhav's new fare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.